कस्तुरे, यज्ञेश्वरशास्त्री माधवशास्त्री
मराठवाड्यातील कळमनुरी गावात मार्गशीर्ष शु. सप्तमीसह अष्टमी शके १८३० म्हणजेच ३० डिसेंबर १९०८ रोजी यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचा जन्म झाला. पिता माधवशास्त्री व माता मंदाकिनी दोघेही विठ्ठलभक्त तसेच वंशाला वेदसेवेची परंपरा. लहानपणापासूनच लौकिक शिक्षणापेक्षा संस्कृत भाषा, वेद, शास्त्रे, संत वाङ्मय यामधेच त्यांना विशेष रुची होती. प्राथमिक वेदाध्ययनाचे धडे त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतले. पुढे नाशिक येथे डॉ. कुर्तकोटी शंकराचार्यांच्या मठात पंचमहाकाव्यांचा अभ्यास झाला. वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मणशास्त्री निरगुडकर यांचेकडे सिद्धान्तकौमुदी, व्याकरण आणि मीमांसाशास्त्राचे शिक्षण घेतले. याच काळात शास्त्रींनी लिहिलेल्या ‘आधुनिक काळात हिंदू जाती व संस्कृतीचे रक्षण कसे करावे’ या विषयावरील निबंधास बालाजी महोत्सवात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले. त्या काळात संस्कृतीरक्षणातच आपले आयुष्य व्यतित करावे असे त्यांनी ठरविले. इ. स. १९२४-३२ या काळात पुण्यात पं. विष्णुशास्त्री बापट यांच्या आचार्यकुलात आठ वर्षे ज्ञानसाधना केली. तसेच पं. नारायणशास्त्री वाडीकर यांच्याकडे तर्कशास्त्राचे अध्ययन झाले. पं. श्रीपादशास्त्री हसूरकर, इंदूर यांच्याकडे वेदान्तशास्त्राचे उच्चशिक्षण झाले.
याप्रमाणे त्यांनी आपले पुढील आयुष्य वेदसेवा, संस्कृत अध्यापन यासाठी वेचण्याचे ठरवून नांदेड येथे इ.स. १९३७ मध्ये संस्कृत पाठशाळेची स्थापना केली. अगाध ज्ञाननिष्ठा, ईश्वरनिष्ठा हे पाठशाळेचे मुख्य आधारस्तंभ होते. यामुळेच सर्वधर्मियांना प्राच्यविद्येच्या अभ्यासाची, मार्गदर्शनाची सोय उपलब्ध झाली. पाठशाळेवर त्यांनी अपत्यवत प्रेम केले व संगोपनही केले. पुढे रझाकारांच्या उपद्रवामुळे पाठशाळेला पुसद, बासर, जिंतूर, धुळे येथेही स्थलांतरित व्हावे लागले. या अलौकिक पाठशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ लोकाश्रयाचा आधार आणि ज्ञाननिष्ठेने प्रेरित विद्यार्थी व गुरुजन, पाठशाळेत विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची सोय निःशुल्क उपलब्ध होती. स्वतःच्या कुटुंबाअगोदर गुरुजींनी पाठशाळेचा व विद्यार्थ्यांचा विचार केला. कुठलाही अवघड विषय सोपा करून सांगणे यामुळेच विद्यार्थांमध्ये ज्ञानजिज्ञासा जागवण्यात ते यशस्वी झाले. कुणी विद्यार्थ्याने शिस्तभंग केला तर ते स्वतः उपवास करीत. शास्त्रीजींनी काही काळ आयुर्वेदिक महाविद्यालय, पीपल्स महाविद्यालय येथेही संस्कृत प्राध्यापक म्हणून सेवा केली.
शास्त्रीजींना लाभलेली पत्नीची सार्थ साथ त्यात मोलाची आहे. विद्यार्थ्यांची व्यवस्था, कौटुंबिक जबाबदारी रमाबाईंनी समर्थपणे पेलली. केवळ स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांवर अपत्यवत प्रेम व सुसंस्कार केले. शास्त्रीजींच्या पाठशाळेत अनेक विद्वान, वैदिक यांच्या चर्चा, वैचारिक देवाणघेवाण होत असे. अनेक विचारस्रोत एकाच व्यासपीठावर असत. त्यात प्रा. राम शेवाळकर, प्रा. नरहर कुरूंदकर असत. पाठशाळेतून शिक्षण घेतलेले आदरणीय शंकर महाराज कंधारकर, अनंत महाराज टाकळीकर, एकनाथ महाराज खडकीकर यांनी पुढे अलौकिक कार्य सुरु केले.
नांदेड येथे आपल्या मुलीच्या दिवाळसणानिमित्त जमलेल्या सर्व आप्तेष्टांचे पाश दूर करून त्यांनी वानप्रस्थ स्वीकारण्याचे ठरविले. रमाबाईही नेसत्या वस्त्रानिशी सोबत निघाल्या. सावरगाव संगमेश्वर या जालना जिल्ह्यातील लहानशा गावानजीक १९६६ मध्ये चतुर्वेदेश्वरची स्थापना केली. चारही वेदांचे शिक्षण देणारी ही भारतातील पहिली संस्था ठरली. निर्मनुष्य ठिकाण, सभोवताली जंगली श्वापदांची भीती, वीज आणि पक्के घर यांचाही अभाव अशा अज्ञात ठिकाणी वसिष्ठ ऋषी व अरुंधती माता यांच्याप्रमाणेच हे उभयता राहू लागले. वेदेश्वराने कोल्हापूर येथील वैद्य वामनाचार्यांना चतुर्वेद स्थापनेची आज्ञा दिली. अशा गोंदवलेकर महाराज यांच्या संप्रदायातील नामयोगी सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी (साखरखेर्डा, जि. बुलढाणा) यांच्या हस्ते चतुर्वेदेश्वराची स्थापना झाली.
कुठलेही सरकारी मानधन, मदत नसताना केवळ लोकाश्रयावरच आश्रमाची संपूर्ण व्यवस्था अवलंबून होती. कुणी अगदी एक रुपयाही दिला तरी तो श्रद्धेने स्वीकारून शास्त्रींनी त्याची रीतसर पावती देऊ केली. तन - मन - धन सर्वस्व अर्पण करून चतुर्वेदेश्वराची सेवा व अखंड ज्ञानदान चालू ठेवले. ज्ञानदानाचे कार्य चालू असतानाच त्यांनी संस्कृत भाषा, शास्त्रे, तर्कशास्त्र या विषयांवर लिखाण केले. यात शंकराचार्यांचा मायावाद, वाचस्पती मिश्रांच्या ‘भामती’ ग्रंथावरील भाष्याचे दोन भाग अशा दुर्मीळ पण आशयघन ग्रंथांची निर्मिती झाली. ‘प्रसिद्धीपराङ्मुखता’ हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य. पुरीच्या शंकराचार्यांकडून त्यांना ‘महामहोपाध्याय’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ‘विद्यानिधी’ पदवी गौरवपूर्वक देण्यात आली. गुरुजींच्या ज्ञानयज्ञाचेच फलित म्हणजे आज चतुर्वेदेश्वर ग्राम, आश्रमात चाळीस विद्यार्थी, अध्यापक वृंद व गोशाळा आहे. नानासाहेब पेशवे पुरस्कार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचा पुरस्कार आदी मिळाले; तरीही विनम्रता, वात्सल्य, त्यागी वृत्ती यांचे दर्शन सदोदित त्यांच्या आचरणातून घडत असे. ईश्वरनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, तपस्या, धर्मनिष्ठा यासारख्या गुणांनी संपन्न अशा महात्म्याचे भाद्रपद शु. प्रतिपदा (२४ ऑगस्ट २००६) रोजी सावरगाव आश्रमात निधन झाले. रामचरणी महानिर्वाण झाले, परंतु कार्यरूपाने त्यांचे व्यक्तित्व सर्वांना चिरंतन प्रेरणा देत आहे.