Skip to main content
x

कुलकर्णी, सलील श्रीनिवास

     गेल्या दहा-बारा वर्षांत ‘युवा पिढीची स्पंदने आपल्या सुरावटीतून नेमकेपणाने व्यक्त करणारा संगीतकार’ ही डॉ. सलील कुलकर्णी यांची ओळख आहे. सुरावट आणि वाद्यमेळ यात कविता हरवून जाऊ नये, यासाठी गीतातील शब्दांकडे सूक्ष्मतेने आणि संवेदनशीलतेने पाहणे, हे सलील यांचे वैशिष्ट्य मानले जाते.

     मुंबईच्या दादर परिसरात जन्मलेले सलील हे श्रीनिवास कुलकर्णी आणि रेखा कुलकर्णी या दांपत्याचे चिरंजीव. लहानपणापासून संगीताकडे त्यांचा कल असला तरी तो छंद जपत त्यांनी भारती विद्यापीठाच्या वैद्यक महाविद्यालयाची पदवी प्राप्त केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर काही वर्षे वैद्यकीय व्यवसायाचा अनुभव घेतल्यावर आपला कल संगीताकडेच आहे, हे उमगून वैद्यकीय पेशा बाजूला ठेवून पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

     दरम्यान त्यांनी पं. गंगाधरबुवा पिंपळखरे, जयमाला शिलेदार आणि प्रमोद मराठे यांच्याकडून संगीताचे मार्गदर्शन घेतले. या मार्गदर्शनाला डॉ. सलील यांनी स्वत:च्या एकलव्य वृत्तीची जोड देऊन संगीताची जाण समृद्ध केली. साहित्याविषयीचा जिव्हाळाही प्रथमपासून असल्याने, संगीतरचना करण्याकडे सलील यांचा अधिक कल राहिला.

     उत्तमोत्तम कवितांना चाली लावण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, त्यांची ‘तरीही वसंत फुलतो’, ही पहिली ध्वनिफीत १९९९ मध्ये प्रकाशित झाली. त्यापाठोपाठ ‘स्वप्नांत पाहिली राणीची बाग’, ‘संधिप्रकाशात’, ‘अबोली’, ‘सांग सख्या रे’, ‘आनंदपहाट’, ‘स्वरभाव’, ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘अग्गोबाई ढग्गोबाई’... अशा अनेक ध्वनिफिती प्रकाशित झाल्या. ‘आयुष्यावर बोलू काही’ या ध्वनिफीतीप्रमाणेच त्याचे रंगमंचीय कार्यक्रमही लोकप्रिय झाले. कवी संदीप खरे यांच्या कवितांना सलील यांनी दिलेल्या चाली युवा वर्गात विलक्षण गाजल्या. समकालीन कलाकार ध्वनिमुद्रित गाण्यांचे कार्यक्रम करत असताना फक्त स्वत:च्या रचनांचे कार्यक‘म लोकप्रिय करून स्वत:चे श्रोते निर्माण करण्याची किमया नव्या पिढीत डॉ. सलील यांनी संदीप खरे यांच्या साथीने करून दाखवली आहे. ध्वनिफिती, सीडी यानंतरचा टप्पा चित्रपटांचा होता. २००३ मध्ये सलील यांचे संगीत असलेला ‘विठ्ठल विठ्ठल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ‘पांढर’, ‘आनंदीआनंद’, ‘बदाम राणी गुलाम चोर’, ‘चिंटू’ आदी सुमारे २५ चित्रपटांना सलील यांनी संगीत दिले आहे. छोट्या पडद्यावरचा ‘नक्षत्रांचे देणे’ हा कार्यक्रम विशेष लक्षणीय ठरला. तसेच सारेगमपचे परीक्षणही त्यांनी केले. ‘मधली सुट्टी’ हा कार्यक्रमही ते छोट्या पडद्यावर सादर करतात. त्यांनी वृत्तपत्रीय सदरलेखनही केले असून ‘लपवलेल्या काचा’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. झी गौरव, मटा सन्मान, राज्य पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. संगीतकार म्हणून काम करताना पार्श्‍वगायक म्हणूनही त्यांनी मोजकेच काम करून ठसा उमटवला आहे.

     कविता, गाणी आणि आठवणी, तसेच संगीतरचनेची प्रकि‘या याविषयी सलील नेहमीच भरभरून बोलतात आणि अनेक रंगमंचीय कार्यक‘मात ते स्वत:च सूत्रधाराची भूमिका निभावतात. सलील हे ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह ‘मैत्र जिवांचे’ हा कार्यक‘मही सादर करतात. त्यांनी पुण्यात सलील कुलकर्णी म्युझिक स्कूल ही सुरू केले असून याद्वारे ते युवा कलाकारांना मार्गदर्शन करतात.

     सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकरही या क्षेत्रात आपले स्थान निश्‍चित करण्याच्या मार्गावर आहे.

     - जयश्री बोकील

कुलकर्णी, सलील श्रीनिवास