कुलकर्णी, विष्णू सखाराम
समाजात चित्रकलेविषयी प्रेम निर्माण व्हावे, चित्रकारांच्या कलाकृती समाजासमोर याव्यात व त्यातून कलाकारास प्रसिद्धीसोबतच अर्थार्जनही व्हावे म्हणून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने पुण्यात कार्यरत असणारे विष्णू सखाराम तथा व्ही.एस. कुलकर्णी मूळचे इचलकरंजीचे होत.
विष्णू सखाराम कुलकर्णी यांचा जन्मही इचलकरंजी येथे झाला. सीताराम धोंडो कुलकर्णी सौंदत्तीकर व जानकी यांचे हे शेवटचे म्हणजे चौथे अपत्य होय. नंतर ते सखाराम कृष्ण कुलकर्णी व सत्यभामा यांना दत्तक गेले. त्यांचे शालेय शिक्षण गोविंदराव विद्यालय, इचलकरंजी येथे झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी चित्रकार ज.द.गोंधळेकर यांना गुरुस्थानी मानले होते. त्यामुळे मॅट्रिक झाल्यावर कुलकर्णींनी जेथे गोंधळेकर शिकवीत त्या ‘रानडेज फाइन आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश घेतला व १९५१ मध्ये त्यांनी चित्रकलेत जी.डी. आर्ट ही पदविका संपादन केली. कलेचे शिक्षण घेत असतानाच अर्थार्जनासाठी महाराष्ट्र शासनाच्या फोटो झिंको मुद्रणालयात ते नोकरी करीत होते. १९५२ मध्ये त्यांचा विवाह शीला यांच्याशी झाला.
फोटो झिंको मुद्रणालयात नोकरी करीत असतानाच १९६५ च्या दरम्यान कुलकर्णी यांनी ‘चित्र-प्रिया’ नावाचे चित्र ग्रंथालय पुण्यात सुरू केले. समाजाला घरात, कार्यालयात मूळ चित्र लावण्याची सवय लागावी व चांगल्या चित्रांचा प्रसार व प्रचार व्हावा, असा त्यांचा हेतू होता. यात अनेक नामवंतांची व नवोदितांची मूळ चित्रे घेऊन, त्यांना फ्रेम करून अनेक संस्था, घरे यांतून सजावटीसाठी मांडली गेली. ही चित्रे प्रत्येक महिन्यात ते बदलत व यातून येणारे उत्पन्न त्या-त्या कलाकारांना देण्यात येई. असा प्रयोग पुण्यात प्रथमच होत होता व बरीच वर्षे तो यशस्वीही ठरला. १९८० मध्ये स्थापन झालेल्या चित्रकार ज.द.गोंधळेकर प्रतिष्ठानचे ते संस्थापक सदस्य होते व सध्या अध्यक्ष आहेत. भेदभाव बाजूस ठेवून या संस्थेतर्फे सर्व चित्रकारांना एकत्र आणणे, नामवंतांची चित्रप्रदर्शने भरविणे, इतिहासरूपाने चित्रकारांची सूची व माहितीचे दस्तावेज प्रसिद्ध करणे इत्यादी कार्ये सुरू आहेत. १९८८ पासून सुरू झालेल्या लोकमान्य टिळक व बॅ.व्ही.व्ही. ओक अखिल भारतीय कलाप्रदर्शनांचे निमंत्रक म्हणून ते कार्यरत आहेत.
वास्तववादी शैलीतील व्यक्तिचित्रे रंगविण्यात व्ही.एस. कुलकर्णी यांनी प्रावीण्य मिळविले. त्यांची व्यक्तिचित्रे पुणे महानगरपालिका, टिळक स्मारक मंदिर, नॅशनल डिफेन्स अकॅडमी; सावरकर भवन; मुंबई; सेल्युलर जेल; अंदमान, अशा अनेक ठिकाणी लागली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजीचा स्वातंत्र्यप्राप्तीचा सुवर्णक्षण त्यांनी चित्रित केला असून ‘सत्तांतर’ या त्यांच्या भव्य चित्राचे दिल्लीतील संसदेच्या विस्तारित कक्षात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते २००१ मध्ये अनावरण झाले होते. त्यातून मिळालेल्या मानधनातून त्यांनी ‘व्ही.एस. कुलकर्णी प्रतिष्ठान’ सुरू केले. या प्रतिष्ठानातर्फे नवोदित चित्रकारांना मार्गदर्शनासाठी व प्रदर्शनासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
‘ऑल इंडिया फाइन आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी’ या दिल्लीतील संस्थेतर्फे ज्येष्ठ चित्रकार म्हणून त्यांचा सन्मान झाला असून इचलकरंजीच्या ‘फाय फाउण्डेशन’च्या १९९४ सालच्या पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.