Skip to main content
x

खानखोजे, पांडुरंग सदाशिव

       पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म वर्धा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण वर्धा येथे झाले व माध्यमिक शिक्षण नागपुरातील सिटी हायस्कूलमध्ये झाले. स्वातंत्र्यलढ्यासाठी व समाजसुधारणेसाठी त्यांनी बालसमाज, आर्य बांधव समाज, श्री समर्थ शिवाजी समाज व हनुमान आखाडा इ. सामाजिक उपक्रम सुरू केले. तसेच देशाचा विकास व्हावा, तो स्वावलंबी व्हावा, लोकांचे विशेषतः शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारावे, यासाठी त्यांनी आटोकाट परिश्रम घेतले. विविध देशांना भेटी देणे, तेथील शेतीतील प्रश्‍न अभ्यासणे, प्रत्यक्ष शेतात काम करणे, विद्यापीठांतून शिक्षण घेणे, संशोधन करणे, प्रयोगशाळा उभारणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतीत प्रयोग करणे, शेतमालावरील प्रक्रियेत सुधारणा करणे, नवी पिके शोधणे, अधिक उत्पादन देणारी नवीन बी-बियाणे शोधणे व त्यांचा प्रसार करणे, आधुनिक शास्त्रीय ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, अशा विविध स्तरांवर त्यांनी शेतीत आपले योगदान दिले.

अमेरिकेला जाऊन तेथून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावेे, या उद्देशाने खानखोजे यांनी पूर्वेकडे प्रयाण केले. जपानला त्यांचा शेती व्यवसायाशी जवळचा संबंध आला. जपानमधील आधुनिक शेतीची ओळख व्हावी; म्हणून त्यांनी शेतावर नोकरी केली. जपानी शेतकरी स्वतःचे मलमूत्र शेतात पसरवतात व शेतीला जैविक खत देतात, हे त्यांना अत्यंत स्तुत्य वाटले. त्यांना त्या खताची उपयुक्तता व श्रमप्रतिष्ठेचा असामान्य गौरव यामुळे नवीन दृष्टी मिळाली.

शेतीला जोडधंदाही पाहिजे, हे त्यांना पटले. जपानमधील वास्तव्यात साबण, आगपेट्या, टिनचे डबे आणि खेळाच्या वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान ते शिकले. जपानहून खानखोजे अमेरिकेत कॅलिफोर्नियाला गेले. पुढील शिक्षणासाठी पैसे जमवून बर्कले विद्यापीठातील कृषिशास्त्र विभागात प्रवेश घेतला. तेथील मुख्य पुस्तकालय, उत्तम प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, निष्णात प्राध्यापक वर्ग, प्रात्यक्षिके यांचा खानखोजे यांच्यावर खोलवर परिणाम झाला.

खानखोजे यांनी फळबागांमध्ये नोकरी करून  फळझाडांची लागवड, फळांची तोडणी, स्ट्रॉबेरी व हॉपची फुले वेचणे, फळांचे पॅकिंग यासंबंधीची शास्त्रशुद्ध माहिती मिळवली. नंतर ते मेरीज व्हिले या गावी ‘फळ संरक्षण आणि कॅनिंग’ कारखान्यात फळ परीक्षण व फळ डबाबंद करणे या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकले.

उन्हाळ्याच्या सुट्टीत नोकरीसाठी खानखोजे सिअ‍ॅटल या गावी गेले. तेथे रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. दुर्दैवाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत मंदी आली. त्यामुळे कॅनडा व अमेरिकेत परदेशी मजुरांवर बंदी आली. मेक्सिकोत सोन्या-चांदीच्या खाणींचा शोध लागला होता व त्यांना मजूर हवेे होते. तेथे परदेशी मजुरांवर बंदी नसल्यामुळे खानखोजे मेक्सिकोला गेले.

सुट्टी संपल्यावर खानखोजे यांनी ओरेगॉन कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. बर्कले येथे त्यांनी चार सेमेस्टर पूर्ण केल्या होत्या व संरक्षण अकादमीत एक वर्ष शिक्षण घेतले होते. त्यामुळे ओरेगॉन विद्यापीठातील एक वर्ष शिक्षण घेतल्यावर त्यांना बी.एस. (१९११) ही कृषिशास्त्र शाखेतील पदवी मिळाली. त्यांनी पुलमन येथील वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात एम.एस.साठी प्रवेश घेतला. त्यांना प्राध्यापक डॉ. थॅचर व प्रा. थाम यांनी विभागातच नोकरी दिली. आयडाहो, ओरेगॉन, उटाह, नेवाडा ही शेजारची राज्ये दुष्काळी होती. तेथे १०/१२ इंचच पाऊस पडे, पण पिके मात्र रसरशीत व हिरवीगार असत. हे पाहून कोरडवाहू शेतीत खानखोजे यांनी विशेष लक्ष घातले, कारण भारतातही परिस्थिती दुष्काळीच असे. नापीक जमीन सुपीक करणे, आधुनिक अवजारे, खतांचा योग्य उपयोग यांद्वारे कोरडवाहू शेतीही फायदेशीर ठरू शकते हे त्यांना पटले. भारतीय शेती व अमेरिकेतील शेतीवर तौलनिक टिपणी ते अशी करतात की, ‘पाश्‍चात्त्यास शेतकीत सधन बनता येते व भारतीयास शेतकीत कर्जबाजारी बनता येते. त्यासाठी भूमी परीक्षण, पाणी वापर, मशागत याबाबत शेतकर्‍यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.’

खानखोजे यांनी पीक, प्राणी, शेती, प्रकाश, उष्णता-हवा आणि वनस्पती, पीक आणि रोग यांविषयी संशोधन केले. प्रा. थॅचर, थॉम, होल्टन व थॉमस हे प्राध्यापक त्यांना मार्गदर्शन करत व प्रोत्साहन देत. त्यांनी शेतीप्रमाणेच पशुधनावरही संशोधन केले. अधिक दूध देणार्‍या गाई, गोवंश सुधार, पशुपालन इत्यादी विषयांतील त्यांचे प्रावीण्य पाहून अमेरिकन ब्रीडर्स असोसिएशन या प्रसिद्ध संस्थेने त्यांना आजीव सभासदत्व दिले. प्राध्यापकांच्या सहकार्याने खानखोजे यांनी ‘अमेरिकन सोसायटी फॉर द अ‍ॅग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड सायंटिफिक ट्रेनिंग इन इंडिया’ ही संस्था स्थापिली. तसेच त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी या संस्थेचे सभासदत्वही मिळाले. एम.एस.चे शिक्षण घेत असताना खानखोजे यांना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. बुकर टी. वॉशिंग्टन यांचे व्याख्यान ऐकायची व त्यांच्याशी शेतकी विषयावर चर्चा करण्याची संधी मिळाली व अलबामा येथील टस्कगी विद्यापीठाला भेट देण्याचे आमंत्रणही मिळाले.

वॉशिंग्टन येथे अमेरिकन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रॉनॉमीच्या वार्षिक संमेलनाला हजर राहण्याचे खानखोजे यांनी ठरवले. वाटेत त्यांनी टस्कगी विद्यापीठाला भेट दिली. हे विद्यापीठ स्वावलंबी, औद्योगिक आणि कृषिशास्त्रात अग्रणी म्हणून नावाजलेले होते. व्यावहारिक शिक्षणाचे धडे देणारी संस्था म्हणून ती प्रसिद्ध होती. ‘कमवा आणि शिका’ या योजनेमुळे कोणतेही उच्च शिक्षण गरिबातल्या गरिबालाही शक्य आहे, हे त्यांनी सिद्ध केले. खानखोजे यांनी टस्कगी विद्यापीठातील कृषि-संशोधक डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचीही भेट घेतली. त्यांच्या संशोधन कार्याचा विशेषतः बटाटे, रताळी यांसारख्या पदार्थांवरील प्रक्रियेतून औद्योगिक विकास या संकल्पनेचा खानखोजे यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. वॉशिंग्टन विद्यापीठातील संमेलनात खानखोजे यांनी ‘रोपट्यांसाठी पाण्याच्या गरजेवर प्रभाव टाकणारे घटक’ (१९१३) हा निबंंध वाचला. या निबंधाचा नवीन पाठ्यपुस्तकात समावेश केला.

पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांविरुद्ध अनेक राष्ट्रे युद्धास उभी राहिली. भारतात ब्रिटिशांविरुद्ध उठाव करावा व स्वातंत्र्य मिळवावे, असा खानखोजे व त्यांच्या मित्रांनी विचार केला व त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. जर्मनी, तुर्कस्थान, रशिया, मध्य पूर्वेतील इराण, इराक, अफगाणिस्तान या देशांत खानखोजे गेले. तेथून गनिमी फौज घेऊन भारतात क्रांती घडवून आणण्याची त्यांची योजना होती. यानिमित्ताने स्पेन, कॉन्स्टॅन्टिनोपल, बर्लिन, बगदाद, बुशायर, सीराज, निरीज, केरमान, सिर्ईस्तान या भागांत खानखोजे यांनी सैन्यासह प्रवेश केला. तो भाग ताब्यात घेतला व १९१६ साली स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा केली. या भागात खानखोजे हे महंमद खान या नावाने फिरत होते.

पुढे खानखोजे यांनी इराणी पारपत्र मिळवले व हाजी आगाखान या नावाने हिंदुस्थानात प्रवेश मिळवला. त्यांनी नुकत्याच मंडालेहून सुटलेल्या टिळकांची भेट घेतली. नंतर ते मेक्सिकोला गेले. मेक्सिकोचे राष्ट्रीय कृषी विद्यापीठ चापिंगो या गावात नव्याने उभारले जात होते. तेथे त्यांना रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत नोकरी मिळाली. तेथे ते कृषीचे प्रयोग करत. राष्ट्राध्यक्ष ओब्रेगान हे विद्यापीठाला भेट देण्यास आले असता त्यांना खानखोजे यांचे प्रयोग दिसले. मक्यावरील त्यांच्या प्रयोगाला प्रथम पारितोषिक व विशेष पुरस्कारही मिळाला. त्याची परिणती म्हणून त्यांना विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली.

त्यांनी गव्हावरही प्रयोग करून गव्हाचे विविध वाण विकसित केले. त्यांनी पावसाळ्यात व उन्हाळ्यात येणारी गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, अशा अनेक जाती विकसित केल्या. १९२९च्या राष्ट्रीय प्रदर्शनात त्यांना एक हजार पेसोंचा प्रथम पुरस्कार मिळाला, तसेच सन्माननीय पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

मेक्सिकन सरकारने आधुनिक कृषिशास्त्र शिकवण्यासाठी कृषी शाळा स्थापन करायचे ठरवले. त्यासाठी संपूर्ण देशाचा अभ्यासदौरा करून शासनास योग्य त्या सूचना करण्यासाठी समिती नेमली. त्या समितीवर खानखोजे यांची नेमणूक केली. यानिमित्ताने खानखोजे यांना संपूर्ण मेक्सिको देशभर फिरून तेथील प्रश्‍न समजावून घेता आले व लोकांचे प्रबोधनही करता आले. अनेक ठिकाणी कृषी संघ स्थापन केले. पुढे राष्ट्रीय पातळीवर त्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला. त्याच्या अध्यक्षपदी खानखोजे यांची नेमणूक करण्यात आली.

मका हे मेक्सिकोचे महत्त्वाचे पीक. त्यांनी मक्याचे उत्पादन व दर्जा यात क्रांतिकारक सुधारणा केल्या. टिओसिंटे या जंगली वनस्पतीबरोबर मक्याचा संकर करून त्यांनी एकाच ताटाला अनेक कणसे लागणारी नवीन जात शोधली. अशा मक्याच्या शेेतात उभ्या असलेल्या खानखोजेंची छायाचित्रे वर्तमानपत्रांतून ‘हिंदू जादूगार शेतीत चमत्कार करत आहे.’, या मथळ्यासह येऊ लागली. मेक्सिको सरकारने त्यांची शेतीविषयीची पुस्तके प्रसिद्ध केली. १९३० साली मेक्सिकन सरकारने त्यांना संशोधनातला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. Nuevas Variedades de maiz & Maiz Grenada Zea masy Digitata या खानखोजेंच्या दोन संशोधनपर लेखांनी शेतीत क्रांती घडवून आणली.

मक्याचे कणीस तोडल्यावर त्यावरील हिरवे पान पांढरे पडत असे. ग्राहकाला हिरवेगार कणीस अधिक आकर्षित करते. खानखोजेंनी नवी वेष्टन पद्धत शोधून काढली. त्यामुळे पान अनेक दिवस हिरवेगार राहू लागले व मेक्सिकोतून अमेरिकेला होणारी मक्याची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. खानखोजे यांनी अनुवंशशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी तूर, चवळी, सोयाबीन, वाल यावर संशोधन करून अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्याचप्रमाणे त्यांनी बहुवर्षीय तुरीचे झाड शोधले. ते झाड वर्षातून दोन वेळा पीक देत असे.

त्यांनी शेवग्याच्याही नवीन जाती शोधून काढल्या. शेवग्याच्या बीपासून सुगंधी द्रव्य निर्माण केले. शेवग्याचा पाला, शेंगा, खोड, मुळी या प्रत्येकाचा उपयोग करता येतो, हे त्यांनी सिद्ध केले व त्याचा प्रचार केला. त्यांनी टोमॅटो, लिंबू व अन्य फळांवर पडणारा लाल खवल्यांचा रोग, तसेच पशुखाद्य व निवडुंग यावरील अभ्यास करून शेतकर्‍यांना उपयोगी पडतील अशा पुस्तिका तयार केल्या. मेक्सिकन सरकारनेही त्यांची उपयुक्तता जाणून पुस्तिका प्रकाशित केल्या व त्या सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था केली.

खानखोजे आपल्या उत्पन्नातील काही भाग जमीन खरेदीवर खर्च करत. त्यातील काही जमीन ते गरिबांना देत व त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देत. त्यांच्या शेतावर प्रयोग करत. स्वतःच्या जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करून त्याचा किफायतशीरपणा पाहत व यशस्वी प्रयोग शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळवून देत. त्यांचे प्रयोग कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली आणि त्यातही ते आपले प्रयोग करत. त्यांच्या प्रयोगशीलतेला मेक्सिको सरकारनेही दाद दिली. त्यांनी खानखोजेंना दहा हजार एकर पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी दिली. त्यावर काम करणार्‍यांना, शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, शेतीचे यांत्रिकीकरण करणे या गोष्टी त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास मंडळ युरोपच्या दौर्‍यावर गेले. फ्रान्स, स्पेन, हॉलंड, जर्मनी इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या.

मेक्सिकोत केळी, कॉफी, व्हॅनिला यांसारखी व्यापारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जात. त्यांची अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यातही केली जाई, पण त्या निर्यात व्यापारातून होणारा फारच थोडा फायदा प्रत्यक्ष  शेतकर्‍यांपर्यंत पोहोचे म्हणून व्हेराक्रूज राज्याचे गव्हर्नर  तेखेदा यांच्या सहकार्याने खानखोजे यांनी प्रत्येक पिकाची वेगळी शाळा सुरू केली आणि त्याद्वारे शेतकर्‍यांना निर्यातीचेही शिक्षण दिले. त्यांच्या या कार्यामुळे गव्हर्नर तेखेदा खूश झाले व त्यांनी खानखोजे यांना त्या संस्थानचे प्रतिनिधी म्हणून मेक्सिको राजधानीत सल्लागार समितीवर पाठवले. यामुळे राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची व अधिकार्‍यांची त्यांच्याशी ओळख झाली.

सदर्न पॅसिफिक रेल्वे कंपनीने मेक्सिको व अमेरिकेला जोडणारी हजार मैल लांबीची रेल्वे बांधली, परंतु ज्या प्रदेशातून ही रेल्वे जात होती, तो भाग निर्जन होता. त्यामुळे रेल्वे तोट्यात चाले. रेल्वे कंपनीने हा भाग लागवडीखाली आणण्याचे ठरवले. या निर्जन प्रदेशाचे सुजलाम सुफलाम भूमीत रूपांतर करण्याचे अत्यंत अवघड काम रेल्वेने खानखोजेंना दिले आणि त्यांनीही ते समर्थपणे पेलले. त्या जमिनीवर खानखोजेंनी अनेक कृषी प्रयोग केले. अनेक स्टेशनांच्या व रुळांच्या भोवती त्यांनी कृषिपिके घेतली. शेतीचा प्रसार व प्रचार केला.

युद्धकाळात रबराला मोठ्या प्रमाणावर मागणी येऊ लागली. मेक्सिकोत अनेक ठिकाणी रबराची लागवड केली जाई. खानखोजेंनी मेक्सिकोतील रबर-जंगलांना भेटी दिल्या व या झाडांचा शास्त्रीय अभ्यास केला. त्याची पुस्तिकाही काढली व शेतकर्‍यांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर मागणीही आली. अमेरिकेतही रबर लागवडीविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी खानखोजेंची समक्ष भेट घेतली. मेक्सिको व ग्वाटेमाला येथे रबराची लागवड वाढवण्यासाठी खानखोजेंना आमंत्रण देण्यात आले. ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स, अमेरिका’ यांनी त्यांचा गौरव केला व डिक्शनरी ऑफ रीसर्च सायंटिस्ट ऑफ अमेरिका यात त्यांची नोंद झाली.

पूर्वी अमेरिकेत माकडांच्या ग्रंथीतून मानवाला उपयुक्त अशी हार्मोन्स मिळवली जात, पण पुढे माकडांचा असा उपयोग करण्यावर बंदी आली आणि अशा हार्मोन्सचा तुटवडा भासू लागला. याची जाणीव ठेवून खानखोजेंनी संशोधन केले व दक्षिण अमेरिकेतील वनस्पतींचा अभ्यास करून ‘मध्वालु’ या जंगली कंदांपासून आवश्यक ते हार्मोन्स मिळवले. त्यांनी अमेरिकन मित्राच्या साहाय्याने बोरानी मॅक्स कं. स्थापली. मेक्सिकोतील जंगली झाडांपासून प्रोजेस्टिरीन व टेस्टोस्टिरीन या औषधांचे उत्पादन सुरू केले.

मेक्सिकन सरकारने मसाल्याचे पदार्थ निर्माण करण्याच्या उद्देशाने खानखोजे यांना साडेचार हजार एकर जमीन दिली. खानखोजेंनीही त्याचा उपयोग कृषी प्रयोगशाळा (१९४४)  उभारण्यासाठी केला. खानखोजेंनी आपल्या प्रयोगशीलतेच्या जोरावर अनेक प्रकारचे अन्नपदार्थही तयार केले व ते लोकप्रिय केले. 

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. खानखोजेंना भारतात परत येण्याची इच्छा झाली. १९४९मध्ये खानखोजेंना ही संधी मिळाली. मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री रा.कृ. पाटील यांनी मध्य प्रदेशात शेतीसुधारणा करण्यासंबंधात खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मेक्सिकन सरकारनेही त्यांना भारतात जाण्यास परवानगी दिली. ते नागपूरमध्ये पोहोेचल्यावर त्यांचे मोठ्या उत्साहाने सर्वत्र स्वागत झाले, परंतु इथले दारिद्य्र पाहून ते फार दुःखी झाले, कारण त्याच काळात इतर देशांत झालेली प्रगती त्यांनी अनुभवली होती.

त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचे काम मुख्यत्वे पाच गोष्टींशी संबंधित होते ः १) शेतकी शिक्षण, २) कृषी संशोधन, ३) डेमॉन्स्ट्रेशन फार्म्स, ४) लोकशिक्षण, ५) यांत्रिकीकरण, सहकार शेती.

खानखोजे यांनी ग्रामीण भागात दौरा केला. त्यांनी प्रश्‍नपत्रिका तयार करून त्या लोकांकडून भरून घेतल्या. त्याआधारे आपला अहवाल दिला. विविध प्रकारच्या २९ सूचना दिल्या. शेेतीचे यांत्रिकीकरण, शेतकी शाळांची निर्मिती, प्राथमिक कृषिशास्त्राचे शिक्षण, मजुरांचे वेतन, पडीक जमिनी सरकारने ताब्यात घेणे व त्यावर सामूहिक शेतीचे प्रयोग करणे इत्यादी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सूचना त्यात होत्या. समितीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर भारताचे नागरिकत्व मिळण्यातही त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे ते मेक्सिकोला (१९५१-५५) परत गेले. तरी तेथे त्यांचे मन रमेना. आपली  प्रयोगशाळा, ग्रंथसंग्रह, फर्निचर, शेतजमीन विकून त्यांनी प्रवासखर्चाची सोय केली व ते परत हिंदुस्थानात आले. सरकारने त्यांच्यासाठी फारसे काही केले नाही, पण लोकांनी त्यांच्यासाठी दहा हजार रुपयांचा फंड जमा करून सेनापती बापट यांच्या हस्ते एका सत्कार समारंभात त्यांना अर्पण केला. नागपूर विद्यापीठात त्यांना वसतिगृहाचे प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. संत्रा उत्पादकाच्या सहकारी संस्थेचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

खानखोजे ‘मुक्त-ग्राम’ या आपल्या संकल्पनेचा प्रचार करत. प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण व्हावे; अशी ती योजना होती. क्रमशः आधुनिक यंत्रे खेड्यात आणावीत व ग्रामीण भागाचे औद्योगिकीकरण करावे, अशी त्यांची संकल्पना होती. नागपूर आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. त्याद्वारे त्यांनी अनेक शेतीप्रश्‍न चर्चिले. शेतकर्‍यांचा पौष्टिक आहार, कुंपणासाठी झाडे, शेतीची सुधारलेली अवजारे, जमिनीची धूप व त्यापासून संरक्षण, जनावरांचे पौष्टिक अन्न, शेतकरी संघ, जंगली झाडांपासून नवी उत्पादने इत्यादींवर त्यांनी भाषणे दिली. टाकाऊ वनस्पतीच्या मुळ्या, खोडं वगैरेपासून खाद्यपदार्थ कसे करावेत हे ते सांगत व स्वतः करून खात. त्यांनी भारतीयांना सोयाबीनची ओळख करून दिली.

सन १९६१मध्ये खानखोजेंना भारतीय नागरिकत्व मिळाले. नागपूरमध्ये घरासाठी भूखंड मिळाला. त्यांना  १९६३मध्ये स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता व निवृत्ती वेतन मिळू लागले. वार्धक्यामुळे जीवन जगणे कठीण होऊ लागले होते, पण ते शेवटपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या आयुष्यातील शेेवटच्या दिवशीही कृषी विभागाच्या रौप्य महोत्सवात ते सहभागी झाले होते.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

खानखोजे, पांडुरंग सदाशिव