खेत्रपाल, अरुण एम.
अरुण एम. खेत्रपाल यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील ब्रिगेडिअर एम.एल.खेत्रपाल कोअर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली होईल तिथे तिथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. आणि पाचवी ते दहावी ते सनवार मधल्या लॉरेन्स शाळेमध्ये होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन.डी.ए.) ते स्क्वॉड्रन कॅडेट कॅप्टन होते आणि डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अॅकॅडमीत सिनिअर केडर ऑफिसर होते.
१३ जून १९७१ रोजी ते इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमधून नियुक्त अधिकारी (कमिशन्ड ऑफिसर) झाले. ‘पूना हॉर्स’ मध्ये त्यांची भरती झाली. वाहनचालक, गनर, रेडिओ ऑपरेटर, कमांडर ते रेजिमेंटचा नेता ही सर्व पदे त्यांनी सांभाळली. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांना लढण्याची संधी मिळाली. भारत-पाक युद्धात बसंतारच्या लढाईत यांनी भरीव कामगिरी केली. १६ डिसेंबर १९७१ रोजी पूना हॉर्सच्या ‘बी’ स्क्वॉड्रनच्या स्क्वॉड्रन कमांडरने अधिक फौजेची मागणी केल्यावर ते आपले पथक घेऊन स्वत:हून गेले. बसंतार नदी पार करत असताना त्यांच्या सैनिकांवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. तेव्हा ते शत्रूच्या मुख्य मोर्चांवर तुटून पडले. त्यांच्या रणगाड्यांनी शत्रूच्या बचाव फळीवर सरळ धडक दिली. शत्रूच्या सैनिकांना ताब्यात घेतले. शत्रुसैन्याच्या सर्व ठाण्यांचा प्रतिकार संपेपर्यंत ते सतत लढत होते. रणांगणातून माघारी परतणाऱ्या रणगाड्यांचाही त्यांनी पाठलाग केला. शत्रूचे एकूण १० रणगाडे त्यांनी स्वत: नष्ट केले. या लढाईतच ते जबर जखमी झाले. त्यांना रणगाडा सोडण्याचा आदेश मिळाला तरीही शत्रूला चारही मुंड्या चित करण्याच्या आंतरिक उर्मीमुळे त्यांनी रणगाडा सोडला नाही. त्यांनी शत्रुसैन्याची प्रचंड हानी केली. त्यांच्या रणगाड्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला. त्यातच या अधिकाऱ्याला वीरमरण आले.
“नाही सर, मी माझ्या रणगाड्यावरून उतरणार नाही. माझी बंदूक अजून काम करते आहे. मी त्यांचा पाडाव करेन....” हा शेवटचा संदेश अरूण खेत्रपाल यांनी त्यांच्या अधिकार्यांना पाठवला होता. त्याक्षणी त्यांच्या रणगाड्यावर हल्ला झाल्याने रणगाडा पेटला होता. पण तरीही त्या भागातून शत्रूला पुढे येऊ द्यायचे नाही. ह्याची जाणीव असल्यानेच अरूण खेत्रपाल यांनी रणगाड्यातून बाहेर पडण्यास नकार दिला. खेत्रपाल यांच्या धडाडीमुळे शत्रुसैन्याच्या एकाही रणगाड्याला प्रवेश करता आला नाही. १९७१ च्या भारत-पाक युद्धातली ही महत्त्वाची घटना ठरली. त्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘परमवीर चक्र’ प्रदान करण्यात आले. उत्तम नेतृत्वगुण, उद्दिष्टाला चिकटून राहण्याची उर्मी व शत्रूला थेट भिडण्याची मनीषा या गुणांचा प्रत्यय त्यांच्या लढ्यातून आला.