खुणे, नरहरी नारायण
नरहरी नारायण खुणे यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील कन्हाळ गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण ब्रह्मपुरी येथे झाल्यावर त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. त्याच महाविद्यालयातून १९६१मध्ये वनस्पती -रोगशास्त्रात एम.एस्सी. (कृषी) प्रथम श्रेणीत ४थ्या क्रमांकाने मिळवली. त्यांनी १९६१ ते १९६४ या काळात ‘रुरल इन्स्टिट्यूट, अमरावती’ येथे नोकरी केली. त्यांची १९६४मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रासाठी निवड झाली. तेथे त्यांनी गव्हाच्या पिकावर तांबेरा, काणी, करपा हे रोग होऊ नयेत म्हणून संशोधन केले. गव्हाच्या तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी त्यांनी मॅन्कोझेब औषध शोधून काढले. या औषधाच्या तीन फवारण्या पंधरा दिवसांच्या अंतराने केल्यावर रोग आटोक्यात आल्याचे दिसून आले. या औषधाची शेतकऱ्यांच्या शेतावर रोगप्रतिबंधक म्हणून शिफारस करण्यात आली.
डॉ.पं.दे.कृ.वि.च्या स्थापनेनंतर त्यांची १९६९मध्ये तेथील कृषी महाविद्यालयात बदली झाली. १९७३मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे भा.कृ.अ.सं., दिल्ली येथे त्यांनी जागतिक कीर्तीचे डॉ.जे.एन. कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे संशोधन करून पदवी मिळवली. नंतर ते परत अकोला येथे वनस्पती -रोगशास्त्र विभागात रुजू झाले. त्यांनी कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना एम.एस्सी.(कृषी) व पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. १९८४मध्ये विद्यापीठातर्फे डी.के.बल्लाळ उत्तम शिक्षक पारितोषिक व रौप्यपदक देऊन त्यांचा महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल लतीफ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भा.कृ.अ.प.,नवी दिल्ली या संस्थेच्या वनस्पती -विकृतिशास्त्र संस्थेने त्यांना एफ.आय.पी.एस. मानद पदवी प्रदान केली.
डॉ.खुणे यांनी सौर ऊर्जेचा वापर करून वांगी, टोमॅटो, मिरची व संत्री या पिकांच्या रोपवाटिकेतील रोपे रोगमुक्त ठेवण्यात यश मिळवले. ही रोपे सर्वसाधारण रोपांपेक्षा दीडपट उंच वाढलेली दिसली. हे सौर ऊर्जेचे काम त्यांनी नागपूर कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर १९९२-९३मध्ये केले. सौर ऊर्जेमुळे जमीन आतून तापत होती. जमिनीची उष्णता वाढल्याने जीवाणू नष्ट झालेले आढळले. या वाफ्यावर लावलेली भाजीपाल्याची रोपे निर्जंतुक राहिली व त्यांची वाढही उत्तम झाली. म्हणजेच सौर ऊर्जेचा वापर करून रोपवाटिकेमध्ये निर्जंतुकीकरण करता येते व ते फायदेशीर ठरते असे सिद्ध झाले.
डॉ.खुणे यांनी प्रयोगशाळेत अळंबी वाढवून शेतकऱ्यांना डिंगरी व्यवस्थापन व लागवड यांच्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यापीठातील वनस्पती -रोगशास्त्र विभागात एक संग्रहालय स्थापन करण्याचे कार्य झाले. विकृतिशास्त्र पश्चिम विभागासाठी त्यांची सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून १९८०मध्ये निवड झाली. ते १५ फेब्रुवारी १९९५ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी निवृत्तीनंतर ३ वर्षे य.च.मु.वि., नाशिक येथे वनस्पति-रोगशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर २ वर्षे रायपूर, छत्तीसगढ येथील दंतेश्वरी उद्यान महाविद्यालयात प्राचार्यपदही भूषवले.