Skip to main content
x

लक्ष्मण, आर. के.

लक्ष्मण, आर.के.

     र.के. लक्ष्मण हे भारतीय व्यंगचित्रकलेतले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सर्वाधिक लोकप्रिय व्यंगचित्रकार आहेत. त्यांचा जन्म म्हैसूर येथे झाला. त्यांचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते. प्रसिद्ध इंग्रजी लेखक आर.के. नारायण हे लक्ष्मण यांचे मोठे भाऊ होते. आर.के. नारायण यांचा लक्ष्मण यांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांसाठी लक्ष्मण यांनी चित्रे काढलेली आहेत. वडिलांच्या शाळेत येत असलेल्या ‘हार्पर्स’, ‘पंच’, अ‍ॅटलांटिक’ अशा पाश्चात्त्य नियतकालिकांमुळे. लक्ष्मण यांच्यावर व्यंगचित्रांचे संस्कार शालेय वयातच झाले.

      लक्ष्मण यांनी म्हैसूर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांना चित्रकलेची आवड होती. परंतु सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. लक्ष्मण यांनी तरीही आपला चित्रकलेचा सराव चालू ठेवला. पदवीधर झाल्यानंतर लक्ष्मण यांनी दिल्लीच्या ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला; पण ‘या कामासाठी तुम्ही खूप लहान आहात’ असे सांगून त्यांना ‘हिंदुस्तान टाइम्स’ने नकार दिला. लक्ष्मण मुंबईत आले आणि ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये त्यांनी व्यंगचित्रे काढण्यास सुरुवात केली. नंतर सहा महिन्यांतच ते टाइम्स वृत्तसमूहात आले आणि ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे व्यंगचित्रकार बनले. त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ व्यंगचित्रे काढली आहेत. 

      व्यंगचित्रांशिवाय अनेक पुस्तकांची रेखाटने आणि पुस्तके अशी त्यांची अजोड कामगिरी आहे. लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’ने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. ‘यू सेड इट!’ (कसं बोललात!) हे पॉकेट कार्टून प्रदीर्घ कालावधीसाठी चाललेलं एकमेव सदर आहे. त्यातला हा ‘कॉमन मॅन’ म्हणजे कधी राजकीय, कधी सामाजिक परिस्थितीला कायम साक्षी असणारा सद्गृहस्थ आहे. टाइम्सच्या पहिल्या पृष्ठावर २ डिसेंबर १९५७ रोजी लक्ष्मण यांचे हे सदर आणि हा कॉमन मॅन प्रसिद्ध झाला. धोतर, चौकड्यांचा कोट, चष्मा, मिशा आणि डोक्यावर पांढरे विरळ केस असे या कॉमन मॅनचे रूप अजरामर ठरले. कॉमन मॅन फक्त ऐकत असतो — कधी नेत्यांची भाषणबाजी, कधी पोलिसांचा, तर कधी कार्यालयीन शिपायाचा साळसूदपणा.

      ‘कॉमन मॅन’मागे भारतीय सामान्य माणसाची जगाकडे पाहण्याची दृष्टी असावी, असे त्या वेळच्या ‘टाइम्स’च्या संपादकांना अपेक्षित होते. सगळीकडे वावरणारा व समस्या पाहून गोंधळणारा हा कॉमन मॅन असावा, असे त्याला तयार करताना लक्ष्मण यांनी ठरविले होेते. या कॉमन मॅनचा गोंधळ पाहून भारतातली जनता हसावी अशी त्यांची अपेक्षा होती आणि या सामान्य जनतेला कळण्यासाठी—हसविण्यासाठी चित्रातली समस्या अधिक सुटसुटीत, अधिक स्पष्ट करून दाखविण्याची त्यांची तयारी होती. त्यानुसार या ‘यू सेड इट’चे स्वरूप तयार झाले. ते अतिशय लोकप्रिय ठरले.

      लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांइतकीच राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींची त्यांनी काढलेली अर्कचित्रे (कॅरिकेचर्स), तसेच ‘सायन्स टुडे’मधील विज्ञान विषयावरची व्यंगचित्रे विलक्षण गाजली. व्यंगचित्रांशिवाय आर.के. नारायण आणि इतर लेखकांच्या पुस्तकांना लक्ष्मण यांनी रेखाचित्रे काढली आहेत. अनेक जाहिरातींसाठी त्यांनी इलस्ट्रेशन्स केली. ‘यू सेड इट’चे अनेक भाग, ‘बेस्ट ऑफ आर.के. लक्ष्मण’, ‘फेसेस’, ‘फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेण्डन्स’, ‘थू्र दी आइज ऑफ आर.के. लक्ष्मण’ ही त्यांची व्यंगचित्रांची पुस्तके, तर ‘द टनेल ऑफ टाइम’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

      लक्ष्मण हे एक भाष्यकार आहेत. त्यांच्या संवेदनशील मनाला भोवतालच्या बदलत्या परिस्थितीचे उत्तम भान आहे. त्यातल्या विसंगती चटकन टिपणारी सतर्कता आहे आणि ते मूर्त शैलीत, ग्रफिक पद्धतीने, सर्वांना समजेल अशा प्रतीकांच्या भाषेत मांडण्याची विलक्षण हातोटी आहे. त्यात नर्मविनोदी शैलीतील उपहास असतो, शाब्दिक श्लेष आणि कोट्यांबरोबर दृश्य पातळीवर गमतीजमती असतात. चित्र आणि भाषा यांच्या एकत्रित परिणामामधून व्यक्त होणारा एक मूल्यभाव असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सार्‍या आविष्काराला संयत अभिजाततेचा स्पर्श आहे.

      व्यंगचित्रकाराचे काम जीवनातल्या विसंगती सहजपणे, खिलाडू वृत्तीने जाणवून देण्याचे आहे. भोवतालच्या तणावपूर्ण, निराशाजनक वातावरणात व्यंगचित्राने जगण्याची नवी उमेद दिली पाहिजे. उपरोधाच्या शस्त्राने त्यांचे खच्चीकरण होता कामा नये. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रकाराची ही लक्ष्मणरेषा सहजपणे आणि सातत्याने पाळलेली आहे. सामाजिक जीवनात राज्यकर्ते जेव्हा विचारस्वातंत्र्याची गळचेपी करतात, तेव्हा विनोदासारखे अस्त्र कामाला येते. युद्धकाळातील हिटलरची राजवट, पूर्व युरोपातील शीतयुद्धाच्या काळातील कम्युनिस्ट राजवटी आणि आपल्या देशातील आणीबाणीपर्व यांमध्ये विनोदाने आणि व्यंगचित्रांनी विचारांना वाट करून दिलेली आहे.

      लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांना एक परंपरा आहे. व्यंगचित्रांमध्ये रेखाटनाची एक शैली असते. अगदी ओबडधोबड चित्रांपासून ते सुबक चित्रांपर्यंत अनेक पद्धतींनी व्यंगचित्रकार चित्रे काढतात. लक्ष्मण यांची शैली डेव्हिड लो यांच्या शैलीशी अधिक मिळतीजुळती आहे.

      ‘इलस्ट्रेटेड वीकली’मधील १९४५ च्या सुमारास रुडॉल्फ व्हॉन लेडन यांनी केलेली व्यंगचित्रे पाहिली तर तीदेखील या शैलीशी मिळती-जुळती आहेत.

      ज्या काळात लक्ष्मण यांनी व्यंगचित्रे काढली, त्या काळात मुद्रणाच्या मर्यादा असल्यामुळे मुख्यतः ‘हाफटोन’पेक्षा लाइन चित्रे लागत. त्याचा परिणाम या शैलीवर नकळतपणे झालेला आहे. पण जेव्हा ‘वीकली’सारख्या साप्ताहिकांसाठी वा जाहिरातींसाठी लक्ष्मण यांनी व्यंगचित्रे काढली, तेव्हा त्यांनी जलरंगासारख्या प्रवाही रंगांचा वापर केला. मुख्यतः अर्कचित्रे काढताना त्यांनी प्रवाही रंगछटांचा वापर केलेला आहे.

      लक्ष्मण यांची चित्रे जिवंत वाटतात; कारण अगदी मोजक्या रेषांनी ते नेमक्या तपशिलांसह भोवतालचे वातावरण जिवंत करतात.

      लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमधली पात्रे ही प्रातिनिधिक असतात. त्यांच्या रेखाटनांमधून त्या पात्रांचा वर्ग, आर्थिक स्तर, त्यांची मनोवृत्ती प्रकट होते आणि भावनाही व्यक्त होतात. भिकारी, खेडुत त्यांच्या चित्रांमधून अनेकदा येतात. आर्थिक आणि शिक्षणाच्या दृष्टीने हे दोन्ही वर्ग उपेक्षित, पण त्यांची समज विलक्षण आहे. मंत्री आणि उच्चपदस्थ यांना ही माणसे कधी कधी सहजपणे निरुत्तर करतात. ‘कॉमन मॅन’ची पत्नी किंवा मंत्रिमहोदयांच्या पत्नी यासुद्धा कधी कधी गृहिणीच्या भूमिकेतून राजकीय-सामाजिक दांभिकपणावर सहजपणे भाष्य करतात. मंत्र्यांच्या दालनातला दारावर पहारा करणारा शिपाईसुद्धा याच पठडीतला. लक्ष्मण यांच्या मानसपुत्रांच्या या दृश्यप्रतिमांमध्ये फारसा बदल झालेला नाही. आजचा सामान्य माणूस शर्ट-पँटमध्ये वावरू लागला, गृहिणी यासुद्धा नोकरदार स्त्रिया बनल्या; पण लक्ष्मण यांच्या चित्रातला ‘कॉमन मॅन’ जाकीट आणि धोतर यांतच राहिला. आजही ही माणसे कालबाह्य झालेली वाटत नाहीत. याचे कारण, ती माणसांची, त्यांच्या वृत्तींची प्रतीके आहेत. या प्रतीकांना भावात्मक अर्थ आहे; आणि म्हणून ती आपल्याला आजही आपल्यातलीच वाटतात, उपरी वाटत नाहीत.

      स्वतः लक्ष्मण यांनी त्यांच्या ‘कॉमन मॅन’चे समर्पक वर्णन केले आहे. ‘द बेस्ट ऑफ लक्ष्मण’ या संग्रहाच्या दुसर्‍या भागाच्या प्रास्ताविकात त्यांनी लिहिले आहे, आख्यायिका बनलेल्या व्यक्तिरेखा या सहसा निर्मात्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमधून जन्माला येत नाहीत. चित्रकाराच्या हाती त्या आकाराला येतात, त्या विशिष्ट काळानंतर. माझा ‘कॉमन मॅन’ हा असा आहे. त्याची सडपातळ शरीरयष्टी आणि अबोलपणे वागण्याची पद्धत फसवी आहे. आश्चर्य वाटावे इतका तो दणकट आणि चिवट आहे आणि अनेक संघर्ष, माणसाने आणि निसर्गाने निर्माण केलेल्या अनेक आपत्ती त्याने पचवल्या आहेत. उदाहरणार्थ : भ्रष्टाचार, महागाई, दुष्काळ, पूर, अन्याय. जे जग त्याला तुडवायला बघते आहे, त्यात तो तगून राहील. त्याला मुक्तीचे आश्वासन देणार्‍या राजकारणी आणि मुत्सद्दी यांना तो पुरून उरेल.

      हे झाले लक्ष्मण यांच्या चित्रांमधल्या प्रातिनिधिक व्यक्तिरेखांसंंबंधी. पण लक्ष्मण जेव्हा नामवंत राजकीय पुढार्‍यांची चित्रे काढतात, तेव्हा तो त्यांच्या प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार असतो. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांसारख्या नामवंतांची अर्कचित्रे काढणे ही एक वेगळी कला आहे. त्या-त्या व्यक्तींचे सारे व्यक्तिमत्त्व थोडक्या रेषांमध्ये साकार करणे ही अवघड गोष्ट आहे. शब्दांची वा भाषेची कोणतीही मदत न घेता केवळ रेषांच्या आधारे चित्रातील व्यंगजीवन साकारणे ही अद्भुत कला आहे. जीवनातली मूल्ये आणि निष्ठा बदलल्या की अनेकदा असंबद्धता निर्माण होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील मूल्ये आता नव्या पिढीच्या संदर्भात अर्थहीन वा विकृती बनली आहेत, त्याचे चित्रण काही व्यंगचित्रांमधून येते.

      सचिव, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी जी भारदस्त, पण तितकीच पोकळ आणि निरर्थक भाषा बोलतात, तिचे विडंबन लक्ष्मण यांच्या चित्रांमधून अनेकदा येते. सुरक्षा व्यवस्थेेचे अवडंबर, राजकारण्यांची प्रीतिभोजने, परदेश दौरे, हायकमांडचे आदेश अशा तात्कालिक फॅड्सचे विडंबनही अनेक चित्रांमधून आलेले आहे.

      लक्ष्मण हे नुसतेच व्यंगचित्रकार नाहीत. त्यांनी काळ्या-पांढर्‍या जलरंगात केलेली कावळ्यांची चित्रे पाहिली की त्यांच्यातला अभिजात चित्रकार प्रकर्षाने जाणवतो. कावळ्यांचे, त्यांच्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण तर त्यात दिसतेच; पण या चित्रांना एक विलक्षण जिवंतपणा आहे. कावळा हा काही सौंदर्यपूर्ण भावनेला आवाहान करणारा पक्षी नव्हे. पण त्यांच्या काळेपणातून आणि आविर्भावातून लक्ष्मण कावळ्यांचे व्यक्तिमत्त्व अचूकपणे टिपतात. 

      ‘लक्ष्मणरेषा’ या नावाने त्यांच्या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. आजपर्यंत त्यांना ‘पद्मविभूषण’, ‘मॅगसेसे’ पुरस्कार असे अनेक मानसन्मान लाभले आहेत.

- मधुकर धर्मापुरीकर, दीपक घारे

लक्ष्मण, आर. के.