Skip to main content
x

मेढेकर, कृष्णनाथ पांडुरंग

         स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात पोलीस प्रशासनाची घडी बसवणाऱ्या काही निवडक आय.पी.एस.अधिकाऱ्यांतीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे कृष्णनाथ पांडुरंग मेढेकर. बुद्धिमान व अभ्यासू विद्यार्थी म्हणून कृष्णनाथ यांची वाटचाल सुरू होती. जीवशास्त्रात त्यांनी विशेष श्रेणी (विज्ञान शाखा-पदवी) मिळवली होती. सागरी जीवशास्त्र या विषयाचा विशेष अभ्यास करून त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व जर्मन या भाषांवरही प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात ते काही काळ प्राध्यापक होते, तसेच त्यांचा पीएच.डी.चा अभ्यासही सुरू होता. पण १९४९ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मेढेकर यांनी सुयश प्राप्त केल्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेमध्ये दाखल झाले. १९४९ ते १९८५ अशी सुमारे ३६ वर्षे त्यांनी पोलीस प्रशासनाद्वारे आपली सेवा रुजू केली.

         पोलीस प्रशासनातील प्रदीर्घ सेवेत मेढेकर यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पदांवर कार्य केले. एक कर्तव्यदक्ष व जबाबदार पोलीस अधिकारी या भूमिकेबरोबरच संरक्षणतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमी, कुशल खेळाडू, गिर्यारोहक, लेखक व एक अनुभवी प्रशासक या त्यांच्या भूमिकाही तेवढ्याच समाजोपयोगी ठरल्या आहेत.

         मेढेकर यांनी १९८२ ते १९८५ या काळात महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेले मेढेकर हे राज्याचे १५ वे महासंचालक होते. त्यांची वाटचाल प्रामुख्याने गुप्तवार्ता विभागातून झाली. इंटेलिजन्स ब्युरो (आय.बी.) चे अतिरिक्त संचालक, अँटिकरप्शन अँड प्रोहीबिशन इंटेलिजन्स खात्याचे संचालक व आय.बी. चे सहसंचालक या भूमिकाही त्यांनी बजावल्या. मुंबई शहराचे पोलीस आयुक्त (१९८१) म्हणूनही त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरते. ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ४ वर्षे सदस्यही होते.

         संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीआधी त्यांनी तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये व नाशिक, पुणे, कोल्हापूर व विजापूर या जिल्ह्यांमध्ये साहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. १९५५ दरम्यान त्यांनी मुंबईत उपआयुक्त म्हणून काम केले. त्या काळातील भाषावार प्रांतरचना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या संदर्भातील प्रक्षोभ व ताणतणाव मेढेकर यांनी कुशलतेने हाताळले. त्यांनी भारत सरकारच्या वतीने भूतानच्या राजांचे (राष्ट्र प्रमुखांचे) पोलीस सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली. भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांचे वैयक्तिक सुरक्षा सल्लागार ही जोखमीची भूमिकाही त्यांनी काही काळ पार पाडली.

          ऊर्जा निर्मिती केंद्रे, मोठे उद्योगसमूह, मोठी धरणे, दूरसंचार केंद्रे आणि संसद-विधानसभा या वास्तू  इत्यादी महत्त्वाचे घटक ही राष्ट्राची मर्मस्थळे असतात, ही गोष्ट ध्यानात घेऊन या घटकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी विशेष योजना आखल्या होत्या. ‘आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतील सुरक्षा’ हाही त्यांच्या अभ्यासाचा व आवडीचा विषय होय. या बाबतच्या आंतरराष्ट्रीय संशोधन समितीमध्ये त्यांनी आपले योगदान दिले.

           सुरक्षाविषयक अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये ते सहभागी झाले. १९७७ मध्ये घाना या देशाची राजधानी आकरा येथे झालेल्या इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील त्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

           मेढेकर यांना कार्यक्षम सेवेबद्दल पोलीस पदक, दोन वेळा सेवापदक व वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल सर्वोच्च असे राष्ट्रपती पदक असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. पोलीस पदाधिकारी म्हणून विविध ठिकाणी, अनेक स्तरांवर काम करताना मेढेकर यांनी आपल्या आवडी-निवडी जोपासल्या. ते अनेक वर्षे पोलीस क्रिकेट संघाचे कर्णधार होते. ईशान्य भारतातील नेमणुकीच्या काळात त्यांनी गिर्यारोहणाचा अभ्यास व सराव केला. याच काळात त्यांनी हिमालयातील वनस्पती व प्राणिजीवन आणि तेथील आदिवासी जमातींचे जीवन यांचाही सखोल अभ्यास केला.

           निवृत्तीनंतरही (१९८५ नंतर) मेढेकर विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. दादरची ‘शारदाश्रम शाळा’ व ‘आदर्श शिक्षण संस्था’ या शैक्षणिक संस्थांचे ते अनुक्रमे उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आदर्श शिक्षणसंस्था ही आदिवासी व झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कामे करणारी संस्था आहे. ‘युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते मानद सदस्य आहेत.

            कृष्णनाथ मेढेकर सध्या मुंबईतील खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशनचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेशी संलग्न दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी अँड सेफ्टी मॅनेजमेंट’ या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तसेच ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (लोकप्रशासन) या संस्थेचेही ते कार्यकारी सदस्य आहेत.

            त्यांचे व्यक्तिगत ग्रंथालय समृद्ध असून त्यांनी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिखाण केले आहे. दोन कादंबऱ्या व सुमारे १२५ लघुकथा अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांचे आत्मचरित्र ‘वृत्तमानस’ या वृत्तपत्राने क्रमश: प्रसिद्ध केले होते.

- विनय वसंत मावळणकर

मेढेकर, कृष्णनाथ पांडुरंग