मेंदुले, अरुण शामराव
अवघ्या ४२ वर्षांचे कवी व कलावंताचे आयुष्य जगणारे अरुण शामराव मेंदुले यांचा जन्म नागपुरात झाला. त्यांच्यावर लेखन व वाचनाचा संस्कार स्वातंत्र्य चळवळ व गांधी-विचारांनी भारावलेल्या घरात त्यांच्या आईकडून झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आग्याराम देवीजवळच्या नगरपालिकेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण डी.डी. नगर विद्यालयात झाले. त्यांनी १९५८ मध्ये अकरावीनंतर विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेतले चोरघडे मास्तर आणि नात्याने आते-मावसबहीण आणि पुढे प्रसिद्ध झालेली चित्रकर्ती बी. प्रभा यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे ते ‘इंटरमीजिएट’ ही चित्रकलेची परीक्षा उत्तीर्ण झाले. शहरापासून जवळच असणाऱ्या बेला या गावी अरुण मेंदुले यांनी एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली आणि चित्रकलेच्या शिक्षणासाठी १९६३ मध्ये शासकीय कला निकेतन म्हणजेच आजच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथील अभ्यासक्रम पूर्ण करून १९६६ मध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जी.डी. आर्टकरिता मुंबई गाठली. चित्रकार शंकर पळशीकरांसारखे गुरू व बाहेरच्या कलाविश्वातील मित्रांमुळे मेंदुल्यांमधील कलावंताला प्रकटीकरणासाठी ‘कविता’ हे माध्यम मिळाले व अल्पावधीतच ते जवळचे झाले. रेखाटनातील लयदार रेषा, तांत्रिक प्रतिमा, सोबतच शब्दांतून उमटलेल्या व दृक्प्रतिमांनी सजलेल्या अशा कविता ते करू लागले.
ते १९७० मध्ये जी.डी. आर्ट झाल्यानंतर १९७२ पर्यंत मुंबईतील वांद्य्रात कलावंत म्हणून जगण्याची धडपड करणारे मेंदुले नागपूरला परतले. यामागे घराची ओढ आणि घराजवळच तलावाच्या काठावर राजा ढाले, पु.भा. भावे, ग.त्र्यं. माडखोलकर, तर कधी मुक्तिबोध यांच्या घडणाऱ्या सहवासाचे आकर्षण होते. आता मेंदुले पुन्हा त्यांच्या सहवासात दिसू लागले. मुंबईतच अभिनेत्री स्मिता पाटीलशी झालेल्या मैत्रीतून त्यांनी ‘अर्थ’ सिनेमावरील परिसंवादासाठी ‘इंदरचे काय चुकले?’, असा लेख लिहिला. याच दरम्यान विविध विषयांना स्पर्श करणारे मेंदुले चित्रकला महाविद्यालयात अधिव्याख्याता झाले.
अरुण मेंदुले यांनी विश्व हिंदी संमेलन, नागपूर, १९७५; अतुल ड्रॉइंग प्रदर्शन, अहमदाबाद; ड्रॉइंग ७५, लखनौ; बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई; आर्टिस्ट सेंटर, मुंबई; महाकोशल कला परिषद, रायपूर; विदर्भ आर्ट सोसायटी, सेंट्रल म्यूझियम पोस्टर पोएट्री, मंत्र ग्रूप, माहिती केंद्र, नागपूर अशा अनेक ठिकाणी प्रदर्शने केली. त्यांनी नॅशनल प्रदर्शन, दिल्ली, १९८१; राज्यकला प्रदर्शन, १९८२; बिनाले बांगलादेश, १९८३ अशा महत्त्वाच्या प्रदर्शनांत भाग घेतला.
‘पेन अॅण्ड इंक’ माध्यमात असंख्य स्केचेस करताना मिळविलेली लयबद्धता सांभाळत मेंदुले सातत्याने ड्रॉइंग्ज, प्रिन्ट्स, पेंटिंग्ज करीत होते. ‘धर्मयुग’, ‘सारिका’, ‘नवनीत’, ‘सत्यकथा’, ‘साधना’, ‘युगवाणी’, ‘तरुण भारत’, ‘लोकमत’, ‘नागपूर पत्रिका’ यांतून त्यांची रेखाटने प्रकाशित झाली. तसेच पद्माकर डावरे एकांकिका स्पर्धेत त्यांना एकांकिका लेखनाचा पुरस्कार मिळाला. आत्मकेंद्री असणारा हा चित्रकार कधीकधी —
‘घरावर छत नसताना
पाऊसच गणगोत झाला
आगीशी इमान राखताना
कापूसच गणगोत झाला’
अशा ओळी लिहायचा. काळोखाच्या अनेक छटा दाखविताना —
‘पुष्कळशी कल्पनाशक्ती
शेवटी अॅशट्रे मध्ये जमा होते,’
असेही ते लिहायचे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुद्राचित्रकार कृष्णा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली १९८३ मध्ये आयोजित केलेल्या ‘व्हिस्कॉसिटी’ वर्कशॉपमध्ये त्यांचा सहभाग होता. दरम्यानच्या काळात या कलावंताला लागलेले व्यसन दिवसेंदिवस वाढत गेले. त्यातून वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी अनेक अप्रकाशित — प्रकाशित कविता, असंख्य चित्ररेखाटने मागे ठेवून त्यांनी जीवनाचा निरोप घेतला. स्वत:चा कवितासंग्रह प्रकाशित करण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
- विकास जोशी