Skip to main content
x

मनोहर, माधव बलवंत

     माधव बलवंत मनोहर यांचा जन्म नाशिक येथे झाला.  त्यांचे माध्यमिक शिक्षण नाशिक शहरात झाले, तर उच्च शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी प्राप्त केली. नाथीबाई ठाकरसी मुलींच्या शाळेत त्यांनी मराठीचे अध्यापन केले. पुढे त्यांनी पिंगेज क्लासमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     १९४० साली त्यांची ‘ज्वाला’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर ‘एक आणि दोन’ (१९४८), ‘सुखदुःख’ (१९७५), ‘कैफियत’ (१९७७), ‘दौरा’ (१९७८), अशा अनेक कादंबर्‍या प्रकाशित झाल्या. कृष्णचंद्र यांच्या ‘अन्नदाता’ या उर्दू कादंबरीचा त्यांनी अनुवाद केला. कॅरेल कॅपेक ह्यांच्या ‘मदर’चा ‘आई’ हा नाट्यानुवाद १९४२ साली प्रकाशित झाला. ‘सत्यकथा’ ह्या नियतकालिकात त्यांनी सतत वर्षभर, कॅरेल कॅपेकच्या कथांचे केलेले अनुवाद प्रसिद्ध होत होते. माधव मनोहरांनी २००हून अधिक कथा लिहिल्या.

     त्यांच्या नाट्यविषयक स्तंभलेखनामुळे ते विशेष गाजले. ललित मासिक, सोबत साप्ताहिक आणि नवशक्ती दैनिकातून त्यांनी स्तंभलेखन केले. ‘सोबत’मध्ये त्यांचे ‘पंचम’ नावाचे नाट्यविषयक सदर अनेक वर्षे चालू होते. ह्या सदरातून ते नाटकाची संहिता आणि नाटकाचा प्रयोग असे द्विस्तरीय परीक्षण लिहीत असत. ‘केसरी’मध्येही ‘चौपाटीवरून’ हे सदर ते ‘पवन’ ह्या टोपणनावाने लिहीत असत. ‘नवशक्ती’मध्ये ‘शब्दांची दुनिया’ या सदरातून ते पुस्तक-परीक्षणे लिहीत. ‘ललित’मधून त्यांनी अनेक पाश्चात्त्य लेखकांचा परिचय करून दिला. त्यांचे समीक्षालेखन परखड व निर्भीड होते. अनेकांचे वाङ्मयचौर्य त्यांनी उघडकीस आणले. त्यामुळे तत्कालीन वाङ्मय व्यवहारावर त्यांचा जबरदस्त वचक होता; ह्याचे कारण त्यांची वाचनाची भूक आणि प्रचंड व्यासंग होय.

     त्यांनी ‘सशाची शिंगे’, ‘झोपलेले नाग’ ही नाटके लिहिली. ही नाटके आत्माराम भेंडे इत्यादींनी रंगमंचावर १९५० ते १९५४ ह्या काळात आणली. नाट्यसमीक्षक म्हणून त्यांचा गवगवा झाला तरीही नाटककार म्हणून त्यांना यश मिळू शकले नाही. मात्र एक चिकित्सक समीक्षक म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

     - नरेंद्र बोडके

मनोहर, माधव बलवंत