Skip to main content
x

मंगेशकर, लता दीनानाथ

ता मंगेशकर या सात अक्षरांनी संगीताच्या दुनियेत चमत्कार घडविला आहे. गेली सहा दशके हा आवाज भारत आणि भारताबाहेर संगीतप्रेमींच्या मनावर गारूड करून आहे. लता मंगेशकर यांचा आवाज विसाव्या शतकातील एक अनमोल ठेवा आहे. लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म इंदूर (मध्यप्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीवरील एक नामवंत गायक व नट होते. बलवंत नाटक कंपनीचे ते मालक होते. लताबाईंच्या आईचे नाव शुद्धमती; परंतु सर्व जण त्यांना माई म्हणत.

लताबाईंचे जन्मनाव ‘हृदया’ होते; परंतु मा. दीनानाथ त्यांना ‘लतिका’ या गाजलेल्या भूमिकेमुळे लता म्हणत. लताबाई या मा. दीनानाथ व माई यांचे थोरले अपत्य. त्यांना मीना, आशा व उषा या तीन बहिणी आणि बाळ (हृदयनाथ) हा एकमेव भाऊ. या सर्व मंगेशकरांनी संगीत क्षेत्रात स्वकर्तृत्वाने मानाचे स्थान निर्माण केले आहे. लताबाईंच्या घरात त्यांच्या लहानपणापासून संगीताचे वातावरण होते, त्यामुळे शालेय शिक्षणापेक्षा त्यांचा ओढा गाण्याकडे होता. मा. दीनानाथांनी त्यांना लहानपणीच शास्त्रशुद्ध गाण्याची तालीम देण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी लताबाईंनी ‘मानापमान’ नाटकातील ‘शूरा मी वंदिले’ हे पद मोठ्या तयारीने व आत्मविश्वासाने गाऊन श्रोत्यांना आश्चर्यचकित केले.

मा. दीनानाथ यांना आपल्या लाडक्या लताला रागदारी गाणारी गायिका म्हणून घडवायचे होते. बलवंत नाटक कंपनीत ‘संगीत सौभद्र’ नाटकात लहानग्या लताने नारदाची भूमिका मोठ्या तडफेने केली व पदांना वन्समोअरही घेतला. नियतीच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळे होते; लताबाईंचा गायिका म्हणून प्रवास सुकरपणे घडायचा नव्हता. बोलपटांच्या आगमनाने संगीत नाटकांचा प्रेक्षक बोलपटांकडे आकर्षित झाला आणि नाटकमंडळींना हा व्यवसाय करणे अवघड झाले. मा. दीनानाथांनी ढासळत्या नाटक कंपनीला सावरण्यासाठी ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटाची निर्मिती केली. चित्रपट चालला नाही, त्यामुळे मा. दीनानाथांना प्रचंड आर्थिक तोटा झाला. या सार्‍याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. पल्लेदार आवाजाच्या व करारी बाण्याच्या मा. दीनानाथांचे २४ एप्रिल १९४२ रोजी, वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी दु:खद निधन झाले. 

वडिलांच्या दु:खद निधनानंतर सारी मंगेशकर भावंडे पोरकी झाली. त्यानंतर कुटुंबाच्या चरितार्थासाठी लतादीदींना चित्रपटात काम करावे लागले. न्यू महाराष्ट्र पिक्चर्सच्या ‘किती हसाल’ या चित्रपटात १९४२ साली सदाशिव नेवरेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात ‘नाचू या गडे, खेळू दारी’ हे गीत त्या गायल्या; परंतु हे गीत चित्रपटात समाविष्ट झाले नाही. या सालीच नवयुग चित्रपट लिमिटेडच्या ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात लतादीदींनी अभिनय व गायन केले. या चित्रपटाला दादा चांदेकर यांचे संगीत होते. ‘नटली चैत्राची नवलाई’ हे स्नेहप्रभा प्रधानबरोबर गायलेले लतादीदींचे पहिले चित्रपटगीत. लतादीदींना नवयुग चित्रपट कंपनीत प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेते मा. विनायक यांनी घेतले होते. ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटादरम्यान मा. विनायकांनी नवयुग कंपनी सोडली आणि ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या कंपनीची स्थापना करून कोल्हापुरात चित्रपटनिर्मितीला प्रारंभ केला.

लतादीदींना आपल्या आई व भावंडांसमवेत पुणे सोडून कोल्हापूरला जावे लागले. मा. विनायकांच्याकडे लतादीदींनी ‘माझं बाळ’ (१९४३), ‘चिमुकला संसार’ (१९४३) आणि ‘गजाभाऊ’ (१९४४) या तीन मराठी चित्रपटांत अभिनय व गायन केले. या तिन्ही चित्रपटांना ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचे संगीत होते. ‘माझं बाळ’ या चित्रपटात प्रभातफेरीच्या एका प्रसंगावर ‘चला चला नवबाला’ हे गाणे लतादीदी, मीना, आशा, उषा व हृदयनाथ या सर्व मंगेशकर भावंडांवर चित्रित करण्यात आले होते. सर्व मंगेशकर भावंडे व दत्ता डावजेकर यांनी हे गाणे गायले होते.

‘गजाभाऊ’ या चित्रपटात दत्ता डावजेकरांनी लतादीदींकडून प्रथमच एक हिंदी गाणे ‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू’ गाऊन घेतले होते. ‘गजाभाऊ’ या चित्रपटानंतर मा. विनायकांनी कंपनीचा मुक्काम कोल्हापूरहून मुंबईला हलविला. लताबाई आता कोल्हापूर सोडून आपली धाकटी बहीण मीनाबरोबर मुंबईला राहायला आल्या. माई आणि बाकी भावंडे खानदेशात थाळनेरला, आपल्या आजोळी राहू लागली.

मा.दीनानाथ असेपर्यंत त्यांनी लताला शास्त्रीय गायनाचे शिक्षण दिले, त्यानंतर कुटुंबाच्या चरितार्थासाठी लताला अभिनय व गायन करावे लागले. शास्त्रीय संगीताचा अभ्यास पुढे सुरू राहावा यासाठी ११ जून १९४५ रोजी गायक उ.अमान अली खाँ (भेंडीबाजारवाले) यांचा लतादीदींनी गंडा बांधला. एक वर्षाच्या आतच अमान अली खाँसाहेबांनी मुंबई सोडली. त्यामुळे देवासचे अमानत अली खाँ यांच्याकडे लतादीदी शास्त्रीय संगीत शिकू लागल्या. पुढे उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या गायकीने त्या खूप प्रभावित झाल्या व त्यांचे शिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे त्या शिकत होत्या.

मा.विनायकांचे १८ ऑगस्ट १९४७ रोजी निधन झाले व लतादीदींवर आता पुन्हा काम शोधायची पाळी आली. सुदैवाने त्याच वर्षी त्यांना दत्ता डावजेकर आणि मास्टर गुलाम हैदर यांच्या संगीत दिग्दर्शनांत हिंदी चित्रपटांत पार्श्वगायनाची संधी मिळाली. लतादीदी आणि त्यांच्या कुटुंबीयांना १९४२ ते १९४६ दरम्यान प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. पण नंतर ते सारे संपले. त्यांच्या सुरेल, मधुर व अलौकिक आवाजामुळे हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायनाचे दार त्यांना खुले झाले. माई व धाकट्या भावंडांबरोबर त्या मुंबईत राहू लागल्या. हिंदी पार्श्वगायनात लतादीदी प्रचंड व्यस्त झाल्या. त्यामुळे मराठीमध्ये त्यांनी मोजकीच गाणी (हिंदी भाषेच्या तुलनेत) गायलेली आहेत.

‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटाला लतादीदींनी १९५० साली संगीत दिले होते. स्वत: लतादीदी, मीना मंगेशकर आणि चितळकर (सी. रामचंद्र) यांनी या चित्रपटात गाणी गायली. हा चित्रपट आणि त्यातील गाणी त्या काळात खूप गाजली. याच सुमारास ‘संत जनाबाई’ (संगीत : सुधीर फडके), ‘पाटलाचा पोर’ (वसंत प्रभू), ‘साखरपुडा’ (वसंत देसाई) या चित्रपटांतील लतादीदींनी गायलेली गाणी फार गाजली.

‘अमर भूपाळी’ या १९५१ सालच्या चित्रपटाने लता मंगेशकरांच्या गाण्याच्या लोकप्रियतेचा कळस गाठला. संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी या चित्रपटासाठी खास मराठमोळे संगीत तयार केले. ‘लटपट लटपट तुझं चालणं’ ही लावणी, ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा’ (सोबत पंडितराव नगरकर) ही भूपाळी, ‘तुझ्या प्रीतीचे दु:ख मला’, ‘घडी घडी मोहना रे’ ही सारीच गाणी लोकप्रिय झाली. ‘अमर भूपाळी’ हा चित्रपट प्रचंड गाजल्यामुळे त्याची बंगाली आवृत्तीपण निघाली होती. त्या निमित्ताने लतादीदी पहिल्यांदा बंगाली भाषेत गायल्या. ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटात (संगीतकार : सी. रामचंद्र) लता मंगेशकरांनी स्वत: पडद्यावर शिवाजी महाराजांचा पाळणा म्हटला होता. त्यांनी अभिनय केलेला हा शेवटचा चित्रपट. त्यानंतर त्यांनी सारे लक्ष पार्श्वगायनावर केंद्रित केले.

पुढील काळात मराठी चित्रपटात अनेक स्थित्यंतरे घडली आणि याच काळात लतादीदी हिंदी चित्रपटांतील पार्श्वगायनात अधिकाधिक व्यस्त झाल्या. त्यामुळे त्या मराठी चित्रपटगीतांसाठी फार कमी उपलब्ध झाल्या. संख्येने लतादीदींची मराठी चित्रपटगीते कमी असली तरी ती चिरस्मरणीय आहेत. दत्ता डावजेकर, दादा चांदेकर, सुधीर फडके,वसंत देसाई, वसंत पवार, वसंत प्रभू, मीना मंगेशकर (खडीकर), हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, उषा मंगेशकर, राम कदम, भास्कर चंदावरकर, मा. कृष्णराव, मुहम्मद शफी, हेमंत कुमार, सलील चौधरी, यशवंत देव, प्रभाकर जोग, शंकरराव कुलकर्णी इत्यादी नामवंत संगीतकारांकडे त्यांनी मराठी चित्रपटगीते गायली. लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या टोपणनावाने चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’, ‘साधी माणसं’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटांना संगीत दिले. अनेक वर्षे संगीतकार ‘आनंदघन’ कोण याविषयी श्रोत्यांच्या मनांत कुतूहल आणि औत्सुक्य होते. नंतर आनंदघन म्हणजे लता मंगेशकर हा गौप्यस्फोट झाला.

हिंदी चित्रपटांमध्ये काही नायिका पार्श्वगायनासाठी लतादीदींच्या आवाजाचा आग्रह करीत. उदा. मधुबाला, नूतन, मीनाकुमारी. तसे मराठीमध्ये घडले नाही, तरी ‘शिकलेली बायको’ (उषा किरण), ‘मोलकरीण’ (सुलोचना), ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘साधी माणसं’ (जयश्री गडकर) ही काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मराठी चित्रपटांत भक्तिगीते, प्रेमगीते, लावणी, द्वंद्वगीते, अस्सल रागदारीवर आधारित गीते, स्त्री-गीते इत्यादी अनेक प्रकार लतादीदींनी गायले आहेत. परंतु कारुण्यरसाची गाणी गायला त्यांना जास्त आवडते.

‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटात लतादीदींनी स्वत:चे संगीत असताना ‘रेशमाच्या रेघांनी’ (गीतकार : शांता शेळके)ही लावणी आशा भोसल्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली. लता मंगेशकरांनी गायलेल्या, संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांमध्ये ‘साधी माणसं’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख करावा लागेल. ‘साधी माणसं’ या चित्रपटाला त्या वर्षीचे नऊ पुरस्कार मिळाले. त्यांमध्ये लतादीदींना दोन (उत्कृष्ट संगीतकार व उत्कृष्ट पार्श्वगायिका) पुरस्कार मिळाले. लतादीदींनी ‘वादळ’ (१९५३), ‘कांचनगंगा’ (१९५५) या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लतादीदींची काही गाजलेली चित्रपटगीते : ‘धुंद मधुमती’, ‘असा नेसून शालू हिरवा’ (सोबत सुधीर फडके, चित्रपट : ‘कीचकवध’), ‘लेक लाडकी या घरची’, ‘माझिया नयनांच्या कोंदणे’, ‘कोण दूजा आधार’ (अंतरीचा दिवा), ‘ये जवळी घे जवळी’ (माणसाला पंख असतात), ‘तुजसाठी शंकरा’ (चिमुकला पाहुणा), ‘मज आवडते हे गाव’ (गाठ पडली ठकाठका), ‘चंद्र माझा’ (शशी), ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ (जिव्हाळा), ‘नीलकंठा चंद्र मौळी’ (श्रीमान बाळासाहेब), ‘प्रीत रंगली’ (सोबत मन्ना डे), ‘माझी न मी राहिले’ (मंगळसूत्र), ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’ (पिंजरा), ‘विसरू नको श्रीरामा मला’ (जानकी), ‘शुभंकरोती म्हणा’ (थांब लक्ष्मी कुंकू लावते), ‘माझे राणी माझे मोगा’ (महानंदा), ‘तुझे नी माझे इवले गोकूळ’ (सोबत हृदयनाथ मंगेशकर; चित्रपट : सुखाची सावली), तसेच ‘शारदा’ नाटकावर बनलेल्या ‘शारदा’ या चित्रपटात संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी लतादीदींकडून ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे गाजलेले पद गाऊन घेतले.

लता मंगेशकरांनी १९४८ साली ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाळा’ आणि ‘गेला कुठे बाई कान्हा’ ही दोन भावगीते दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात गायली आणि त्या काळी प्रचलित असलेल्या भावगीत पद्धतीपेक्षा ती वेगळी असल्यामुळे आणि लतादीदींच्या कोवळ्या, सुरेल आवाजामुळे प्रचंड लोकप्रिय झाली. पुढे १९४९ साली पी. सावळाराम यांनी लिहिलेले आणि वसंत प्रभूंचे संगीत असलेल्या ‘गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का’ या गाण्याने लताबाई आणि संगीतकार वसंत प्रभू यांच्या भावगीतपर्वाला सुरुवात झाली.

वसंत प्रभूंनी लतादीदींकडून १९४९-१९६४ या कालावधीत पी. सावळाराम, कवी बी, भा.रा.तांबे, कुसुमाग्रज इत्यादी नामवंत कवींच्या गीतांना सुमधुर चाली लावून अनेक भावगीते गाऊन घेतली. सहज, सोप्या चाली, लक्षात राहणारे ध्रुवपद आणि लतादीदींच्या आवाजाचा आवाका इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून वसंत प्रभूंनी लतादीदींसाठी चाली बांधून एकापेक्षा एक सरस भावगीते निर्माण केली. सुरेलपणा, शब्दांचा योग्य उच्चार, कवींच्या भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे लतादीदींचे कौशल्य यांमुळे ही भावगीते आजही लोकप्रिय आहेत. वसंत प्रभूंच्या संगीतात गाजलेली काही भावगीते : ‘चाफा बोलेना’, ‘मधू मागशी माझ्या सख्या परी’, ‘आड वाटेला दूर एक माळ’, ‘अनामवीरा’, ‘नववधू प्रिया मी बावरते’, ‘घट डोईवर’, ‘जो आवडतो सर्वांना’, ‘ते दूध तुझ्या त्या घटातले’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ इत्यादी. भारतरत्न महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांच्या वयाला शंभर वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी कवी पी. सावळाराम यांनी काव्य रचले : ‘घरोघरी वाढदिन माझ्या वडिलांचा आला’. पुन्हा प्रभूंनी समर्पक चाल बांधली आणि लतादीदींनी या गीताचे सोने केले.

वसंत प्रभूंच्या भावगीतपर्वाबरोबर लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याही भावगीतांचे एक नवीन पर्व सुरू झाले. उत्तम काव्य, स्वच्छ शब्दोच्चार, काव्यानुरूप भावाविष्कार, ऐकायला सुमधुर; परंतु गायला अतिशय कठीण हे पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीताचे वैशिष्ट्य. भा.रा. तांबे, बालकवी, आरती प्रभू, राजा बढे, शांताबाई शेळके, सुरेश भट इत्यादी नामवंत कवींच्या काव्यांना त्यांनी स्वरसाज चढविला. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींकडून गाऊन घेतलेली काही गाजलेली भावगीते : ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘माझे गाणे’, ‘कशी काळनागिणी’, ‘कसे कसे हासायचे’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘मालवून टाक दीप’, ‘संधिकाली या अशा’ (सोबत अरुण दाते) इत्यादी.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे लता मंगेशकरांनी मोजकीच भावगीते गायली आहेत; परंतु ही गाणी अतिशय श्रवणीय आहेत. खळ्यांची स्वररचना गायला अतिशय कठीण असते. तसेच तालाला समांतर असणे ही त्यांच्या संगीतरचनेची वैशिष्ट्ये होत. ‘श्रावणात घन निळा’, ‘भावनांचा तू भुकेला रे मुरारी’, ‘जाहल्या काही चुका’, ‘नीज माझ्या नंदलाला’ ही गाणी चिरस्मरणीय आहेत.

लतादीदींनी भावगीत गायला सुरुवात केली तेव्हा जी.एन. जोशी, जे.एल. रानडे, गजाननराव वाटवे, माणिक वर्मा इत्यादी गायकांचा प्रभाव होता. परंतु कुणाचीही नक्कल न करता लतादीदींनी स्वत:ची शैली विकसित केली आणि आज नवोदित गायक, गायिका त्यांच्याच शैलीचा आदर्श गाताना ठेवतात. लता मंगेशकरांनी गायलेल्या पसायदानाने २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनची सुरुवात झाली. या पसायदानाचे संगीत वसंत देसाई यांनी केले होते.

पुणे आकाशवाणी केंद्रावरील ‘गीत रामायण’ या संगीतकार सुधीर फडके यांच्या कार्यक्रमात ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ हे ग.दि. माडगूळकरांचे गीत लता मंगेशकर गायल्या होत्या. चित्रपट व भावगीतगायनाच्या प्रदीर्घ कारकिर्दीसाठी लता मंगेशकरांना ‘पद्मभूषण’ (१९६९), ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार (१९८९), ‘पद्मविभूषण’ (१९९९)   आणि भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ (२००१) आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश शासन उत्कृष्ट गायक-गायिकांना ‘लता मंगेशकरां’च्या नावाने  पुरस्कार प्रदान करतात.

अद्वैत धर्माधिकारी

मंगेशकर, लता दीनानाथ