Skip to main content
x

मंगरूळकर, नारायण गोविंद

नारायण गोविंद मंगरूळकर यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मनोरमा होते. त्यांनी १९५० साली, वयाच्या बाराव्या वर्षी पं.सावळाराम मास्तर यांच्याकडून तालीम घेण्यास सुरुवात केली. पुढे पं. शंकरराव सप्रे यांनी त्यांच्यावर संगीताचे संस्कार केले. यानंतर नामांकित गायक पं. राजाभाऊ कोगजे यांच्याकडे ते गायन शिकले.

गायकीचे अंग विकसित होत असताना त्यांनी पदवी परीक्षा देऊन संशोधनही केले. ‘विदर्भातील संगीत परंपरा - १७५० ते १९७५’ यावर दिल्लीच्या डॉ. सुमती मुटाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मौलिक संशोधन केले. त्यांनी १९८३ मध्ये हा प्रबंध नागपूर विद्यापीठाला सादर करून आचार्य (पीएच.डी.) ही पदवी प्राप्त केली.

त्यांनी ‘वैदर्भीय संगीतोपासक - भाग १’ (१९७४), ‘वैदर्भीय संगीतोपासक - भाग २’ (१९७६) ही पुस्तके  लिहिली. मंगरूळकरांनी लिहिलेली ‘संगीतशास्त्र विजयिनी’ (१९८९), तसेच एकूण १५० संगीत कलावंतांची चरित्रपर माहिती देणारे ‘संगीतातील घराणी आणि चरित्रे’ (१९९२) ही दोन पुस्तके नागपूर, अमरावती विद्यापीठ व अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त झाली. मंगरूळकरांनी १९७० साली ‘गुरुकृपा संगीत मंडळ’ स्थापन करून शिस्तबद्ध संगीत सभांचे आयोजन केले. त्यांनी १९७८ मध्ये ‘स्वरसंपदा’ हा वार्षिकांक प्रकाशित केला होता. परंतु तीन वर्षांनंतर हा अभिनव उपक्रम आर्थिक अडचणींमुळे बंद पडला.

मंगरूळकर यांचे ‘संगीत कला विहार’, विविध स्मरणिका, गौरवांक व विविध वृत्तपत्रे यांमधून संगीतविषयक शंभरांहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी १९७२ ते १९९० अशी सलग अठरा वर्षे दै. ‘लोकमत’मधून संगीत समीक्षात्मक लेखन केले आहे.

मंगरूळकर यांनी विविध राग-तालांतील सुमारे ९० बंदिशी रचल्या. त्यांनी नागपूर व अमरावती विद्यापीठांत संगीत विषयाचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक म्हणून काम पाहिले . त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ची पदवी संपादन केली आहे. ते १९९६ मध्ये नागपूर महानगरपालिकेतून निरीक्षक पदावरून निवृत्त झाले. त्यांच्या संगीतविषयक सर्व उपक्रमांत त्यांची पत्नी विजया हिची उत्तम साथ लाभली.

संगीता गलांडे

मंगरूळकर, नारायण गोविंद