Skip to main content
x

मोघे, श्रीकांत राम

अभिनेता

६ नोव्हेंबर १९३५

स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीयेथे श्रीकांत राम मोघे यांचा जन्म झाला. रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन या तिन्ही माध्यमातील त्यांचा अभिनयकुशल प्रवास  विविधांगी आहे. शब्दोच्चार आणि भूमिकेचे सादरीकरण या त्यांच्या खास अंगभूत गुणांनी नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. श्रीकांत मोघे यांचे वडील राम गणेश मोघे, त्यांची आई विमला राम मोघे, सुधीर आणि हेमा या दोन धाकट्या भावंडासमवेत किर्लोस्करवाडी येथे त्यांचे बालपण गेले. किर्लोस्करवाडी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. वडील किर्लोस्कर कंपनीमध्ये नोकरी करत, पण कीर्तनकार म्हणूनही ते सुपरिचित होते. यामुळे संगीत, अभिनय, शब्दांमधील नादमयता, आवाज लावण्याची पद्धत या गोष्टी नकळतपणे त्यांच्या ठायी भिनत गेल्या. बालवयात श्रीकांत मोघे यांना कुस्तीचाही शौक होता. त्यासाठी त्यांना औंध संस्थानातर्फे इनामही मिळाले आहे. शालेय शिक्षणानंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. या काळात आकाशवाणी पुणे केंद्रावर एकांकिका, काव्यवाचन, भावगीतगायन अशा प्रांतात त्यांची मुशाफिरी सुरू होती. पदवीनंतर वर्षभरासाठी त्यांनी किर्लोस्करवाडीला नोकरी केली. त्याच सुमाराला व्ही. शांताराम यांनी श्रीकांत मोघे यांना शाहीर प्रभाकरया चित्रपटासाठी निवडले, पण त्या चित्रपटात त्यांनी काम केले नाही. पु.ल. देशपांडेलिखित अंमलदारया नाटकात शरद तळवलकरांनी त्यातील मुख्य भूमिकेसाठी त्यांना प्रोत्साहन दिले. श्रीकांत मोघे यांनी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून मराठी बातम्या देण्यासाठी नोकरीनिमित्त दिल्लीला प्रस्थान केले. १९५६ साली मामा वरेरकरांच्या अपूर्व बंगालया नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले. त्याआधी त्यांनी गोवा मुक्ती संग्रामात आकाशवाणीसाठी जितेंद्र अभिषेकी यांची गीते गायली.

या काळात त्यांची हिंदी, उर्दू व पंजाबी या भाषांची जाण वाढली. त्यांनी दिल्लीतील विविध नाट्यसंस्थांच्या हिंदी प्रयोगात काम करण्यास सुरुवात केली. नवी दिल्ली येथील साँग अँड ड्रामा डिव्हिजनच्या मिट्टी की गाडी’ (मृच्छकटिक) या नाटकाच्या सूत्रधाराची भूमिका केली. त्यानंतर और भगवान देखता रहाया नाटकातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. दोन-अडीच वर्षाच्या दिल्लीतील वास्तव्यानंतर आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न पाहून १९६२ साली ते मुंबईत आले. स्थापत्यशास्त्राचे शिक्षण घेतानाच रंगभूमीवर आणि चित्रपटातून त्यांचा वावर स्वाभाविक राहिला. पु.ल. देशपांडे यांच्या वार्‍यावरची वरातया १९६२ साली आलेल्या नाटकातील त्यांच्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. मराठी रंगभूमीवरचा त्यांचा आलेख चढता राहिला. तुझे आहे तुजपाशी’, ‘सीमेवरून परत जा’, ‘नवी कहाणी स्मृती पुराणी’, ‘संकेत मिलनाचा’, ‘अजून यौवनात मी’, ‘अशी पाखरे येती’, ‘अश्वमेध’, ‘गारंबीचा बापू’, ‘मन पाखरू पाखरू’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘कथा कुणाची व्यथा कुणा’, ‘साक्षीदारअशा कितीतरी आशयघन नाटकांतील दर्जेदार भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. शब्दोच्चारातील स्पष्टता, संवादाची फेक, तीव्र स्मरणशक्ती आणि रंगमंचावर वावरण्याची सहजता, तसेच त्या त्या भूमिकेतील समरसता यामुळे त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या.

त्या दरम्यान, चित्रपटांमधूनही काम करण्याकडे रंगभूमीवरील कलाकारांचा कल होता. चित्रपटसृष्टीमध्ये राजा परांजपे, ग.दि. माडगूळकर, राम गबाले, कमलाकर तोरणे यासारखी मंडळी निरनिराळ्या विषयांवर उत्तम चित्रपटनिर्मितीसाठी धडपडत होती. मोघे यांना अशाच गुणी मंडळींबरोबर चित्रपटांमध्ये संधी मिळाली. १९६१ साली प्रपंचया त्यांच्या पहिल्या चित्रपटात त्यांनी सीमा देव, रमेश देव, अमरशेख, सुलोचना या सहकलाकारांसमवेत शंकरया नायकाची भूमिका केली. उत्तम ग्रहणशक्ती, उपजत अभिनयकौशल्याला अधिकाधिक प्रगल्भ करत अभिनयाचे धडे घेत श्रीकांत मोघे यांचा सिनेसृष्टीतील प्रवास सुरू राहिला.

नंदिनी’, ‘निवृत्ती ज्ञानदेव’, ‘मधुचंद्र’, ‘शेवटचा मालुसरा’, ‘आम्ही जातो अमुच्या गावा’, ‘जिव्हाळा’, ‘अन्नपूर्णा’, ‘दैव जाणिले कुणी’, ‘अनोळखी’, ‘पारध’, ‘या सुखांनो या’, ‘कैवारी’, ‘उंबरठा’, आव्हान’, ‘जानकी’, ‘भन्नाट भानू’, ‘हा खेळ सावल्यांचाअशा जवळपास चाळीस लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी नायकाच्या आणि खलनायकाच्या भूमिका अतिशय ताकदीने रंगवल्या. तू तिथं मीहा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

नाटक आणि चित्रपट असा दुहेरी प्रवास सुरू असतानाच संगीतकार आणि चित्रपट निर्माते पांडुरंग दीक्षित यांच्या पुतणीशी, म्हणजे डॉ. शोभना यांच्याबरोबर १९७४ साली त्यांचा विवाह झाला. श्रीकांत मोघे यांनी गजानन जागीरदार यांच्याबरोबर स्वामीया दूरदर्शनवरून प्रसारित होणार्‍या व अफाट लोकप्रियता मिळालेल्या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. याशिवाय मशाल’, ‘भोलाराम’, ‘युगया हिंदी आणि अवंतिकाया मराठी मालिकेमध्येही त्यांचा सहभाग होता.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या श्रीकांत मोघे यांच्या चाळीस वर्षाहून अधिक काळ अभिनयक्षेत्राच्या वाटचालीत त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये अपूर्व बंगालया नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. अंमलदारनाटकासाठी वाळवेकर ट्रॉफीने त्यांचा गौरव करण्यात आला. रंगभूमीवरील योगदानासाठी त्यांना नानासाहेब फाटक स्मृती पारितोषिक’, ‘केशवराव दाते पुरस्कार’, ‘काशिनाथ घाणेकर पुरस्कारप्राप्त झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ योगदानासाठी २००६ साली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आज चित्रपटांच्या आणि मालिकांच्या माध्यमातून त्यांचा मुलगा शंतनू मोघे स्वत:ला अजमावत आहे.

माझी आनंदयात्राया एकपात्री हास्य कार्यक्रमाचे महाराष्ट्रभर प्रयोग करणारे श्रीकांत मोघे यांचा मूळ पिंड कलाकाराचा आहे. त्यांच्या जडणघडणीत किर्लोस्करवाडीचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे वडील पु.ल. देशपांडे यांचा त्यांच्यावर प्रभाव आहे, तसेच टिळक-आगरकर, सावरकर यांच्या मूलगामी विचारसरणीचा प्रभावही आहे. शिक्षणामुळे मिळालेली सुशिक्षितता व सुसंस्कार यांनी त्यांची अभिनयकला टवटवीत राहिली. अभिनयकला आणि अभिनय व्यवसाय अशा दोन्ही अंगांनी पुरोगामी विचार करणारे श्रीकांत मोघे आजही नव्या कामासाठी त्याच तत्परतेने उत्सुक असतात.

- नेहा वैशंपायन

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].