Skip to main content
x

मोक्षगुंडम, एम. विश्वेश्वरय्या

      र्नाटक राज्यातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला. वडील श्रीनिवासशास्त्री संस्कृत पंडित होते. त्यांचे हिंदू ग्रंथांचे उत्तम पठण होते, शिवाय ते इतरांना आयुर्वेदातील सल्लाही देत. आईचे नाव वेंकचम्मा. सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील गुडलूरजवळील  मोक्षगुंडम गावचे ते मूळ रहिवासी. पण ३०० वर्षांपूर्वी त्यांनी मैसूर संस्थानात स्थलांतर केले. मूळ गावावरून त्यांचे कौटुंबिक नाव मोक्षगुंडम पडले. विश्वेश्वरय्या हे १५ वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. विश्वेश्वरय्यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूरला झाले आणि माध्यमिक शिक्षण बंगळुरुला झाले. १८८१ साली ते मद्रास विद्यापीठातून बी.ए. झाले. नंतर पुण्याच्या विज्ञान महाविद्यालयामधून (आताचे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) ते स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत बी.ई. झाले. बी.ई. झाल्यावर विश्वेश्वरय्यांनी मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी सुरू केली. त्यांचे ऐन तरुण वयातील काम पाहून केवळ ब्रिटिशांना उपलब्ध असलेले इंडियन इरिगेशन कमिशन त्यांना मिळाले. याच काळात त्यांनी दक्षिणेत गुंतागुंतीची वाटणारी पाणीवाटपाची योजना यशस्वीपणे अमलात आणली.

     १९०३ साली पुण्याजवळील खडकवासला धरणावर पावसाळ्यात पुराचे पाणी धरणात साठल्यावर धरणाला धोका पोहोचू नये म्हणून आपोआप उघडणाऱ्या ‘स्लुइस गेट व्हाल्व्ह’ची योजना केली. पावसाळ्यातील पुराच्या पाण्याची उंची वाढून ते पुलाच्या डोक्यावरून वाहू लागले, तर धरण पडण्याचा धोका असतो. त्यासाठी अशी योजना महत्त्वाची ठरते. ही योजना यशस्वी झालेली पाहिल्यानंतर विश्वेश्वरय्यांनी या योजनेचे एकस्व घेतले. खडकवासल्याच्या अनुभवावरून ग्वाल्हेरमधील तिग्र धरण आणि मैसूरमधील कृष्णराजसागर धरणावरही विश्वेश्वरय्यांनी ‘स्लुइस गेट व्हाल्व्ह’ची योजना राबवली. हैदराबाद शहराच्या दोन समस्या होत्या. एक तर तेथे वर्षभर पाण्याचा तुटवडा भासे आणि दुसरे म्हणजे पावसाळ्यात पुराच्या पाण्याने शहराचे नुकसान होई. म्हणजे पावसाचे पाणी वाहून जाण्याची शहरात योग्य अशी सोय नव्हती. हैदराबादच्या निजामाने यासाठी विश्वेश्वरय्यांची मदत मागितली. हैदराबाद शहरात उस्मानसागर आणि हुसेनसागर अशा दोन प्रचंड तलावांची योजना करून, त्यात पावसाचे पाणी साठवून त्यांनी शहराचा पाण्याचा प्रश्‍न सोडवला. यामुळे पुराचे पाणी साठून राहण्याचा प्रश्‍न सुटला, त्यासाठी त्यांनी उताराचे रस्ते, सांडपाणी वाहून जाण्याची सोय इत्यादी गोष्टी करून पुरामुळे साठून राहणाऱ्या पाण्याचा प्रश्‍नही पुरतेपणाने सोडवला. शिवाय हेच पाणी साठल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्‍नही आपोआपच सुटला. यामुळे विश्वेश्वरय्यांबद्दल एक सार्वत्रिक आदराची भावना निर्माण झाली. विशाखापट्टणम बंदर पावसाळ्यात वाहून जाई, बंदराची बरीचशी धूप होई. त्याचा बंदोबस्तही विश्वेश्वरय्या यांनी केला.

     वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी विश्वेश्वरय्यांनी सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानंतर काही वर्षांनी त्यांना मैसूर संस्थानचे राजे कृष्णराज वोडियार, चौथे यांनी मैसूर संस्थानचे दिवाण (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून विश्वेश्वरय्यांना नेमले. विश्वेश्वरय्यांनी हे पद सहा वर्षे सांभाळले. या काळात कावेरी नदीवर त्यांनी कृष्णराजसागर धरण बांधण्याची योजना नियोजनापासून उद्घाटनापर्यंत सांभाळली. या धरणाच्या पाण्यामुळे ४८,००० हेक्टर जमीन ओलिताखाली आली. एवढी मोठी जमीन ओलिताखाली आल्याने हे धरण तेव्हा आशिया खंडातील सर्वांत मोठे धरण ठरले.

     १८९४ साली मैसूरजवळील शिवनासमुद्रम येथे त्यांनी आशिया खंडातील सर्वांत मोठे विद्युतनिर्मिती केंद्र उभारले. मैसूर सोप फॅक्टरी, मैसूर सँडलवुड फॅक्टरी, पॅरासिटॉइट लॅबोरेटरी, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, एसजे पॉलिटेक्नीक इन्स्टिट्यूट, बंगळुरू कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ मैसूर, मंडया शुगर मिल आणि इतर कित्येक उद्योग त्यांनी सरकारी आणि खासगी क्षेत्रात, या काळात सुरू करून दिले. तिरुमाला ते तिरुपती रस्ताही याच काळातला. या काळातील त्यांचे एक वाक्य एखाद्या वचनाएवढे प्रसिद्धीस पावले. ते म्हणजे, ‘‘उद्योग काढा नाहीतर अध:पात करून घ्या - इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश.’’

     १९१७ साली त्यांनी बंगळुरूला ‘गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ स्थापन केले. भारतातल्या सुरुवातीच्या काळातले हे एक महाविद्यालय आहे. त्यानंतर या महाविद्यालयाचे नाव बदलून आता ते ‘युनिव्हर्सिटी विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ असे झाले आहे. आजही कर्नाटकातील ही एक नामवंत संस्था म्हणून ओळखली जाते. मैसूर आणि बंगळुरूमध्ये त्यांनी सार्वजनिक ग्रंथालये सुरू केली. मुलींनी शाळेत जावे म्हणून त्यांनी विविध प्रोत्साहनात्मक योजना सुरू केल्या. त्यांनी ‘मैसूर चेंबर ऑफ कॉमर्स’ स्थापन केली, तसेच त्यांनी ‘कन्नड साहित्य परिषद’ही स्थापन केली. मैसूर संस्थानात विश्वेश्वरय्या यांनी एवढ्या विविध प्रकारच्या संस्था काढल्या, की ते लवकरच मैसूर संस्थानचे ‘पिताश्री’ म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रामाणिकपणा, वेळेत काम करणे आणि एखादे काम स्वीकारल्यावर ते तन्मयतेने करणे ही त्यांची आयुष्यभराची ओळख होती.

     वालचंद हिराचंद या उद्योगपतींना त्यांनी प्रोत्साहन देऊन बंगळुरूला हिंदुस्थान एअरक्राफ्ट्स कंपनी आणि मुंबईला प्रीमिअर ऑटोमोबाइल्स ही मोटरकार बनवणारी कंपनी काढायला उद्युक्त केले. पुढे वालचंद हिराचंद यांची हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी भारत सरकारने विकत घेतली. टाटा आयर्न अँड स्टील कॉर्पोरेशन (टिस्को), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगळुरू) भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, इत्यादी संस्थांत कोठे अध्यक्ष, तर कोठे सभासद अशा विविध पदांवरून त्यांनी काम केले. १९४७ सालापूर्वी मुंबई राज्यात आजच्या पाकिस्तानातील सिंध, कराची, संपूर्ण गुजरात, संपूर्ण कर्नाटक, मध्य पूर्वेतील येमेनमधील एडन, एवढे भाग होते, तर आजच्या महाराष्ट्रातला मराठवाडा तेव्हा निजामशाहीत होता आणि विदर्भ मध्यप्रदेशात होता (त्याला तेव्हा सेंट्रल प्रॉव्हिन्स अ‍ॅण्ड बेरार-मध्य प्रांत आणि वऱ्हाड म्हणत). अशा या मुंबई राज्याच्या सर्व भागांत विश्वेश्वरय्यांचा सगळा काळ व्यतीत झालेला आहे.

     विश्वेश्वरय्या इंग्लंडच्या ‘बॅक बे इन्क्वायरी कमिटी’चे सभासद होते. भारतातील विविध संस्थानांचे भविष्यात काय करायचे हे ठरवण्यासाठी ब्रिटिश सरकारने १९१७ साली नेमलेल्या समितीचे ते सभासद होते. विश्वेश्वरय्या यांनी आयुष्यभर अनेक लोकोपयोगी कामे केली. ते मैसूर संस्थानचे दिवाण असताना त्यांनी संस्थानची जी सर्वांगीण प्रगती केली, त्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारने के.सी.आय.ई. (नाइटहूड) हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. त्यामुळे लोक त्यांना सर विश्वेश्वरय्या म्हणू लागले. भारत सरकारने १९५४ साली ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि ‘भारतरत्न’ हे नागरी पुरस्कार सुरू केले आणि दुसऱ्याच वर्षी विश्वेश्वरय्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. लंडनच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स’ या संस्थेने त्यांना सन्माननीय सभासदत्व दिले. बंगलोरच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ने त्यांना फेलोशिप दिली. अलाहाबाद, आंध्र, मुंबई, कलकत्ता, जाधवपूर, मैसूर, पटणा, वाराणसी येथील विद्यापीठांनी डी.एस्सी., एलएल.डी., डि.लिट. इत्यादी डॉक्टरेट्सच्या पदव्यांनी त्यांना सन्मानित केले. १९२३ सालच्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते.

     मुद्देनहळ्ळीला नंदी हिलच्या पार्श्वभूमीवर विश्वेश्वरय्यांचे स्मारक आहे. बंगळुरू येथे त्यांच्या स्मरणार्थ ‘सर एम. विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ स्थापन झाले. १९६० साली त्यांच्या हयातीतच नागपूरला त्यांच्या नावाने ‘विश्वेश्वरय्या विभागीय अभियांत्रिकी महाविद्यालय’ स्थापन झाले. आता त्याचे नामांतर ‘विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रशास्त्र संस्था’ असे झाले आहे. बेळगावला ‘विश्वेश्वरय्या तंत्रशास्त्र विद्यापीठ’ स्थापन झाले असून कर्नाटकातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. विश्वेश्वरय्यांच्या हयातीत १९६१ साली साजऱ्या झालेल्या त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बंगलोरला ‘विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्यूझियम’ स्थापन झाले. ‘भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स’ या कंपनीचे नाव बदलून ते आता ‘विश्वेश्वरय्या आयर्न अँड स्टील वर्क्स’ असे करण्यात आले आहे. विश्वेश्वरय्या ज्या पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकले, त्या संस्थेच्या दारात त्यांचा पुतळा उभा केला आहे. विश्वेश्वरय्या हे फार नामवंत अभियंता होते. त्यामुळे ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स’ने १५ सप्टेंबर या त्यांच्या जन्मदिनी भारतभर विशेष कार्यक्रम करून ‘अभियंता दिन’ साजरा करायला सुरुवात केली. कर्नाटक राज्यात तर १५ सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी दिली जाते.

     विश्वेश्वरय्या यांनी स्वत: सात पुस्तके लिहिली. ‘प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया’, ‘रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया’, ‘सेइंग वाइज अँड विटी’, ‘मेमरीज ऑफ माय वर्किंग लाइफ’ वगैरे त्यांची शीर्षके आहेत. ते ज्या-ज्या समित्यांवर होते, त्यांचे बारा वृत्तान्त प्रसिद्ध झालेले आहेत, तर विविध विषयांवर मार्गदर्शन करणारी ३१ पत्रके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. विश्वेश्वरय्यांवर इंग्रजीतून १२ आणि कन्नड भाषेतून १५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

     अशा या विश्वकर्म्याचा मृत्यू त्यांच्या वयाच्या एकशे एकाव्या वर्षी झाला.

अ. पां. देशपांडे

मोक्षगुंडम, एम. विश्वेश्वरय्या