Skip to main content
x

मोलेदिना खान बहादूर, महमद हाशम

     मोलेदिना’ संस्था म्हटले की खान बहादुर महमद हाशम या बद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पुण्यात ज्या काही शैक्षणिक संस्था नामांकित झाल्यात त्यापैकी ‘मोलेदिना’ ही एक म्हटल्यास वावगे ठरू नये. संस्थेने नुकतीच ७५ वर्षे पूर्ण केली असून उर्दू, इंग्रजी आणि तांत्रिक शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य स्थापनेपासून केले आहे.

      १९ व्या शतकाच्या अखेरीस पुण्यातील एक मान्यवर नागरिक पै. सेठ सुलेमान अब्दुल वहिद यांच्या प्रेरणेने ‘मदरशा’च्या रूपातून शैक्षणिक सेवेची सुरुवात झाली. एका लहानशा इमारतीत दोन खोल्यात कुराण आणि अरबीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात. पुढे १८९१ मध्ये या मदरशाला उर्दू वर्ग जोडला गेला. पण ही व्यवस्था फारशी यशस्वी झाली नाही. १९२८ पर्यंत ती तशीच कार्यान्वित राहिली. पुढे सरकारी तपासणी अधिकाऱ्यांनी या व्यवस्थेला आक्षेप घेतला व संस्थेच्या व्यवस्थापकांना उर्दू वर्ग बंद करण्याचा सल्ला दिला. परंतु लष्कर विभागातील बहुतांशी रहिवाशांचा हा वर्ग पुढे चालू राहावा असा आग्रह होता. मात्र दुसरीकडे संस्थेचे पदाधिकारी व आप्तेष्टांनी संस्थेची जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली आणि त्या क्षणी खान बहादूर महंमद हाशम ही जबाबदारी उचलण्यास मोठ्या धीराने पुढे सरसावले.

      १९०६ मध्ये जन्मलेल्या या युवा तरुणाकडे शिक्षणाविषयी मोठी आस्था होती. गरीब, गरजू विद्यार्थी शिक्षणापासून कदापिही वंचित राहता कामा नये हा त्यांचा कटाक्ष असे. मोलेदिना साहेबांनी उर्दू वर्गाचे रूपांतर शिक्षण देणाऱ्या शाळेत केले. शिवाय शिक्षण अधिकाऱ्यांची मने जिंकली ती वेगळेच, त्याचेच फळ की काय, १९३२ मध्ये ‘मोलेदिना’ विद्यालयाची बीजे रोवली गेली. स्वखर्चाने चार खोल्या असलेली इमारत बांधून शाळेचे वर्ग चांगल्या व अधिक योग्य वातावरणात भरवण्याची सोय केली. केवळ पुण्यातीलच नव्हे, तर सिंध आणि पंजाब मधून स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवण्याचे मोठे कार्य खान बहादूर व त्यांच्या संस्थेने केले. खान साहेबांची शिक्षण संस्था हळूहळू विस्तारत होती. खडकीचे पहिले मुस्लीम उपाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. तसेच पूना सब अर्बन म्युनिसिपाल्टीचे नगरसेवक, पूना मुस्लीम स्टुडण्टस् युनियनचे अध्यक्ष, पूना डिस्ट्रीक्ट मुस्लिम एज्युकेशन कॉन्फरन्सचे संघटक व मानद सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. तसेच ससून संस्था मंडळाचे ते काही काळ सदस्य होते.

     संस्थेच्या ‘नावारूपासाठी’ त्यांचे योगदान लाखमोलाचे आहे. म्हणूनच संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तर तांत्रिक शाळा उद्घाटनांच्या कार्यक्रमाच्या (१४ ऑक्टोबर १९६८) यशवंतराव चव्हाण उपस्थित राहिले ते केवळ मोलेदिना खान बहादूर महंमद यांच्या शैक्षणिक कार्याला ‘सलाम द्यावा’ म्हणूनच.                      

     - अस्लम जमादार

मोलेदिना खान बहादूर, महमद हाशम