Skip to main content
x

नाईक, वसंत फुलसिंग

       संत फुलसिंग नाईक यांचा जन्म पुसदजवळील गहुली या गावी झाला. त्यांच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण चार गावांत मिळून पार पाडले. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण अमरावतीला झाले. ते नागपूरच्या नील सीटी हायस्कूलमध्ये मॅट्रिक, तर मॉरीस महाविद्यालयामधून बी.ए. आणि विधी महाविद्यालयातून एलएल.बी. झाले. त्यानंतर त्यांनी पुसदला १९४० मध्ये वकिली सुरू केली. त्यांचे पुसद येथील जीवन वकील, नगरपालिकेचे अध्यक्ष व नेता या तीन चाकोरीतून पुढे सरकलेले दिसते.

       वसंतराव नाईक १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले व त्यांची जुन्या मध्य प्रदेशाचे राजस्व उपमंत्री म्हणून निवड झाली. त्यांनी १९५८ मध्ये चीन व जपानला भेट दिली. भूदान कार्य हे परमपवित्र आहे व आपण ते अंगीकारले पाहिजे, असे नाईक यांनी मनाशी ठरवले. त्यांनी सर्व लहानथोर कार्यकर्त्यांना भूदान आंदोलनात तन-मन-धनाने काम करावयास तयार केले व अल्पावधीत भूदानात हजारो एकर जमीन मिळवून दिली. नाईक यांंना यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात सहकारमंत्री म्हणून घेण्यात आले. त्यांनी त्या काळात  शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी पुष्कळशी कामे मार्गी लावली.

       नाईक एप्रिल १९५७ मध्ये शेतकी मंत्री झाले. त्यांनी नवीन विहिरी खोदून जास्त जमीन ओलिताखाली आणण्याबद्दल शेतकऱ्यांना उत्तेजन दिले. त्यांनी पम्पिंग सेट्स विकत घेण्यासाठी ‘तकावी’ योजना अमलात आणली. त्यांनी विहिरी खोदण्यासाठी कर्जाची रक्कमही वाढवून दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून सहकारी तत्त्वावर जिनिंग फॅक्टरी व प्रेस उघडल्या. त्यांनी बांधबंदिस्ती योजना लागू केली. तसेच सहकारी शेतीचा पुरस्कार केला, जपानच्या आंतरराष्ट्रीय भात मंडळावर भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले.

       भारतीय कृषी संशोधन परिषदांच्या अर्थस्थायी समितीवर वसंतराव सदस्य होते. पुढे १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले व  नाईक यांची प्रशंसनीय कामगिरी विचारात घेऊन त्यांना राजस्व खाते सुपूर्द केले गेले. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे ते अध्यक्ष होते. ते १ डिसेंबर १९६३ ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने सरकारने बारा कलमी धडाडीची योजना आखली.

       महाराष्ट्रातील शेतीची एकूण परिस्थिती अनुकूल नसतानासुद्धा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठण्याचा राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी विडा उचलला आणि या कार्याला खंबीर नेतृत्व दिले. त्यांनी शेती व शेतकरी यांच्या विकासासाठी मनापासून प्रयत्न केले. त्यांनी १९६८ मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठ स्थापण्याचा निर्णय घेतला व जून १९६८ मध्ये महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा अमलात येऊन कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये २ कृषी विद्यापीठे स्थापण्याचा निर्णय झाला.

       नगर येथे म.फु.कृ.वि. आणि अकोला येथे डॉ.पं.कृ.वि.ची स्थापना करण्यात आली. कोकण विभाग आणि मराठवाडा विभाग येथील जनतेला वेगळे विद्यापीठ हवे होते. मे १९७२ नंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणी येथे करण्यात आली आणि त्याच वेळी दापोली येथे बा.सा.को.कृ.वि. स्थापन झाले. अशा रीतीने वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्राला चार विद्यापीठे मिळाली.

- डॉ. शरद यादव कुलकर्णी

नाईक, वसंत फुलसिंग