Skip to main content
x

नारळीकर, अनंत विष्णू

     अतिवाहकतेच्या क्षेत्रात मौलिक कार्य केलेले भौतिकशास्त्रज्ञ अनंत विष्णू नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. भौतिकशास्त्रज्ञ नारळीकरांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे उत्तर प्रदेशातील बनारस येथे झाले. बनारस विद्यापीठातून १९६० साली भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर अनंत नारळीकरांनी इंग्लंडला जाऊन केंब्रिज विद्यापीठात ‘अतिवाहकता’ या विषयात संशोधन केले आणि १९६५ साली पीएच.डी. ही पदवी मिळवली. प्रा. नारळीकरांच्या पीएच.डी.चा प्रबंध हा नायोबियम या मूलद्रव्याच्या आणि त्यापासून तयार केल्या गेलेल्या मिश्रधातूंच्या अतिवाहकतेशी संबंधित होता.

     पीएच.डी. मिळवल्यानंतर इंग्लंडमधील लँकेस्टर विद्यापीठात आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा विद्यापीठात काही काळ संशोधन करून ते भारतात परतले. भारतात आल्यावर १९६९ सालापासून सुमारे तीन वर्षांसाठी त्यांनी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. १९७२ साली ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अधिव्याख्याता या पदावर रुजू झाले. यानंतर १९७३ साली नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील (एन.पी.एल.) अतिवाहकता विभागाचे प्रमुखपद स्वीकारून त्यांनी आपल्या पुढील संशोधनाला सुरुवात केली.

     प्रा. नारळीकरांचे संशोधन हे  मुख्यत्वेकरून, पदार्थांच्या रासायनिक रचनेतील सूक्ष्म दोषांचा पदार्थाच्या भौतिक गुणधर्मांवर जो परिणाम होतो, त्यावर आधारित आहे. यांत प्रा. नारळीकरांनी पदार्थांच्या रासायनिक रचनेतील आण्वीय पातळीवरील दोषांचा अतिवाहकतेवर होणारा परिणाम सखोलपणे अभ्यासला आहे. गेली काही वर्षे त्यांनी अत्याधुनिक सूक्ष्मदर्शकांतर्फे, अतिवाहकता, चुंबकत्व, इत्यादी गुणधर्म लाभलेल्या विविध पदार्थांच्या पृष्ठभागांचा विशेष अभ्यास केला आहे. अतिवाहकतेवरील संशोधनात विशेष योगदान देणारे प्रा.नारळीकर हे २००० साली राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतून निवृत्त झाले.

     २००० सालापासून प्रा.नारळीकर हे टुर्कू विद्यापीठ (फिनलंड), रेकाह भौतिकशास्त्र संस्था (इस्राएल), पेकिंग विद्यापीठ (चीन), केंबिज विद्यापीठ (इंग्लंड), साव कार्लोस विद्यापीठ (ब्राझील) अशा अनेक परदेशी शैक्षणिक संस्थांना पाहुणे प्राध्यापक म्हणून नियमित भेटी देत आले आहेत. प्रा. नारळीकर यांची भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकॅडमी (इन्सा) या संस्थेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि फेलो म्हणून नियुक्ती झाली असून, विद्यापीठ अनुदान आयोग आणि अणुशक्ती विभागाच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान संशोधनासाठी स्थापलेल्या इंदूर येथील केंद्रात पाहुणे प्राध्यापक म्हणूनही त्यांची नेमणूक झाली आहे. प्रा. अनंत नारळीकर यांचे आजवर तीनशेहून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहेत. प्रा.नारळीकरांनी अनेक पुस्तकांचे संपादनही केलेले आहे. यांत अतिवाहकतेवरील ‘स्टडीज ऑफ हाय टेंपरेचर सेमिकंडक्टर्स’ या प्रदीर्घ मालिकेतील पुस्तकांच्या संपादनाचाही समावेश आहे.

     पीएच.डी.साठी संशोधन चालू असतानाच टेट स्मृती पुरस्कार मिळवणारे प्रा.नारळीकर हे १९९३ साली केंब्रिज विद्यापीठातील डी.एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) या पदवीचेही मानकरी ठरले. प्रा. नारळीकर यांना इंडियन क्रायोजेनिक्स कौन्सिलचे चटर्जी सुवर्णपदक १९७७ साली मिळाले होते. मटेरियल्स रिसर्च सोसायटीतर्फे १९९० सालचे अतिवाहकतेवरील संशोधनाचे पारितोषिक देऊन प्रा.नारळीकरांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात आपला आगळा ठसा उमटवणाऱ्या प्रा.नारळीकर यांना भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे १९९६ सालचे होमी जहांगीर भाभा पदक आणि फाय फाउण्डेशनचा २००० सालचा विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

 डॉ. राजीव चिटणीस

नारळीकर, अनंत विष्णू