Skip to main content
x

नगरकर, गोविंद परशुराम

नगरकर, पंडितराव

गोविंद परशुराम उपाख्य पंडितराव नगरकरांचा जन्म नगर जिल्ह्यातील भातवडी-पारगाव या खेड्यात झाला, तर बालपण मुंबईला, गिरगावात गेले. वडील एका मोठ्या पेढीचे भागीदार असल्यामुळे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यांचे वडील त्यांना पंडित म्हणत, म्हणून पुढे सारेच त्यांना पंडित म्हणू लागले.

पंडितरावांचे शिक्षण आंग्रेवाडीतील आर्यन शाळेत झाले. अभ्यासापेक्षा त्यांचे लक्ष नाटक-सिनेमे पाहण्याकडे, तसेच खेळात व व्यायामात असायचे. बालगंधर्व व बापूराव पेंढारकर यांची अनेक पदे ते उत्तम प्रकारे गात असत.

एकदा ‘संत तुकाराम’ चित्रपटाचे लोकप्रिय नट व गायक  विष्णुपंत पागनीस यांनी पंडितरावांचे गाणे ऐकले आणि त्यांच्या गाण्यावर खुश  होऊन त्यांना गाण्याची तालीम देण्यास सुरुवात केली. याच वेळी शाळेच्या संमेलनातील गायन स्पर्धेत पंडितरावांनी भाग घेतला. ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकातील पद खास बापूराव पेंढारकरांच्या पद्धतीने गाऊन त्यांनी विशेष बक्षीस मिळविले. हे बक्षीस आणि पागनीसांची तालीम यांमुळे त्यांचे अभ्यासावरचे लक्ष साफ उडाले. मॅट्रिकच्या परीक्षेला दोन-तीन महिने असताना त्यांनी शाळेला रामराम केला.

पंडितरावांचे लग्न १९२९ साली झाले. त्यानंतर त्यांनी चरितार्थासाठी शास्त्रीय संगीताच्या मैफली करण्यास सुरुवात केली. भारत गायन समाजाचे बापूराव केतकर यांच्याकडून त्यांनी रागदारी गायनाचे शिक्षण  घेतले. ओडियन रेकॉर्ड कंपनीने त्यांच्या आठ ध्वनिमुद्रिका ‘जी.पी. नगरकर’ या नावाने १९३० साली काढल्या. त्यांमधील ‘जाके मथुरा’ या गाण्याने फार लोकप्रियता मिळविली, आणि पंडितराव नगरकर ‘जाके मथुरा नगरकर’ या नावाने लोकप्रिय झाले. याच सुमारास पंडितरावांचा परिचय सुलोचना पालकर या नटीशी झाला. त्या ‘संशयकल्लोळ’ नाटकात रेवतीची भूमिका करत. त्यानंतर पंडितराव ‘संशयकल्लोळ’मध्ये अश्विन शेठचे काम करू लागले. पंडितराव व सुलोचना पालकर यांनी १९३२ साली ‘सुलोचना नाटक मंडळी’ची स्थापना केली आणि ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ इत्यादी नाटके गाजविली.

आचार्य अत्रे यांना पंडितरावांचा अभिनय आणि गाणे फार आवडत असे. त्यांनी ‘लग्नाची बेडी’ या त्यांच्या लोकप्रिय नाटकात पंडितरावांना ‘पराग’ ही नायकाची भूमिका दिली. या नाटकातील पंडितरावांचे ‘ती पाहताच बाला’ हे पद प्रचंड लोकप्रिय झाले. ‘लग्नाची बेडी’ नाटकाच्या सुमारे ५०० प्रयोगांत पंडितरावांनी काम केले. सुलोचना पालकर, वनमाला, शांता आपटे, उषा किरण, नलिनी बोरकर, स्नेहप्रभा प्रधान, पद्मा चव्हाण, आशू, बापूराव माने यांनी पंडितरावांबरोबर रश्मीचे काम केले.

पंडितराव मुंबईच्या खासगी आकाशवाणी केंद्रावरून महिन्यातून दोन-तीनदा गाऊ लागले. त्यातून त्यांना मुंबईच्या इंपिरिअल फिल्म कंपनीमध्ये तीन वर्षांच्या कराराने नोकरी मिळाली. ‘मायाबाजार’ (१९३९) या मराठी चित्रपटात पंडितरावांनी भूमिका केली व संगीत दिग्दर्शनही केले. ‘अमर भूपाळी’ या चित्रपटात त्यांनी १९५१ साली  केलेली शाहीर होनाजीची भूमिका आणि लता मंगेशकरांबरोबर गायलेल्या ‘घनश्याम सुंदरा’ या भूपाळीने पंडितराव महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रिय झाले.

सवाई गंधर्व, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, मिराशीबुवा इत्यादी मान्यवर गायकांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यामुळे पंडितराव एक चतुरस्र गायक झाले. त्यांनी गायलेल्या शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजने व भावगीते यांच्या बर्‍याच ध्वनिमुद्रिका निघाल्या. ‘मी गातो नाचतो, आनंदे वेडा झालो’ हे ‘देहू रोड’ या नाटकातील त्यांचे विशेष गाजलेले पद, तर ‘डोळे तुझे बदामी’, ‘सखे भावगीत माझे’ या त्यांच्या भावगीताच्या ध्वनिमुद्रिका खूप गाजल्या. पुणे येथे त्यांचे निधन झाले.

अद्वैत धर्माधिकारी

नगरकर, गोविंद परशुराम