Skip to main content
x

निकम, गोविंद शावजी

गोविंद शावजी निकम यांचा जन्म कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शावजी लक्ष्मण निकम तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण सावर्डे येथील जिल्हा लोकल बोर्डाच्या शाळेमध्ये झाले. त्यांनी चिपळूण तालुका मराठा शिक्षण परिषदेच्या वसतिगृहात राहून जीवन शिक्षण शाळा चिपळूण नं. 1 मध्ये माध्यमिक शिक्षण घेतले व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी येथील आर. बी. शिर्के विद्यालयामधून पूर्ण केले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना अंकगणितामध्ये 100 पैकी 99 गुण प्राप्त झाले होते. गोविंद यांच्या बालपणी कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत साधारणच होती. सातारा जिह्यातील अपशिंगे हे त्यांचे मूळगाव, परंतु त्यांचे पूर्वज व्यवसाय, नोकरीनिमित्त भटकंती करत करत कोकणातील फुरुस या गावी आले. गोविंद यांच्या वडिलांचा व्यवसाय शिंपी कामाचा होता. परंतु फुरुससारख्या लहानशा कडेकपारीतील खेड्यात शिंपी काम मिळत नसल्याने त्यांनी सावर्डे येथे व्यवसाय सुरू केला. शावजी यांनी गोविंद यांना शिंपी कामाचे प्राथमिक धडे देण्यास सुरुवात केली. परंतु गोविंदचे त्यामध्ये मन रमेना, हे शावजीरावांच्या लक्षात आले. शिक्षणाविषयी आस्था आणि दुर्गम भागातील आपल्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे याबद्दल सतत कळकळ असल्यामुळे शावजीराव अस्वस्थ झाले. त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने इ. पाचवीचा वर्ग सुरू करण्याचा संकल्प केला आणि त्यासाठी सावर्डे परिसरात 2 आणे-4 आणे अशी देणगी, लाकूड सामान जमा केले आणि 2 खोल्यांची एक इमारत उभारली. त्यात पाचवीचा वर्ग सुरू होऊन क्रमाने सहावी व सातवीचे वर्ग सुरू झाले आणि ही शाळा बहुशिक्षकी पूर्ण प्राथमिक शाळा म्हणून साकारली. गोविंद यांना समाजसेवा, शैक्षणिक व सहकार सेवेचे संस्कार लहानपणीच वडिलांकडून मिळाले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या दुर्गम भागात स्वातंत्रोत्तर काळात एस.टी. पोहचण्यास पन्नास वर्षे लागली अशा दुर्गम भागात अर्ध शतकापूर्वी निकम यांनी ज्ञानगंगा घरोघरी पोहचवली, तसेच विना सहकार नही उद्धार हे जाणून सहकार चळवळीला चालना देऊन शेकडोे सहकारी संस्था विविध ग्रामीण भागात स्थापन केल्या.

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गरीब मुलांसाठी शैक्षणिक सुविधा प्राप्त व्हावी व शिक्षणाची ज्ञानगंगा दुर्गम खेड्यापाड्यातील घरोघरी जावी असे मत  निकम यांनी अण्णासाहेब शिंदेंजवळ व्यक्त केले. त्यावेळी सक्ती शिक्षणाचा प्रसार व विस्तार मोठ्या स्वरूपात होत होता. प्राथमिक शिक्षकांची अत्यंत गरज असल्यामुळे निकम यांनी स्वत:हून प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. प्राथमिक शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे त्यांनी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काही काळ भारतीय आयुर्विमा प्रतिनिधी म्हणून काम केले. या काळातच  त्यांची   चिपळूण तालुक्यातील मौजे निवळी, येथील ‘शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन घडावे’ हा विचार असणारे विचारवंत व प्रतिष्ठित शेतकरी बाबासाहेब सुर्वे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याशी झालेल्या संवादातूनच निकम यांना शैक्षणिक, सहकार व समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी प्रथम शिक्षण संस्था स्थापन करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेसारख्या महान शिक्षण संस्थेचा अभ्यास केला. त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मार्गदर्शनही लाभले. सह्याद्रीच्या दुर्गम भागातील बहुजन समाजातील मुला-मुलींना शिक्षण मिळावे या एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या एकोणीस वर्षांच्या निकम यांनी आपल्यापरीने संकल्पपूर्तीसाठी प्रयत्न सुरू करून यश मिळविले.

संस्था स्थापन करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य व आर्थिक बळ मिळणे गरजेचे असते हे ओळखून निकम यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या आणि  यशस्वीपणे 1 जून 1957 रोजी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत सावर्डे येथे पहिली माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली.

निकम यांचा 5 मे 1961 रोजी अनुराधा (पूर्वाश्रमीच्या सुधा बाळकृष्ण देसाई) यांच्याशी विवाह झाला. त्यांनी निकम यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला यथोचित साथ दिली. प्रपंचाला आर्थिक गरज असल्यामुळे अनुराधा यांनी एस.टी.सी. पूर्ण केले आणि सह्याद्री शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी स्वीकारली. सह्याद्री शिक्षण संस्थेने माध्यमिक शाळांचा विस्तार घडविताना त्यातून कनिष्ठ महाविद्यालये, प्राथमिक शाळा, कृषी, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदविका महाविद्यालये, चित्रकला-शिल्पकला महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय, कला व विज्ञान महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय अशी व्यावसायिक महाविद्यालये विनाअनुदान तत्त्वावर सुरू केली. कोकणातील शिक्षण क्षेत्रात निकम यांनी एक शैक्षणिक क्रांतीच घडवून आणली.

या संस्थेच्या सर्व शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र विद्यार्थी ग्राहक सहकार भांडारे व विविध ठिकाणी 14 वसतिगृहे असून त्यांचा कारभार विद्यार्थ्यांमार्फतच सहकार तत्त्वावर चालविला जातो.

निकम यांनी 12 मार्च 1964 रोजी गोविंदराव सह्याद्री शिक्षण संस्थेतील कर्मचार्‍यांसाठी सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत कर्मचार्‍यांना कर्जपुरवठा करून गृहोपयोगी वस्तू व बांधकाम साहित्य इत्यादी पुरवले जाई. त्यांनी सुरू केलेली पतसंस्था ही रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचार्‍यांची पहिलीच पतसंस्था होय. महाराष्ट्र ग्रंथालय समितीचे सदस्य असताना त्यांनी 1974 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 100 हून अधिक ग्रंथालयांची स्थापना रत्नागिरी सहाय्यक धर्मादाय आयुक्ताच्या सहकार्याने केली.

दूरदृष्टी, नेतृत्व, कर्तृत्व, अनुभवसंपन्नता या गुणांच्या बळावर निकम यांनी रत्नागिरी जिल्ह्यात मच्छिमार संस्था, गृहतारण संस्था, बिगरशेती पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था, स्वयंरोजगार संस्था, मजूर संस्था, हरितगृह सहकारी संस्था, शेळी-मेंढीपालन संस्था, कुक्कुटपालन संस्था इ. सहकारी संस्था स्थापन केल्या. त्याचबरोबर या सर्व संस्थांना प्रशिक्षित सचिव मिळावेत म्हणून 2001 मध्ये सहकार प्रशिक्षण देणारी शामराव पेजे सहकार प्रबोधिनी संस्था सहकार तत्त्वावर सुरू केली. या सर्व संस्थांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात सहकाराची क्रांती घडून आली.

निकम यांनी 1989 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली व भाजपाचे डॉ. श्रीधर नातू यांचा पराभव करून लोकसभेत प्रथम पाऊल टाकले. तर 1991 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गिते यांचा पराभव करून ते निवडून आले. त्यांनी आपल्या खासदारकीच्या सात वर्षांच्या कालखंडात कोकणातील विविध प्रश्न लोकसभेत मांडण्याचे व ते तडीस नेण्याचे काम केले.

निकम 1996 मध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आले. ते 1998 मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रतिनिधी राज्य सहकारी बँकेचे संचालक झाले. त्यांनी  1999-2000 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद भूषविले.

जिल्हा बँक ही शेतकरीवर्गाची बँक असून आपली धोरणे शेतकरी, ग्रामीण अर्थकारण यांना धरून असली पाहिजेत, यावर निकम यांचा कटाक्ष असे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सहकारी संस्थांना मिळावा म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी पारंपरिक आणि प्रशिक्षित शेतकरी यांच्यासाठी वराहपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, फुलशेती, हापूस आंबा कलम, काजू रोपवाटिका, गांडूळ खतनिर्मिती असे सहकारातील विविध उपक्रम राबवून सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. तसेच हुडको या केंद्रशासनाच्या प्रशिक्षण, अर्थपुरवठा व मार्गदर्शन सह्याद्री शिक्षण संस्थेद्वारा सहकार तत्त्वावर केला. राज्य शासनाच्या आदेशान्वये निकम यांनी गरीब शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना राबवून अनेक सहकारी संस्थातील शेतकर्‍यांना कर्जमुक्त केले.

निकम यांनी कुक्कुटपालन व्यवसायासाठी अनेक ठिकाणी सहकारी संस्था स्थापन केल्या व या संस्थांची जिल्हा समिती निर्माण करून शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाची विक्री, खाद्यपुरवठा इ. सारख्या अनेक योजना राबविल्या. संपातून होरपळून निघालेला गिरणी कामगार डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी यंत्रमाग, प्रक्रिया विभाग यांसारखे संच सहकारी तत्त्वावर उभे करून गिरणी कामगारांच्या हाताला काम दिले. त्यांनी सहकार तत्त्वावर मुद्रणालय स्थापन करून शाळा व महाविद्यालयांसाठी साप्ताहिक व मासिक सुरू केले. कला विद्यालयातील प्रशिक्षित तरुणांसाठी सहकारी तत्त्वावर हातकागदनिर्मिती केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला. सावर्डे विभाग महिला औद्योगिक सहकारी संस्था व रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्था निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज या दोन्हीही संस्था उत्तम रीतीने प्रगतिपथावर आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म. यांच्यामार्फत युरोप व ऑस्ट्रेलिया अभ्यास दौर्‍याच्या वेळी निकम यांनी आधुनिक शेळीपालन, आधुनिक शेती अवजारे, सहकारी शेतीपूरक उद्योग, सहकारातून केली जाणारी शेती व शेतीपूरक उद्योगांसाठी मदत या बाबींचा प्रामुख्याने अभ्यास केला. पुढे त्यांनी लक्ष्मी सहकारी कृषी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्या. कोंडीवरे मार्फत गूळनिर्मिती प्रकल्प सुरू केला.

मंडणगड या रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात एम.आय.डी.सी. स्थापना करण्यामागे निकम यांचा मोठा वाटा होता. तेथे सहकारातून उद्योग सुरू करावेत अशी त्यांची भूमिका होती. सहकारी तत्त्वावर शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन इ. संस्थांमधून उत्पादित होणारा माल टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी शीतगृहाची योजना सुरू केली होती. या योजनेतून शेतकर्‍यांचा माल अल्प दरात इतरत्र पोचविला जात असे त्यामुळे शेतकर्‍यांच्या नफ्यामध्ये वाढ होई.

निकम यांनी कोकणासारख्या दुर्गम भागात लक्ष्मी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली व शेतकर्‍यांना आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी 1972 मध्ये महाबळेश्वर येथे राज्य माध्यमिक मुख्याध्यापक परिषदेमध्ये कृषी, तंत्रज्ञान, शैक्षणिक व वैद्यकीय या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सभापती-शिक्षण व वित्त समिती रत्नागिरी जिल्हा परिषद (1972-1978), अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा परिषद (1978-1979), अध्यक्ष विभागीय सहकार कार्यालय नाशिक सल्लागार समिती सदस्य अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (लोकसभा 1989-1991), सदस्य-स्थायी समिती कृषी मंत्रालय इ. पदे भूषविली.

निकम यांनी रत्नागिरी जिल्ह्यात केलेले सहकार व शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन त्यांना येथील जनतेने ‘सहकारमहर्षी’ व ‘शिक्षणमहर्षी’ म्हणून गौरविले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या प्रसंगी संस्थेच्या मुख्यालयातच हृदयविकाराने निकम यांचे निधन झाले. त्यांची समाधी, स्मृतिगंध संग्रहालय व वैकुंठेश्वर मंदिराची उभारणी सह्याद्री शिक्षण संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. त्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून केवळ विद्यार्थीच घडविण्याचे काम केले नाही तर सामाजिक बांधिलकीतून चांगली माणसे घडविण्याचे काम केल्याची साक्ष हे स्मारक देते.

- प्रकाश अर्जुन राजेशिर्के

निकम, गोविंद शावजी