Skip to main content
x

ओक, विनायक कोंडदेव

विनायक कोंडदेव ओक यांचे घराणे मूळ गुहागरचे (जिल्हा-रत्नागिरी). त्यांचा  जन्म हेदवी येथे झाला. लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे  बालपण कष्टात गेले. शिक्षणाची आबाळ झाली. काहीतरी करून शिकण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इंग्रजी तीन इयत्तांपर्यंतचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. पाश्‍चात्त्य विद्येने संस्कारित झालेल्या सुरुवातीच्या या पिढीत अनेक कर्तृत्ववान माणसे निर्माण झाली. त्यात वि.कों.ओक  यांचे नाव घेतले जाते. ओक यांनी शिक्षक म्हणून सरकारी शिक्षण खात्यात नोकरीस प्रारंभ केला, आणि ‘अ‍ॅडिशनल डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर’ या पदावरून ते निवृत्त झाले.

शिक्षण खात्यात काम करत असल्याने १८६१ ते १८९५ या काळात शालेय क्रमिक पुस्तके व इतर बालपुस्तके मेजर कँडी यांच्या सूचनेनुसार लिहिली. त्यात ‘हिंदुस्थान कथारस’, ‘हिंदुस्थानातील योद्ध्यांची थोरवी’ अशी ऐतिहासिक पुस्तके तर ‘महन्मणिमाला’ हे चरित्र, ‘मुलास उत्तम बक्षीस’, ‘मुलांचे कल्याण’, ‘मुलास थोडासा बोध’, ‘इसापनीती’ इत्यादी शैक्षणिकदृष्ट्या जवळ-जवळ ५० पुस्तके त्यांनी लिहिली. ही पुस्तके लिहिताना मुलांना बोध, करमणूक व वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांच्या प्रवृत्तीकडे, त्यांच्या ग्रहणक्षमतेकडे आवर्जून लक्ष दिले. भाषांतरित पुस्तकेही त्यांनी लिहिली.

१८६६ मध्ये प्रकाशित  झालेले ‘लघुनिबंधमाला’ हे त्यांचे इंग्रजी निबंधांवर आधारित असलेले पहिले पुस्तक होय. १८५१  मध्ये ‘दक्षिणा प्राइझ कमिटी’ची स्थापना झाली होती. कमिटीच्या प्रोत्साहनाने ग्रंथलेखन, मुद्रणप्रसार ह्यांना गती आली आणि मराठी भाषेत अनेक उपयुक्त ग्रंथांची भर पडत गेली. इंग्रजीतील उत्कृष्ट ग्रंथांची भाषांतरे करवून घ्यावयाची आणि भाषांतरकारांना योग्य बक्षीस द्यायचे, ही कमिटीची कल्पना होती. त्यातूनच ‘लघुनिबंधमाला’ या पुस्तकासही बक्षीस मिळाले. इतिहास विषयावरही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांतील उल्लेखनीय पुस्तके म्हणजे जगातील प्रसिद्ध राष्ट्रांचा इतिहास सांगणारे ‘इतिहासतरंगिणी’ (१९७८). ‘हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास’ (१८७०), ‘फ्रान्स देशातील राज्यक्रांतीचा इतिहास’ (१८७६), याशिवाय काही थोर पुरुषांची चरित्रे त्यांनी लिहिली. ‘पीटर दी ग्रेट’ (१८७४), ‘शिकंदर बादशहा’ (१८७५), ‘ड्यूक ऑफ वेलिंग्टन’ (१८७६), ‘आल्फ्रेड दी ग्रेट’ (१८८२), ‘अब्राहम लिंकन’ (१८९०), ‘ग्लॅडस्टन’ (१९०३), ‘डॉ. जॉन्सन’ इत्यादींची चरित्रे त्यांनी लिहिली.

श्रेष्ठ दर्जाचे चरित्रकार-

“१८७५ ते १८८५ या कालखंडातील ‘डॉ. जॉन्सन’ हे आधुनिक  मराठीतील पहिले खरेखुरे चरित्र आहे”, असे श्री. बनहट्टी यांनी म्हटले आहे. (संदर्भ- अर्वाचीन म. वा. इतिहास भाग १- १८७४ ते १९२०- अ.ना. देशपांडे) वि.कों.ओक हे एक श्रेष्ठ दर्जाचे चरित्रकार असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. पाश्चात्त्य थोर नामवंत पुरुषांच्या चरित्राप्रमाणे ‘जावजी दादाजी चौधरी’ (१८९२), ‘रावराजे सर दिनकर राजवाडे’ (१८९७) यांचीही चरित्रे त्यांनी लिहिली. या चरित्रांमध्ये काही भाषांतरित आहेत तर काही स्वतंत्रपणे आहेत. चरित्रलेखन करताना ‘नायकाचे गुण तेवढे दाखवावेत, दोषांविषयी बोलू नये’ असे त्यांचे धोरण होते.

‘शिरस्तेदार’ (१८८१) या लहानशा स्वतंत्र कादंबरीत लाच खाण्यापासून होणार्‍या दुष्परिणामांचे अत्यंत वेधक वर्णन केले आहे. ही सामाजिक कादंबरी त्या काळात लोकप्रिय झाली. इंग्रजी कथेवर आधारित ‘आनंदराव’चे लेखन त्यांनी केले. हे त्यांचे ललितलेखन!  ‘पुष्पवाटिका’ नावाचा वेचक दहा कवितांचा संग्रह (१८७१) त्यांनी पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केला. त्यातील कविता काही संस्कृत तर काही इंग्रजी कवितांच्या आधारावर लिहिलेल्या आहेत. ‘रामशास्त्र्याची निःस्पृहता’ तसेच ‘प्रेमबंधन’ या ओकांच्या स्वतंत्रपणे लिहिलेल्या उल्लेखनीय कविता होत. ‘मधुमक्षिका’ हा त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहे. ओक हे मोरोपंतांच्या कवितेचे भोक्ते होते.

ओक यांची भाषा साधी, सरळ, सोपी होती. त्यांच्या लेखनगुणांमुळे मुंबईच्या ‘ख्रिश्चन लिटरेचर सोसायटी’ने त्यांच्याकडून मुलांसाठी डझनभर पुस्तके लिहवून घेतली होती. ख्रिस्ती धर्मप्रचार हाच या पुस्तकांचा हेतू होता. राजनिष्ठेपोटी ओक यांनी हे कार्य केले. त्यांच्या नावावर ४८ पुस्तकांची नोंद आढळते. ‘कारंजे आणि ढग’, ‘लांडग्याची गोष्ट’, ‘राणीची गोष्ट’ यांसारखी सातपासून सोळा पृष्ठांपर्यंतच्या दहा-अकरा चोपड्याही आहेत. ती सर्व मेथॉडिस्ट ख्रिस्ती लिटररी सोसायटीने प्रसिद्ध केली आहेत.

बालवाङ्मयाचे जनक-

ओक यांनी त्यांच्या साहित्यविषयक कारकिर्दीत ‘बालबोध’ हे पहिले खरेखुरे मराठी वळणाचे मासिक (१८८१) सुरू केले आणि बालसाहित्यात नवे दालन खुले झाले. मुलांसाठी असलेल्या या मासिकात ‘संपादकीया’मध्ये ते मुलांना उद्देशून म्हणतात- ‘शाळेत कळत नाहीत पण तुम्हांस कळल्या तर पाहिजेत अशा लक्षावधी गोष्टी आहेत. त्यांतल्या थोड्या-थोड्या आम्ही दर खेपेस तुम्हांला अगदी तुमच्या साध्या भाषेत सांगू; तुमच्या मनाला करमणूक व्हावी, तुमच्या अंगचे सद्गुण वाढावेत यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.’ असा प्रयत्न ओकांनी मासिकाच्या माध्यमातून पुढे सलग चौतीस वर्षे नेटाने केला. लहान मुलांप्रमाणे मोठ्यांनाही त्यांनी वाचक बनवले. ‘बालबोध’मधील लेखन एकट्या ओकांनीच केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्बोधक, रंजक वाटेल असे नानाविध स्वरूपाचे लेखन आधुनिक मराठीत ओक यांनीच प्रथम केले. मासिकाची वर्गणी बारा आणे ठेवून वर्गणीदार वाढवले व मासिक खेडोपाडी पोचवले. आपल्या संपादकीय कारकिर्दीत ओकांनी ‘बालबोध’मधून ४०२ चरित्रे, ४०२ कविता, ४०२ निबंध, ३७१ शास्त्रीय निबंधांवरील माहिती व इतर ८५० विषय एवढे प्रचंड लेखन केले. म्हणूनच त्यांना ‘बालवाङ्मयाचे जनक’ असे म्हटले आहे.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].