Skip to main content
x

पार्थन, बैजू मदक्कल

                 एकविसाव्या शतकातील इलेक्ट्रॉनिक युगाची संवेदनशीलता आणि परंपरा यांचा मेळ साधणाऱ्या बैजू पार्थन यांचा जन्म केरळ राज्यातील कोव्हियम या गावात झाला. आईचे नाव कमलादेवी. केरळातील निसर्ग, समाज, लोकव्यवहार व तत्त्वज्ञान या सर्वांच्या संस्कारांतून व निरीक्षणांतून त्यांचे व्यक्तिमत्त्व तयार होत गेले. केरळातील साम्यवादी समाजरचनेत कलावंताला खालच्या दर्जाचे स्थान असल्याबद्दलची भावना पार्थन यांच्या मनात अडसर निर्माण करीत होती. तरीपण कलेची ओढ त्यांना कला महाविद्यालयाकडे घेऊन गेली.

                 त्यांनी १९७८ मध्ये, गोवा येथील कला महाविद्यालयात कलाशिक्षणासाठी प्रवेश घेतला. महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता लक्ष्मण पै यांच्याकडून त्यांनी कलेचे औपचारिक शिक्षण व प्रेरणा घेतली (१९७८-८३). कला इतिहास अभ्यासताना त्यांना पाश्‍चिमात्य कलावंत व कलेच्या विविध प्रवाहांची माहिती मिळाली. चित्र काढत असताना ती उपयोगी ठरली. इम्प्रेशनिझम व एक्स्प्रेशनिझम चित्रांचा त्यांच्या प्रारंभिक चित्रांवर स्पष्ट परिणाम जाणवतो.

                 पार्थन यांच्या मते, चित्र कलावंताला आत्मिक समाधान देत असते, कलानिर्मितीत त्याला परमानंद अनुभवता येतो. चित्र अवकाशात पार्थन स्वत:ला प्रमाण मानतात. चित्र अवकाशावर स्वत:चे साम्राज्य गाजवतात.

                 गोव्यात शिक्षण घेत असताना पार्थन हे काही पाश्चिमात्य प्रवाशांच्या सहवासात आले. ते मन:शांतीच्या शोधात युरोपातून आलेले होते व त्यांत प्रामुख्याने जर्मन, ब्रिटिश व हिप्पी होते. त्यांच्या सहवासाने त्यांची संस्कृती, धर्म, समाज, तत्त्वज्ञान, कल्पना इ. माहिती पार्थन यांना झाली. या संपर्कातून सार्त्र या लेखकाचे ‘एज ऑफ रेड सन’ हे पुस्तक त्यांच्या वाचण्यात आले. या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावर आहे. पार्थन यांना या निमित्ताने जगाचा एक वेगळा अनुभव मिळाला.

                 देशपरत्वे बदलते तत्त्वज्ञान, संस्कृती पार्थन यांना विश्‍वाबद्दल विचार करण्यासाठी प्रवृत्त करत होती. त्याच वेळेस त्यांनी भारतीय मिथ्यकल्पना, तंत्र, तत्त्वज्ञान यांचे अध्ययन सुरू केले. तत्त्वज्ञान, पुरातत्त्व व पुराणकथा यांच्या माध्यमांतून त्यांना आपल्या लोकधारणा समजण्यास मदत झाली. या सर्वांचा परिणाम त्यांचे व्यक्तिमत्त्व घडण्यावर झाला. कला इतिहास अभ्यासताना पाश्‍चिमात्य कलावंतांचा परिचय झालेला होताच. त्यांची चित्रे व त्यांच्या विचारांवर हा सर्व प्रभाव पाहावयास मिळतो.

                 पार्थन १९८६ साली मुंबईत आले. ते टाइम्स वृत्तपत्र समूहात इलस्ट्रेटर म्हणून काम करीत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘कम्पेरेटिव्ह मायथॉलॉजी’ या विषयात पदवी संपादन केली. त्याबरोबर चित्रे काढणे चालू होते. मुंबई व दिल्ली येथील मोजक्या गॅलऱ्यांतून त्यांची चित्रे प्रदर्शित होऊ लागली. बुद्धाच्या पुनर्जन्माची कल्पना मांडणारे तिबेटीयन साहित्य त्यांच्या वाचनात आले. त्यांतील मानवी मूल्याधिष्ठित विचार पार्थन यांना महत्त्वाचा वाटला. या दरम्यान १९८९ मध्ये ते विद्या कामत यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले.

                 चित्रकला, इतिहास, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाबरोबर त्यांनी संगणक हार्डवेअरचेही ज्ञान संपादन केले. परंपरा व आधुनिकता यांच्यात नेहमीच एक विचारांची दरी असते. मानवी मूल्यांशी व व्यवहारांशी ती निगडित असते. याचा प्रत्यय पार्थन यांच्या चित्रांत येतो. चित्र काढत असताना चित्रकार बाह्य जगाचे भान विसरून जातो. तयार होणारे चित्र हे त्या कलावंताचे जणू विश्‍वरूपच असते. त्यातूनच कलावंताला स्वत:चा बोध होतो, ओळख होते. अशा आत्मनिष्ठ प्रवृत्तीतून त्यांची चित्रे व व्यक्तिमत्त्व संपन्न झालेले आहे. मात्र यासाठी ते मिथ्यकथांमधील आणि आधुनिक यंत्रयुगातील अशा दोन्ही प्रतिमा प्रतीके म्हणून वापरतात.

                 पार्थन यांच्या चित्रांत प्रामुख्याने पिवळा, काळा, पांढरा, लाल, निळा या प्राथमिक रंगांच्या विविध छटा वापरलेल्या असतात. चित्रातील प्रतिमा आशयाला सूचक दिशा देतात. चित्रातील मानवाकृती प्रामुख्याने काळ्या- पांढऱ्या रंगांत, फोटो रिअ‍ॅलिस्टिक पद्धतीने रंगविलेल्या असतात. चित्र - अवकाशावर पूर्ण ताबा संपादन केलेला असतो. चित्रातील आकारांची निर्मिती आशय व चित्र- तंत्रांच्या गुंफणीतून तयार होते.

                 पार्थन यांचा परंपरा व तंत्रज्ञान या दोन्हींवर विश्वास आहे. धर्मवादापेक्षा विज्ञान - विचाराने मानवाची प्रगती लवकर होऊ शकते अशी त्यांची धारणा आहे. तंत्रज्ञान जसे मानवाला सुखसोयी उपलब्ध करून देते व जीवन सुखी करते, त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान व परंपरा मानवाला आत्मिक बळ देतात. या धारणेतून बैजू पार्थन यांनी चित्रनिर्मिती केलीआहे.

                 आकर्षक मांडणी, रंगसंगती आणि रूढ प्रतिमांना एक वैचारिक कलाटणी देण्याची क्षमता यांमुळे पार्थन यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

- गणेश तरतरे

संदर्भ
संदर्भ: होस्कोटे, रणजित; ‘बैजू पार्थन युजर्स मॅन्युअल’; प्रकाशक: आफ्टर इमेज, मुंबई; २००६.
पार्थन, बैजू मदक्कल