Skip to main content
x

पाटील, रामराव बाबूराव

             देवणी गोवंशाचे नाव सातत्याने राष्ट्रीय स्तरावर चमकवण्यात रामराव पाटील यांचे योगदानमोलाचे आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यामधील लातूर जिल्ह्यामधील गोविंदवाडी या गावामध्ये एका गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. कुटुंबाची गुजराण करण्यासाठी दरवर्षी पंचक्रोशीमध्ये फिरून १२ ते १८ महिन्यांची गायींची खोंडे निवडून खरेदी करायची व जाणती झाल्यावर विकायची हा पारंपरिक व्यवसाय होता. त्यांच्यावर लहानपणापासून गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्याचे संस्कार झाले. त्यांनी कुटुंबातील कर्तेपण आल्यावर फक्त ‘देवणी’ वंशाचेच आदर्श गोधन करायचे हे एकच ध्येय मनाशी जपले व शेवटच्या श्‍वासापर्यंत त्याच ध्येयाशी ते प्रामाणिक राहिले. खरेदी केलेल्या लहान खोंडापासून आदर्श वळू कसा तयार करायचा याचे अनुभवसिद्ध तंत्र त्यांनी विकसित केले. साधारणपणे १५ महिन्यांचे वासरू निगराणीत आल्यावर ते त्या वासराचा आहार, दैनंदिन व्यायाम, स्पर्धेच्या दृष्टीने सराव, जंतुनाशक व औषधे, इ.चे वेळापत्रक निश्‍चित करत व त्याप्रमाणे कार्यप्रणाली पूर्ण करत असत. पशुप्रदर्शन स्पर्धांमध्ये आपल्याकडील वळूला बक्षीस मिळाले पाहिजे, ही अपेक्षा त्यांनी आयुष्यभर बाळगली. हाच वसा त्यांच्या पत्नी हरीबाई जपतात. त्यांनी अत्यंत अडचणीच्या काळातही गोधन संवर्धनाचे कार्य नेमाने चालू ठेवले. उत्तम आहाराबरोबर जनावराचे सौंदर्यसुद्धा उत्तम असले पाहिजे व ते सातत्याने स्वच्छतेमधून जपले पाहिजे यासाठी प्रत्येक वळूला ते दररोज खरारा करत असत व आठवड्यातून दोनदा त्याला स्वच्छ धूत असत. यामुळे गोचीड निर्मूलन होते, रक्तप्रवाह उत्तम राहतो, अनावश्यक केस गळून जातात व वळूची कातडी चमकदार दिसते. प्रत्येक वळूला प्रदर्शनाच्या दृष्टीने कसे उभे राहायचे, मान वर कशी करायची, अंगावर झूल टाकताच ऐटीत कसे बसायचे, प्रदर्शनाच्या वेळी चालताना ऐटीत कसे चालायचे, स्टुलावर पुढचे पाय ठेवून उभे कसे राहायचे याचा सराव सलग १ ते १॥ वर्षे करून घेण्याची खासियत पाटील यांच्याकडे होती. प्रत्येक वळूचा त्याच्या वयाच्या मानाने व्यायाम कसा असला पाहिजे याबाबत पाटील यांनी काही निकष ठरवले होते, त्यानुसार प्रत्येक वळूकडून दैनंदिन व्यायाम ते करून घेत. प्रत्येक वळूचा आहार व त्याचे वेळापत्रक पाळण्याबाबत ते अत्यंत आग्रही असत. पाटील यांच्या गोठ्यामधील गोधनाने त्यांचे नाव राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर गौरवले जाईल अशा पद्धतीनेच चुणूक दाखवून यश संपादन केले. त्यांनी १९७७पासून देवणी वंशाची सुधारणा, विस्तार, उत्तम वंश सिद्धवंश व्हावी यासाठी स्वतःकडील वळू तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या गायींसाठी नैसर्गिक पैदाशीसाठी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.  हावगी स्वामी यात्रा उदगीर-शो चँपियन (१९८२); अखिल भारतीय पशुप्रदर्शन-अलाहाबाद शो चँपियन (१९८३); अखिल भारतीय पशुप्रदर्शन-नवी दिल्ली- शो चँपियन (१९८६); माळेगाव यात्रा पशुप्रदर्शन-प्रथम क्रमांक (१९९४); अखिल भारतीय पशुप्रदर्शन-लातूर प्रथम क्रमांक (२००६) असे सन्मान त्यांच्या गोधनाने मिळवले. अशा या निस्सीम गोभक्ताचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले, परंतु त्यांच्या मृत्युपश्‍चात त्यांच्या पत्नी हरीबाई गोसेवेचे व्रत अखंडपणे निभावत आहेत.

- मानसी मिलिंद देवल

पाटील, रामराव बाबूराव