पाटील, शरद
मार्क्सवादी विचारांच्या मुशीतून घडलेल्या, बहुविध प्रतिभा लाभलेल्या आणि प्राचीन भारतीय इतिहास व प्राच्यविद्या यांमध्ये आगळी क्रांतिकारक विचारधारा निर्माण करून हादरे देणारे प्राच्यविद्या अभ्यासक व विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांचा जन्म धुळे येथे झाला. कॉम्रेड पाटील यांनी भारतीय समाजातील विविध प्रकारची विषमता नष्ट करण्यासाठी सातत्याने वैचारिक मंथन केले. त्यांनी जातिव्यवस्थेवर व विषमतेवर आधारलेल्या समाजरचनेला आव्हान देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी सत्यशोधक, मार्क्सवादी या नियतकालिकांतून आपले विचार मांडले. सामाजिक समतेसाठीच्या अनेक लढ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ आटर्समध्ये असताना, विद्यार्थिदशेतच त्यांच्या लढ्यांची सुरुवात झाली. त्यानंतर ते कामगार चळवळ, आदिवासींच्या वनहक्कांसाठीची चळवळ, धरणग्रस्तांचा लढा, शेतकरी व कष्टकरी यांच्या प्रश्नांचा लढा व नामांतराची चळवळ, अशा अनेक लढ्यांमध्ये सक्रिय होते.
कॉम्रेड पाटील यांचा मार्क्सवादाचा गाढा अभ्यास तर होताच. त्यांनी वेद, पुराणे, महाकाव्ये व बौद्ध धर्माचे ग्रंथ यांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला. त्यासाठी ते संस्कृत शिकले. त्यांनी आपल्या अभ्यासामधून काढलेले मूलगामी निष्कर्ष चकित करणारे होते. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.
भारतातील सामंतशाहीचा उगम व गुलामगिरी याबद्दल त्यांचे निष्कर्ष मार्क्सवादी विश्लेषणाच्या प्रस्थापित विचारसरणीपेक्षा वेगळे होते. तसेच शोषणमुक्त भारतीय समाजाची नवरचना करायची असेल, तर केवळ वर्ग-संघर्षावर अवलंबून राहता येणार नाही, तर सर्वप्रथम प्राचीन इतिहासाला वर्णवादी, जातीयवादी, स्त्रीविरोधी व वर्गवर्चस्ववादी पूर्वग्रहांपासून मुक्त केले पाहिजे; यावर त्यांचा मुख्य भर होता.
१९४५ पासून कॉम्रेड पाटील मार्क्सवादी पक्षाचे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष व १९६४नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी) सदस्य होते. मार्क्सवादी पक्ष भारतीय समाजातील जाती-अंताला महत्त्व देत नसल्याने या पक्षात राहून आपण अपेक्षित कार्य करू शकत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी १९७८मध्ये सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. प्राचीन काळापासून भारतीय समाजाची रचना गुंतागुंतीची आहे. त्यात मुळापासून बदल घडविण्यासाठी मार्क्स, फुले व आंबेडकर या तिन्ही विचारधारांचा योग्य उपयोग केला पाहिजे, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. अशा विचारांनीच जात, वर्ण, वर्ग व स्त्री दास्य यांचा शेवट होऊन समतेवर आधारित समाज तयार होऊ शकेल, असे त्यांचे प्रतिपादन होते.
प्राचीन इतिहास व साहित्य यांचे सर्वस्वी निराळे विश्लेषण करण्यासाठी वेगळी पद्धत हवी व त्यासाठी प्रस्थापित अथवा पारंपरिक चौकटी मोडणे गरजेचे आहे, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन होते. जरी त्यांच्या मनाची जडणघडण मार्क्सवादी विचारधारेची असली, तरी ते मार्क्सवादी विश्लेषणाच्या जंजाळात अडकून पडले नाहीत. एका अर्थाने कॉम्रेड पाटील हे प्राच्यविद्येत विरचनावादाचा (Deconstructionism) व उत्तर आधुनिकवादाचा (Postmodernism) वापर करणारे होते. प्राचीन इतिहास, साहित्य, धर्म व संस्कृती यांच्या संदर्भात त्यांनी प्रस्थापित मतांना हादरे देणारे नवे सिद्धान्त मांडले. त्यांनी जाणीव-नेणिवान्वेषी तर्कशास्त्राची (Dialectical Logic) उयुक्ततता सांगून सामाजिक बदलांसाठी त्याचा वापर करण्याची गरज असल्याचे मत मांडले आहे.
‘अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र’, ‘दास-शूद्रांची गुलामगिरी’, ‘रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष’, ‘कास्ट फ्युडल सर्व्हिट्यूड’, ‘शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी’, ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम - मट्रिआर्की’, ‘गायनोक्रॅसी अॅन्ड मॉडर्न सोशॅलिझम’ हे कॉम्रेड पाटील यांचे काही गाजलेले ग्रंथ आहेत.
कॉम्रेड पाटील यांना २०१४मध्ये महाराष्ट्र इतिहास परिषदेने वा.सी. बेंद्रे पुरस्काराने गौरवले होते. तसेच, त्याच वर्षी त्यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात आला.
— डॉ. प्रमोद जोगळेकर / आर्या जोशी