Skip to main content
x

पाठक, श्रीधरशास्त्री त्र्यंबक

महामहोपाध्याय

       .म. श्रीधरशास्त्री त्र्यंबक पाठक हे पूर्व खानदेशातील पारोळ्याचे राहणारे. यांचे शिक्षण इंदूर व काशी येथे झाले. हे शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखेचे होते. व्याकरण, वेदान्त, धर्मशास्त्र वगैरे विषयांचा त्यांचा चांगला व्यासंग होता. शास्त्री म्हणून सरकारी हायस्कूलमध्ये व कॉलेजमध्ये काम करून ते सेवानिवृत्त झाले. नंतर ते धुळे येथे राहत. त्यांनी संन्यास घेऊन शंकरानंद असे नाव धारण केले होते.

     श्रीधरशास्त्री धर्मपरिवर्तनवादी होते. अस्पृश्यतेला शास्त्रांत आधार नाही म्हणून म. गांधींनी येरवडा तुरुंगातून काढलेल्या पत्रकाला त्यांची मान्यता होती.

     त्यांनी वेदशास्त्रोत्तेजक सभा व भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांतर्फे व्याख्याने दिली. १९२४ साली प्रयाग येथे भरलेल्या व सोनगीर येथे भरलेल्या भारतीय पंडित परिषदेस ते उपस्थित होते.

     त्यांचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत. संस्कृत -

      १. ईश, २. केन, ३. कठ, ४. मुण्डक, यावर बालबोधिनी टीका, ५. महाभाष्यशब्दकोशः (सहकार्याने). मराठी - ६. शुक्ल यजुर्वेदाचे मराठी भाषान्तर, ७. नित्यविधि, ८. अस्पृश्यता निवारणाचा शास्त्रार्थ. याशिवाय त्यांनी अनेक निबंध लिहिले व भाषांतरे केली आहेत.

संपादित

पाठक, श्रीधरशास्त्री त्र्यंबक