Skip to main content
x

पाथरे, अरुण परशुराम

भित्तिचित्रकार

कोकणातील निसर्ग व कलेची कौटुंबिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या अरुण, परशुराम पाथरे यांचा जन्म संगमेश्‍वर (जि. रत्नागिरी) येथे परशुराम व मीराबाई पाथरे या दांपत्याच्या पोटी झाला. वडील गणपतीच्या मूर्ती बनवीत. याशिवाय साइनबोर्ड, नाटक व दशावतारासाठी मेकअप, गावात, देवळात आणि शुभप्रसंगी लागणारे चित्रकामही करीत. एक बंधू छायाचित्रकार, तर दुसरे वडिलांसोबत चित्रे काढीत. साहजिकच अरुणलाही लहानपणापासूनच चित्रकलेची ओढ वाटू लागली. त्यांचे शालेय शिक्षण संगमेश्‍वर येथील ‘पैसा फंड इंग्लिश स्कूल’मध्ये झाले. त्यांच्या अंगातील कलागुण बघून त्यांच्या वडिलांचे मित्र व पुण्याचे तत्कालीन नगरसेवक हरिभाऊ भिडे यांनी त्यांस पुण्यास आणले व १९६३पासून अभिनव कला महाविद्यालयात त्यांच्या कलेचे रीतसर शिक्षण सुरू झाले.

प्रथम (ड्रॉइंग टीचर्स डिप्लोमा) कलाशिक्षक पदविका व त्यानंतर रंगचित्रकला (पेंटिग) व जाहिरातकलेचा (कमर्शिअल आर्ट) अभ्यासक्रम एकाच वेळी पूर्ण करून त्यांनी दोन्ही विषयांतील शासकीय कला पदविका (जी.डी. आर्ट) प्राप्त केली. शिक्षणाच्या काळात लक्ष्मी रस्त्यावरील केळकर चित्रशाळेत रघुनाथ केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थार्जनासाठी सूचनाफलक (साइनबोर्ड), नाटकाचे पडदे अशी कोणतीही व्यावसायिक कामे केली. परंतु पाथरे यांच्यातील अस्वस्थ कलावंत कधीच समाधानी नसे. या काळात त्यांनी सहाध्यायी मुकुंद केळकर, सुदाम डोके अशा अनेकांसह ‘कौस्तुभ आर्ट सर्कल’ची स्थापना करून पुण्यातील पारंपरिक कलाविश्‍वात या तरुण कलावंतांनी प्रयोगशीलता व आधुनिकता आणण्याचे प्रयत्न केले.

सुरुवातीच्या काळात १९६८च्या दरम्यान ना.श्री बेंद्रे यांचे मित्र व समकालीन बाबा फाटक यांच्या सोबत काच आणि मृद्पात्र (सिरॅमिक) या माध्यमात काम करण्याची संधी मिळाली. त्यातून त्यांना भित्तिचित्र (म्युरल) व भित्तिशिल्प या विषयांतील कलात्मक व तांत्रिक ज्ञानाचा अनुभव मिळाला. त्यामुळे पुढील काळात अरुण पाथरे पुण्यातील कलाक्षेत्रात आपल्या प्रयोगशीलतेमुळे व विविध माध्यमे हाताळण्यातील कौशल्यामुळे प्रसिद्धीस आले. जोमदार रेषा, आकारांचे विरूपीकरण, अमूर्ततेकडे वाटचाल व सातत्याने प्रयोगशील हाताळणी हे यांचे वैशिष्ट्य ठरले.

व्यावसायिक भित्तिचित्रांत फायबर ग्लास, रंगीत काच, धातू आणि प्रसंगी ‘सेपोरेक्स’सारख्या अनेक माध्यमांचा वापर करीत त्यांनी या कलाप्रकाराला वेगळेच स्वरूप प्राप्त करून दिले. या व्यावसायिक कामांसोबतच त्यांनी चित्रे, फायबरमधील पॉटरी, शिल्पे अशी कलानिर्मितीही सातत्याने सुरू ठेवली.

त्यांच्या प्रयोगशील निर्मितीला महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन व बॉम्बे आर्ट सोसायटीचा पुरस्कार मिळाला.  १९६९ ते २००२ या काळात त्यांची मुंबईत तेरा एकल व तीन समूह प्रदर्शने झाली. व्यावसायिक भित्तिचित्रांत ‘भारत फोर्ज’, ‘लार्सन टूब्रो’ असे उद्योगसमूह, तसेच ताजसाठी व रशिया येथील हॉटेल्ससाठी निर्मिलेली भव्य भित्तिचित्रे त्यांच्या नावावर आहेत. याशिवाय इतरांनी घेतलेली अनेक कामे आयुष्यभर अरुण पाथरे करीत राहिल्यामुळे अनेक कामांच्या श्रेयापासून ते वंचित राहिले.

अबोल व विक्षिप्त स्वभाव, बेफिकीर व प्रसिद्धि-पराङ्मुख वृत्ती आणि कलावंताचे लहरीपण यामुळे हा कलावंत काहीसा समाज व मान्यता यांपासून दूर व अविवाहित राहिला. गेली आठ-दहा वर्षे हा कलावंत अज्ञातवासातच आपली कलानिर्मिती सातत्याने करीत असून नव्याने स्वत:चा शोध घेत आहे.

- प्रा. सुधाकर चव्हाण

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].