परांजपे, शकुंतला रघुनाथ
शकुंतला रघुनाथ परांजपे यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रारंभीचे शिक्षण घरी व नंतर माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा हायस्कूलमध्ये झाले. १६ व्या वर्षी मॅट्रिक. १९२६ साली मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी.ची परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण. पुढील अभ्यासक्रम विलायतेत पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती. १९२९ साली केंब्रिजमधील गणिताची ट्रायपॉस उत्तीर्ण. जिनिव्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये काही वर्षे नोकरी. जिनिव्हामध्ये युरा स्लेप्ट ऑफ श्वेत- रशिअन गृहस्थाशी विवाह झाला. १९ मार्च १९३६ रोजी मुलीचा (सई परांजपे) जन्म झाला. आपल्या आजीचे सई हे नाव मुलीला ठेवले. १९३७ साली स्वित्झर्लंडच्या कायद्याप्रमाणे घटस्फोट घेऊन मुलीसह त्या हिंदुस्थानात परतल्या. त्या दोघींचेही वास्तव्य वडील रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांच्याकडे होते.
शकुंतला परांजपे हिंदुस्थानात परतल्यावर त्यांनी संततिनियमनाच्या प्रचाराचे कार्य पुष्कळ वर्षे हिरिरीने केले. या कामातील त्यांचे स्फूर्तिस्थान म्हणजे महर्षी कर्वे यांचे चिरंजीव व शकुंतला बाईंचे भाऊ आणि संतती नियमनाच्या कार्याचे प्रवर्तक रघुनाथ धोंडो कर्वे हे होत. या कामासाठी शकुंतला परांजपे यांनी काही काळ पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात नोकरी केली. १९५८ साली राज्य सरकारने त्यांची नियुक्ती विधानसभेवर केली. त्यानंतर १९६४ साली, राज्यसभेवरही सहा वर्षांसाठी त्यांची नेमणूक झाली. . संततिनियमनाच्या संदर्भात ‘पाळणा लांबवायचा की, थांबवायचा?’ हे पुस्तक आणि र.धों.कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्या’तून काही लेखन केले. ‘काही आंबट काही गोड’ या पुस्तकातील ‘राष्ट्रपती नियुक्तीची सहा वर्षे’ या लेखातही या कार्यासंबंधीचे अनुभव आले आहेत.
साहित्य ललित गद्य : ‘भिल्लिणीची बोरे’ (१९४४), ‘माझी प्रेतयात्रा’ (१९५७), ‘काही आंबट काही गोड’ (१९७९), कादंबरी : ‘घराचा मालक’ (१९४८) नाटक : ‘चढाओढ’ (१९३६) व ‘सोयरीक’ (१९३६) ही फ्रेंचमधील प्रहसनांची रूपांतरे, ‘प्रेमाची परीक्षा’ (१९४१), पांघरलेली कातडी (१९४२), किशोर कादंबरी: सवाई सहांची कोकणातील करामत (१९७२), सवाई सहांची मुंबईची मोहीम (१९७५), सवाई सहांची दर्याची राणी (१९८१), इंग्रजीतील लेखन : Three years in Australia आणि Sense and Sensibility (१९७०)
ललितलेखन-
शकुंतला परांजपे यांचे ललितगद्य, कादंबरी आणि नाटक या तीनही साहित्यप्रकारांतील लेखन वेधक आहे. ललितगद्यामधील पहिला संग्रह ‘भिल्लिणीची बोरे’ (१९४४). हा संग्रह हरी नारायण आपटे यांना अर्पण केला असून त्या अर्पणपत्रिकेतून लेखिकेला हरिभाऊंबद्दल वाटणारा नितांत आदर व्यक्त होतो. या संग्रहातील लेखांमधून रोजच्या आयुष्यात घडणारे विविध अनुभव खेळकर शैलीत व्यक्त झाले आहेत.
त्यांचा दुसरा ललितलेखसंग्रह ‘माझी प्रेतयात्रा’ (१९५७). या पुस्तकाची प्रस्तावना शकुंतला परांजपे यांची कन्या सई परांजपे हिची आहे. ‘लहान तोंडी मोठा घास घेताना’ सई परांजपे यांनी म्हटल्याप्रमाणे शकुंतलाबाईंचा स्पष्टवक्तेपणा यातील लेखनातही उतरला आहे. लेखांची भाषा साधी, घरगुती असून मोकळ्या विनोदामुळे लेख बोधप्रद असूनही बोध देणारे वाटत नाहीत. यातील काही लेख व्यक्तिचित्रणात्मक (कोकणातली आजी, थोर की पोर?) काही लेख किस्से सांगणारे (राहिलेला बेत, मंडईची बस), काही विनोदी शैलीत टीका करणारे (उधार उसनवार, शुभमंगल) आहेत. ‘अण्णांना मुलगी झाली असती तर?’ हा महर्षी कर्वे यांच्यावरील लेख स्वभावचित्रणाचा वेगळाच नमुना आहे. ‘माझी प्रेतयात्रा’मध्ये उत्तम कल्पनाविलास असून त्याला वास्तव समाजप्रवृत्तीची बैठक आहे.
त्यांचा तिसरा संग्रह ‘काही आंबट काही गोड’ (१९७९). यांतील बहुसंख्य लेख आठवणीवजा आत्मचरित्रात्मक असून या लेखांमधून हळूहळू साकारणारे खुद्द लेखिका आणि तिचे वडील रँग्लर परांजपे यांचे चित्र हृद्य आहे. समाजाकडे आणि स्वतःकडे बघण्याची मिस्कील दृष्टी, नर्म विनोद, हलकी-फुलकी, खुसखुशीत लेखनशैली या वैशिष्ट्यांमुळे सर्वच ललितलेखन लोकप्रिय ठरणारे आहेत.
‘घराचा मालक’ही कादंबरी बालमानसशास्त्रावर आधारलेली असून पित्याची लाडकी असलेल्या आईवेगळ्या लहान मुलीची कथा यात रंगविली आहे. लेखिकेच्या आयुष्याचे प्रतिबिंब यात उमटलेले दिसते.
‘चढाओढ’ आणि ‘सोयरीक’ (१९३६) ही फ्रेंचमधून मराठीत घेतलेली दोन प्रहसने असून; ‘प्रेमाची परीक्षा’(१९४१) आणि ‘पांघरलेली कातडी’ (१९४२) ही दोन स्वतंत्र नाटके आहेत. ‘प्रेमाची परीक्षा’ हे चार अंकी प्रहसन पुरुषपात्रविरहित असून ते महर्षी कर्वे यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले आहे. एकमेकांच्या प्रेमाची परीक्षा पाहणार्या गौरी व शंकर यांची कथा यात रंगविली आहे. ‘पांघरलेली कातडी’ हे पाच अंकी संगीत नाटक आहे. हे नाटक लिहिण्याच्या चार वर्षे आधी एका सभेत लेखिकेने मराठी नाटकावर टीका केली असता, दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी संगीत नाटक लिहून दाखवण्याचे आव्हान दिल्यावरून हे नाटक लेखिकेने लिहिले. भूमिकांची अदलाबदल करून प्रेमाची परीक्षा पाहणारी पात्रे यात रंगविली आहेत.
१९९१ साली त्यांना भारत सरकारचा ‘पद्मविभूषण’ सन्मान प्राप्त झाला.