Skip to main content
x

पवार, अप्पासाहेब गणपत

     डॉ. प्पासाहेब  गणपतराव पवार यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील मुचंडी ह्या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. मुचंडी गावापासून जवळच असलेल्या वडगाव येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.

     १९२४ मध्ये शहापूर येथील चिंतामणराव विद्यालयामधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषय घेऊन १९२८ मध्ये त्यांनी बी. ए. पदवी मिळविली. १९२९ मध्ये एलएल. बी. चे पहिले वर्ष पूर्ण करतानाच १९३० मध्ये अप्पासाहेब एम.ए. झाले. १९३१ मध्ये एलएल. बी. पदवी मिळवून उच्च शिक्षणासाठी ते लंडन विद्यापीठात दाखल झाले. १९३४ मध्ये लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीजमधून रेन् ऑफ शाहू छत्रपतीः १७०८ ते १७४९ हा प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. एलएल.बी. ची पदवी आधीच मिळाल्यामुळे त्यांना १९३५ मध्ये त्यांनी बार अ‍ॅट लॉ पदवी प्राप्त केली.

      भारतात परत आल्यानंतर १९३५ मध्ये अप्पासाहेबांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामध्ये  प्राध्यापक म्हणून शैक्षणिक पेशास प्रारंभ केला. इतिहासाचा मोठा व्यासंग व वक्तृत्वगुण, विद्यार्थ्यांबद्दलचे प्रेम यामुळे अल्पावधीतच उत्तम प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक झाला. १९४५ मध्ये ते राजाराम महाविद्यालयाचे  प्राचार्य झाले. त्यांच्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत त्यांनी महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध केले. महाविद्यालयाचा इतिहास संपादित केला. खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव हे याच कालावधीत राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.

      १९४९ मध्ये त्यांची बदली झाली. गुजरातमधील विसनागर येथील महाविद्यालयाचे ते प्राचार्य म्हणून काम पाहू लागले. तीन वर्षात विविध प्रकल्प राबवून त्यांनी कॉलेजला उत्तम दर्जा प्राप्त करून दिला. तेथे ते गुजराथी भाषाही शिकले.

      १९५२ ते १९५४ ह्या काळात पुणे येथे ते शिक्षण उपसंचालक पदावर होते. काही काळ त्यांनी माध्यमिक शालान्त परीक्षा मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. १९५९ ते १९६० महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सहसंचालक व १९६० ते १९६२ पर्यंत शिक्षण संचालक म्हणून समर्थपणे जबाबदारी पेलली. ग्रामीण भागात महाविद्यालये सुरू करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. माध्यमिक शाळांच्या इमारतींना अनुदान देण्याची प्रथा सुरू केली.

       दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्रासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज भासू लागली. महाराष्ट्र शासनाने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी १९६२ मध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना केली. अप्पासाहेब पवार विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. विद्यापीठाचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या कार्यास गती आली. विद्यापीठासाठी कोल्हापूर शहराच्या बाहेर १०४७ एकर जमीन मिळाली. बांधकामास सुरूवात झाली. अप्पासाहेबांना १९७५ पर्यंत कुलगुरू पद मिळाल्याने नियोजनपूर्वक सर्व कामे पूर्ण झाली. विद्यापीठास प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. विद्यापीठ खर्‍या अर्थाने लोकपीठ व्हावे यासाठी अप्पासाहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. इमारती उभ्या केल्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना सुरू केली. व्याख्यानमाला सुरू झाल्या. संशोधनास चालना दिली. प्रारंभी विद्यापीठ क्षेत्रात तेहतीस महाविद्यालये होती. डॉ. अप्पासाहेब पवारांच्या १२ वर्ष १ महिन्याच्या  कार्यकाळात चौर्‍याऐंशी महाविद्यालये झाली. शिवाजी विद्यापीठाला सक्षम विद्यापीठ बनवून डॉ. अप्पासाहेब पवार २० जानेवारी १९७५ रोजी कुलगुरू पदावरून निवृत्त झाले.

      अप्पासाहेब इतिहास संशोधक होते. मराठ्यांच्या इतिहासातील अनेक दुर्मिळ दस्तऐवज, पत्रे, दफ्तरे ह्यांचा अभ्यास व संशोधन करून त्यांनी ती प्रकाशित केली. जिजाबाई व ताराबाई कालीन कागदपत्रांबरोबरच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची कागदपत्रेही त्यांनी प्रकाशित केली.

       डॉ. अप्पासाहेब पवार हे आदर्श शिक्षक, उत्कृष्ट प्रशासक, व्यासंगी इतिहास संशोधक व चिंतनशील शिक्षणतज्ज्ञ होते. शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार म्हणून त्यांचा सार्थ गौरव केला जातो.

- प्रा. महेश गायकवाड

संदर्भ
१. जाधव बी. एम. ‘शिवाजी विद्यापीठाचे शिल्पकार - कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार - जीवन व कार्य’ ; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २००६.
पवार, अप्पासाहेब गणपत