Skip to main content
x

पवार, पोपटराव बागुजी

       गर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात विकासाची गंगा आणणारे व त्याचा कायापालट घडवणारे पोपटराव बागुजी पवार यांचा जन्म हिवरे बाजार या गावात झाला. वडिलांचा पारंपरिक शेती व्यवसाय होता, तर आई जानकीबाई गृहिणी होत्या. गावातील जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये पोपटरावांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी केडगाव येथील जीवन शिक्षण मंदिर येथे प्रवेश घेतला. त्यांनी अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातून  शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेती करणे पसंत केले. वडिलांच्या काळात गावात फुलणाऱ्या शेतीमध्ये आता मात्र दारूच्या भट्ट्या लागत होत्या. हे विदारक चित्र त्यांना बदलायचे होते. गावातील पारंपरिक शेती व्यवसाय टिकला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे पोपटराव पवार यांनी गावाच्या सरपंचपदी आल्यावर हे चित्र बदलण्याचे आव्हान स्वीकारले. गावात शेतीचे मळे फुलले पाहिजेत यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन पवार यांनी केले.

       शेती पुनर्जीवित करायची असेल तर पाणलोट विकास कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे हे जाणून जल संधारणाची कामे सुरू झाली. पूर्वी पाऊस पडला की, संपूर्ण पाणी वाहून जायचे, परंतु जल संधारण कामामुळे डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी आणि ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवले गेले. वृक्ष लागवड, कुरण विकास, लुज बोल्डर, गली प्लग, माती नाला बांध, सिमेंट चेक डॅम, सिमेंट साठवून बंधारे, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन बंधारे, जैविक बंधारे अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली.  शेतातील पाणी शेतात अडवल्यामुळे साहजिकच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. पवार यांनी ही सर्व कामे लोकसहभागातून केली. त्यामुळे कुठल्याही सरकारी मदतीविना ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने ही कामे केली. शेती पुनर्जीवित करण्याचा पहिला टप्पा पार पडला. शेतीचे क्षेत्र वाढू लागले. ज्वारी, बाजरी, कडधान्य यांसारख्या कोरडवाहू पिकांऐवजी कांदा, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, फूलशेती व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला अशी पिके  घेतली गेली. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीकपद्धतीत बदल केला पाहिजे हे ओळखून पवार यांनी ऊस आणि केळी ही जास्त पाणी लागणारी पिके  घेण्यावर गावात बंदी घातली. त्याचा गावकऱ्यांना फायदा झाला. १९९६मध्ये पवार यांनी गावात शेतीसाठी कूपनलिका करण्यावर बंदी घातली. त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करण्यात आली. त्यामुळे गावात केवळ शंभर मिलिमीटर पाऊस पडला तरी वर्षभर पिण्याच्या पाण्याची अडचण येत नाही, हे सिद्ध झाले. तसेच २०० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला, तर दोन पिके आणि ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला, तर तिसरे पीक घेता येते. परिणामी गावातील प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि १९९५ मध्ये एक ट्रॅक्टर असणाऱ्या गावात सध्या १७हून अधिक ट्रॅक्टर आहेत. हा सगळा बदल पोपटराव यांनीच घडवून आणला.

       उपलब्ध पाण्याचा ताळेबंद ठेवून, पिकांचे नियोजन करून दरवर्षी बदलणारी पीक पद्धती, दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन व त्याला ग्रामसभेचा आधार मिळाल्याने गावात सामाजिक व आर्थिक बदल झाला.

       पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन पवार यांनी आता वॉटर क्रेडिट कार्ड यंत्रणासुद्धा गावात राबवण्यास सुरुवात केली आहे. विहिरीतून किती पाणी घ्यायचे याचे आता मोजमाप केले जाणार आहे. त्यासाठी मीटर लावण्यात येणार आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. भविष्यात पाण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागणार आहेत. पाच ते सहा वर्षांच्या अथक परिश्रमांनी गावात पुन्हा सुगीचे दिवस निर्माण करून देणाऱ्या पवार यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक संस्थांनी गौरव केला. तसेच १९९८ मध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट आदर्श गाव आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन पवार यांचा गौरव केला. भारत सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कारही १९९८ मध्ये त्यांना मिळाला. पवार यांना असे २० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय ग्राऊंड वॉटर मॅनेजमेंट या संस्थेतर्फे भूजल व्यवस्थापन पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

       पवार यांनी केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी देश आणि विदेशातील १९ लाखांहून अधिक लोकांनी हिवरे बाजार गावाला भेट दिली आहे. स्थानिक नेतृत्व, लोकसहभाग, सरकारी योजना, राजकीय सहकार्य असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होते हेच त्यांनी दाखवून दिले. त्यांना विविध शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये सदस्य म्हणून नेमण्यात आले. भारत सरकारच्या कपार्ट या संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या समृद्ध गाव संकल्प व प्रकल्प समितीचे ते कार्याध्यक्षही आहेत. ते महाराष्ट्र जल संधारण परिषद, महाराष्ट्र जल संधारण कार्यकारी समिती, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य आहेत. आंध्र प्रदेश सरकारच्या ग्राम विकास समितीमध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.

- समीर जगन्नाथ कोडोलीकर

पवार, पोपटराव बागुजी