Skip to main content
x

पवार, षांताराम धोंडो

          जाहिरातींचे संकल्पन, मुखपृष्ठे, लेखाचित्र म्हणजेच सुलेखन अशा दृश्यकलेच्या विविध क्षेत्रांत आपल्या विचारगर्भ आणि काव्यात्म शैलीचा वेगळा ठसा उमटवणारे आणि कलाशिक्षक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांना कलेच्या विविध क्षेत्रांत उच्च कलानिर्मितीची प्रेरणा देणारे एक मनस्वी कलावंत म्हणून षांताराम पवार सर्वांना परिचित आहेत.

          षांताराम पवार यांचा जन्म मुंबईतील परळ येथे झाला. पवारांचे शिक्षण परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. त्यांच्यावर शालेय जीवनातच चित्रकलेचे संस्कार झाले. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी १९६० मध्ये उपयोजित कलेतील पदविका प्राप्त केली. त्यानंतर त्याच संस्थेत ते १९७५ पर्यंत कलाअध्यापक म्हणून राहिले.

          जे.जे.मधील पवारांची कारकीर्द त्यांच्या दृष्टीने आणि जे.जे. कलासंस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. पवारांची चित्रकार म्हणून जी जडणघडण झाली, त्यात एम.आर. आचरेकर, सोलेगावकर, व्ही. आर. आंबेरकर यांच्या कलादृष्टीचा मोठा वाटा होता. आचरेकरांची प्रवाही रेषा, सोलेगावकरांचा रंगांचा वापर यांतून पवारांवर अभिजात चित्रकलेचे संस्कार घडले, तर आंबेरकरांनी त्यांना कलेचा विचार दिला. पवारांना साहित्य, नाटक अशा इतर कलाप्रकारांमध्ये रस होता. त्यांनी काही नाटकांचे नेपथ्य केले. श्री.ना.पेंडसे यांच्या ‘असं झालं आणि उजाडलं’ या नाटकातले चाळीचे दृश्य असलेले त्यांचे नेपथ्य विशेष गाजले. जे.जे. मध्ये त्यांना दामू केंकरे यांच्यासारख्या नाट्यदिग्दर्शकाचा सहवास लाभला आणि पवार कविता लिहीत असल्यामुळे कवि-साहित्यिकांच्या वर्तुळातही त्यांचा संचार होत राहिला.

         पवारांनी १९७६ मध्ये जे.जे. सोडल्यानंतर विविध जाहिरातसंस्थांमधून उच्च पदांवर कामे केली. हिंदुस्थान थॉम्पसन, इंटरपब, पेन-एन-ट्रेट अशा जाहिरातसंस्थांचा त्यांत समावेश होता. ‘कुबल’ लोणची आणि मसाले यांच्यासाठी त्यांनी केलेली जाहिरातमोहीम विशेष गाजली. ‘पेन एन ट्रेट’मध्ये क्रिएटिव्ह चीफ या नात्याने त्यांनी ‘मेडिमिक्स’ साबणासाठी केलेली ‘छत्तीसगुणी आयुर्वेदिक स्नानासाठी’ ही त्यांची ओळ सर्व भारतीय भाषांमधून घराघरांत पोहोचली.

         पवारांनी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळासाठी केलेले काम वेगळ्या प्रकारचे आहे. भाऊसाहेब ऊर्फ ग.बा. नेवाळकर एमएसएसआयडीसीचे अध्यक्ष होते.

         महाराष्ट्रात तंत्रज्ञानाचा विकास व्हावा म्हणून लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण होते. त्याला अनुसरून व्यवस्थापन आणि उद्योगक्षेत्रातल्या नव्या संकल्पना आणि प्रत्यक्ष योजना यांची माहिती देणार्‍या पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यांचे संकल्पन, त्यांतली इलस्ट्रेशन्स आणि फोटोंचे कोलाज असलेली फोटोग्रफिक्स यांतून उद्योजकतेसारखा अवघड विषयही साध्या, सोप्या आणि आकर्षक पद्धतीने षांताराम पवारांनी मांडला होता.

         पवारांनी ‘एमएसएसआयडीसी’, ‘निमिड’, ‘ग्रंथाली’ अशी अनेक बोधचिन्हे केली, त्यांची दृश्यरचना व त्या रचनेमागचा त्या-त्या सामाजिक संस्थेचा चिन्हात्मक आशय यांची एकरूपता या बोधचिन्हांमधून दिसते. 

         औद्योगिक प्रदर्शनांतील उद्योगसंस्थांचे स्टॉल्स डिझाइन करण्यामध्येही पवारांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळाचा दिल्लीतील प्रगती मैदानावरच्या औद्योगिक प्रदर्शनातला स्टॉल, बँक ऑफ बडोदाचे ‘शिल्पिका’ प्रदर्शन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे राज्याचे महिला धोरण विशद करणारे ‘मुक्ता’ प्रदर्शन ही त्यांतली काही महत्त्वाची कामे होती.

         स्वत: विविध प्रकारची कामे करत असताना पवारांनी विद्यार्थ्यांनाही स्वतंत्रपणे आपला विकास करण्याची प्रेरणा दिली. त्यांना एक मूलभूत आणि मूल्यात्मक कलादृष्टी दिली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम करून पवारांनी विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांनाही वाव दिला. ‘या मंडळी सादर करू या’ ही विद्यार्थ्यांची नाट्यसंस्था पवारांनी स्थापन केली. त्यातून पुढे ‘टूरटूर’, ‘अलवरा डाकू’सारखी नाटके रंगभूमीवर आली आणि काही विद्यार्थी नाट्य-चित्रपट क्षेत्रात स्थिरावले.

        पवारांनी १९७४ मध्ये ‘आर्ट जत्रा’ हा असाच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम केला. रोजच्या वापरातल्या टाकाऊ वस्तूंमधून कलात्मक नित्योपयोगी वस्तू बनवणे व प्रदर्शनातील स्टॉल्समधून त्या विकणे, असा हा उपक्रम होता. विद्यार्थ्यानी अत्यंत कल्पकतेने असंख्य वस्तू बनवल्या आणि ‘आर्ट जत्रे’त त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्रीही झाली. या निमित्ताने उपयोजित कलेचे एक वेगळे दालन विद्यार्थ्यांना खुले झाले. उपयोजित कलेच्या क्षेत्रातील विविध चित्रकार, छायाचित्रकार अशा सर्व व्यक्तींची माहिती पत्तेसूचीच्या (डिरेक्टरीच्या) रूपात प्रकाशित करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी सारी माहितीही त्यांनी जमविली होती; पण ती प्रकाशित होऊ शकली नाही.

       पवारांनी ग्रंथ प्रकाशन क्षेत्रासाठी केलेले कामही तितकेच महत्त्वाचे आहे. ग्रंथाली प्रकाशन आणि वाचक चळवळीसाठी त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे केली. ‘किशोर’, ‘अक्षर’, ‘संवादिनी’, तसेच वसंत दावतर यांच्या ‘आलोचना’साठी त्यांनी मुखपृष्ठे केली. ‘आलोचना’सारख्या वैचारिक नियतकालिकाची मुखपृष्ठे आणि विंदा करंदीकरांच्या ‘आदिमाया’ कविता-संग्रहासाठी केलेली रेखाचित्रे केवळ ‘इलस्ट्रेशन्स’ राहत नाहीत. त्यांतल्या वैचारिक प्रतीकात्मतेमुळे ती अभिजात कलेच्या पातळीपर्यंत पोहोचतात. दया पवारांचे ‘बलुतं’ पासून मिलिंद मालशे यांच्या ‘आधुनिक भाषाविज्ञान’पर्यंतच्या सर्वच मुखपृष्ठांमध्ये त्यांच्या शैलीतील विचारगर्भता प्रत्ययास येते.

      त्यांच्या चित्रांवर भारतीय लघुचित्रशैलीचे, वारली-मधुबनीसारख्या लोककलांचे आणि पाश्चात्त्य चित्रकारांपैकी पॉल क्ली, मिल्टन ग्लेझर यांचे संस्कार झालेले आहेत. त्यांच्या चित्रांच्या मांडणीत आराखड्याचा (ग्रिड) केलेला कल्पक वापर, आकार अवकाशाचा साधलेला चैतन्यपूर्ण समतोल, धन आणि ऋण (पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्पेस) अवकाशाचा वापर यातून एक वेगळी दृश्यभाषा घडत जाते. त्यांनी केलेली निवडक मुखपृष्ठे नवनीत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘थिंक व्हिज्युअल’ या त्यांच्या पुस्तकात संग्रहित करण्यात आलेली आहेत.

       सुलेखनशैली (कॅलिग्रफी) हा पवारांच्या चित्रकलेचाच एक भाग आहे. ‘सुलेखन’ या शब्दाऐवजी ते त्याला ‘लेखाचित्र’ असा समर्पक शब्द वापरतात.  ‘कुबल’ लोणची, मसाल्यांच्या जाहिराती, ‘शापित’ चित्रपटाचे पोस्टर, पवारांच्या स्वत:च्या कवितांचे लेखन ही पवारांच्या लेखाचित्रांची काही महत्त्वाची उदाहरणे आहेत. मराठीत ‘काँक्रीट पोएट्री’ अक्षरकवितेच्या नावाने र.कृ.जोशींनी मराठीत आणली. मात्र दृश्यकवितेचे एक वेगळे रूप पवारांनी आपल्या लेखाचित्रांमधून घडवले.

       पवारांनी या संदर्भात आणखी एक प्रयोग केला, तो म्हणजे ‘मुद्राक्षरचिजां’चा. निसर्गाशी एकरूप होणाऱ्या  पवारांच्या कविता त्याच आहेत, फक्त त्या नव्या स्वरूपात मांडल्या आहेत. मुद्राक्षरांच्या मर्यादा लक्षात घेऊन पवारांनी या कवितांची मांडणी केली. त्यातून एक वेगळा दृश्य अनुभव तयार झाला. अक्षररचना आणि आशय यांची एकरूपता या दृष्टीने हा प्रयोग महत्त्वाचा आहे.

       पवार स्वत: कवी आहेत आणि त्यांचा ‘कळावे, लोभ असावा ही विनंती’ हा कवितासंग्रह आणि ‘कविथा’ हा कथा आणि कविता यांचा मिलाफ असलेला छोट्या कवितांचा संच प्रकाशित झालेला आहे.

        कवितेत दृश्यात्मकता हा घटक ज्ञानेश्वरांपासून ते पु.शि.रेग्यांपर्यंत नेहमीच आलेला आहे. पण या दृश्यात्मकतेचे नाते तत्कालीन समांतर चित्रशैलींशी जोडता येईलच असे नाही. षांताराम पवार किंवा अरुण कोलटकर यांच्या बाबतीत ते जोडता येते. दृश्यात्मकतेच्यापलीकडे जाणारी चित्रकाराची अशी एक संवेदनशीलता आणि दार्शनिकता त्यात असते.

          उपयोजित कला ही पवारांच्या दृष्टीने अभिजात कलेची पुढची पायरी आहे, तर पवारांमधली चित्रकार कवीची दार्शनिकता त्यांच्या सर्वच कामांना काव्यात्म अभिजाततेचे एक नवे परिमाण देते.

- संपादक मंडळ

पवार, षांताराम धोंडो