Skip to main content
x

राव, विजय राघव

बासरीवादक, संगीतकार, नृत्यकार, साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तित्व असलेल्या पं. विजय राघव राव यांचा जन्म चेन्नई (मद्रास) येथे झाला. दाक्षिणात्य संगीत व नृत्यात त्यांनी बालवयातच नैपुण्य मिळवले. ते १९४५ पासून पं. रविशंकर यांचे शिष्य झाले व हिंदुस्थानी संगीतातही त्यांनी प्राविण्य मिळवले. त्यांनी बासरी वादनाच्या मैफली, वाद्यवृंदरचना, व्यावसायिक ध्वनिमुद्रणे अशा अनेकविध सांगीतिक प्रस्तुती केल्या. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर १९४७ साली स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाच्या संगीत संयोजनाचा बहुमान त्यांना लाभला. महात्मा गांधींसाठी रामधून वाजवण्याचे भाग्यही त्यांना लाभले. त्यांची १९६८ साली ‘पेंटॅटोनिक मेलडीज ऑॅन फ्ल्यूट’ ही स्वतंत्र ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाली.
त्यांनी १९६०-७० च्या दशकात ‘बदनाम बस्ती’, ‘बन्सी बिरजू’, ‘एक अधूरी कहानी’, ‘सिनेमा सिनेमा’, ‘कफन’, ‘फेस्टिव्हल टाइम’ इ. हिंदी, इंग्लिश व अन्य भाषांतील अनेक चित्रपटांस संगीत दिले. मृणाल सेन यांच्या पुरस्कार विजेत्या ‘भुवन शोम’ या चित्रपटासाठी, तसेच चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या ‘थ्रू दी आइज ऑॅफ ए पेंटर’ या लघुपटाच्या संगीतासाठी त्यांना पुरस्कार मिळाले होते. भारत सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनमध्ये १९८० पर्यंत लघुपटांचे संगीतकार म्हणून विजय राघव राव कार्यरत होते.
    आकाशवाणीचे वाद्यवृंद संचालक म्हणून त्यांनी अनेक वाद्यवृंद रचना केल्या. दूरदर्शनसाठीही त्यांनी चित्रपट, मालिका, नृत्यनाट्यांना संगीत दिले. ते १९८० मध्ये पं. रविशंकर यांच्या ‘जॅझयात्रा’त साहाय्यक होते व ‘जॅझमिन’ या भारतीय व जॅझ संगीताच्या एकत्रित आविष्कारात त्यांनी बासरीवादन केले. रिचर्ड अटेनबरो यांच्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांनी पं. रविशंकरांचे संगीत साहाय्यक म्हणूनही काम केले.
     त्यांनी ‘हंसनाद’ या नवीन रागाची निर्मिती केली, तसेच रोणू मुजुमदार, सचदेव, विजय कुलकर्णी इ. शिष्य घडवले. ते एक साहित्यिकही होते. तेलुगू व इंग्लिश भाषांतील त्यांच्या कथा-कवितांची पाच पुस्तके प्रकाशित झाली. भारताखेरीज अमेरिका, रशिया, झेकोस्लोव्हाकिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन इ. देशांत त्यांच्या मैफली झाल्या व त्यांना विविध बहुमानही मिळाले. त्यांना बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन बेअर’ सन्मान, ‘पद्मश्री’ (१९७०), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८२), मेरीलॅण्ड सरकारची सन्माननीय डॉक्टरेट (२००२), ‘आदित्य बिर्ला कलाशिखर’ पुरस्कार (२००८) देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीची महत्त्वाची वर्षे मुंबईत व्यतीत करून ते अखेरीस अमेरिकेत स्थायिक झाले होते.

चैतन्य कुंटे

राव, विजय राघव