Skip to main content
x

रायकर, रमेशचंद्र नारायण

      निष्णात स्थापत्य अभियंता रमेशचंद्र नारायण रायकर यांचे घराणे मूळचे गोव्यातील मडगावचे. पण त्यांचे बालपण व शिक्षण जेजुरीला झाले. लहानपणापासून शिक्षणाकडे लक्ष, उद्योगी वृत्ती, जिद्द व जिज्ञासा असलेला हा हुशार विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दाखल झाला. आपण अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणार आहोत तेव्हा त्यात प्रावीण्य प्राप्त करायचे; नुसते नाव व पैसा कमविण्याची ईर्षा मनात ठेवायची नाही, आपल्या कार्यातून समाजाची उन्नती कशी करता येईल हे ध्येय ठरवून अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी अलौकिक व भरीव कामगिरी केली. 

      डॉक्टर रुग्णाला पाहताच रोगाचे निदान करू शकतो, त्याचप्रमाणे आर.एन. रायकर यांचे बांधकामातील ज्ञान व समज एवढी प्रगल्भ झाली होती, की इमारतीच्या काँक्रीट कामावरील भेगा व इतर पडझड पाहता, त्यातील दोषांचे निदान ते करू शकत. १९६० साली त्यांनी संरचना अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग) व्यवसायाला सुरुवात केली. थोड्या अवधीत त्यांच्या लक्षात आले, की इमारती आखण्याइतकेच इमारती उभारणे महत्त्वाचे आहे. त्यात हेळसांड झाली, तर इमारतीचे स्वास्थ्य बिघडू शकते. पुढे आपले उद्दिष्ट संरचना अभियांत्रिकी, न्यायवैद्यक अभियांत्रिकी (फॉरेन्सिक इंजिनिअरिंग) व संरक्षण (देखभाल) हे त्यांनी निश्चित केले. १९७३ साली ‘टेक्नॉलॉजी ऑफ बिल्डिंग रिपेअर्स’ हे पुस्तक लिहून त्यांनी भारतातील या विषयावरील पहिले पुस्तक लिहिण्याचा मान मिळविला. आजही या पुस्तकाची उपयुक्तता टिकून राहिली आहे. आपल्या देशात सिमेंट-काँक्रीटमध्ये इमारतींच्या बांधकामास १९१० साली सुरुवात झाली. त्या काळात बांधलेल्या काही इमारती आजही दिमाखाने उभ्या आहेत. पण पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उभारलेल्या इमारती काही वर्षांतच नादुरुस्त होऊ लागल्याचे आढळू लागले. म्हणजे झाले तरी काय? हा त्यांच्याकरिता चिंतेचा विषय बनला. या अभ्यासातून ग्रंथलेखनास सुरुवात झाली. पुढील दोन दशकांत त्यांनी खालील तीन ग्रंथ प्रसिद्ध केले. ‘लर्निंग फ्रॉम फेल्युअर्स’ (१९८४), ‘ड्यूरेबल स्ट्रक्चर्स थ्रू प्लॅनिंग प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स’ (१९९४), ‘डायग्नोसिस अ‍ॅन्ड ट्रीटमेंट ऑफ स्ट्रक्चर्स इन डिस्टस’ (१९९४) या विषयांवरील अत्युत्तम अशी ही पुस्तके लिहिणारे रायकर हे पहिले भारतीय अभियंता होत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स यांनी ‘लर्निंग फ्रॉम फेल्युअर्स’ हे पुस्तक या विषयावरील सर्वोत्कृष्ट म्हणून १९९० साली जाहीर केले.

      तांत्रिक अभ्यास व संशोधनात्मक कार्य चालू असताना, त्यांनी इमारतींची तपासणी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती समजावून घेतल्या. बांधकामावर कोणते आघात, कशामुळे होतात, याचा त्यांनी अभ्यास केला. काम फार जिकिरीचे व आव्हानात्मक होते. यापूर्वी असे पद्धतशीर काम झाले नसल्यामुळे या विषयाची माहिती उपलब्ध नव्हती. त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दुरुस्तीच्या कामांत विकसित केलेले तंत्रज्ञान व त्या कामाला दिलेली नवी दिशा. या सर्व अनुभवांमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींची संशोधनात्मक पाहणी, यावरचे तज्ज्ञ म्हणून रायकर प्रसिद्धीस आले. धोकादायक शंभरएक इमारतींच्या पाहणीनंतर त्यांनी तयार केलेला अहवाल व सुचवलेल्या उपाययोजना हा एक मानदंडच ठरला आहे. जलरोधनाच्या (वॉटरप्रूफिंग) कामाची तपासणी, बांधकामाच्या आराखड्यांची तांत्रिक तपासणी, पर्यावरणाचा व भूकंपाचा इमारतीवरील परिणाम, पुनर्वसन या सर्व कामांसाठी त्यांचा सल्ला निष्णात मानला जात असे.

     नवी दिल्ली येथील प्रसिद्ध सेमिनार सेंटर ‘विज्ञान भवन’ व मुंबईतील ‘षण्मुखानंद सभागृह’ यांना लागलेल्या आगीमुळे या इमारतींचे अपरिमित नुकसान झाले होते. भारत सरकारने रायकरांना विज्ञान भवनाच्या कामाकरिता तातडीने पाचारण केले, तर षण्मुखानंद सभागृहाचे काम त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.

     या विषयाचे तांत्रिक ज्ञान आपल्याकडील अभियंत्यांना उपलब्ध व्हावे यासाठी ते तज्ज्ञ मंडळींना परदेशांतून येथे बोलावून सेमिनार भरवीत असत. जगभरातील तज्ज्ञ रायकरांच्या सेमिनारला यावयास उत्सुक असत. त्यांच्या कार्याची ओळख व माहिती पुढारलेल्या अनेक देशांत होऊ लागली. यातून जगभरातील अभियंत्यांचे एक जाळेच गुंफले गेले. अमेरिकेतील लास व्हेगास येथे अनेक देशांतील प्रसिद्ध तज्ज्ञांच्या संमेलनात अमेरिकन इन्स्टिट्यूटने त्यांना ‘फेलोशिप’ हा बहुमान बहाल करून त्यांचा गौरव केला.

     कार्यरत असतानाच, त्यांचे निधन झाले. अशा समाजाभिमुख अभियंत्याने प्रसिद्धिपराङ्मुख राहून या वेगळ्याच अभियांत्रिकी कार्याची मुहूर्तमेढ रोवली. दुरुस्तीचे काम बांधकामाइतकेच महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्यांच्या आयुष्यभराच्या अथक परिश्रमांमुळेच झाली.

चिंतामण गोखले

रायकर, रमेशचंद्र नारायण