Skip to main content
x

सबनीस, श्रीकांत रामकृष्ण

       श्रीकांत रामकृष्ण सबनीस यांचा जन्म इस्लामपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण इस्लामपूर व अहमदाबाद येथे झाले. ते मॅट्रिकपर्यंत शिकले. ते १९५५ साली नारायणगाव येथे आले. त्यांनी शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून नाला बंडींग, गोबरगॅस, सौरचूल, बिनधुराची शेगडी या उपकरणांची निर्मिती केली. त्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन या माध्यमांतून ग्रामीण भागात विकासाचे काम सुरू केले. त्यांनी १९६०मध्ये नारायणगाव येथे कुक्कुटपालन विकास योजना राबवली. त्यांनी सुमारे दहा हजार कोंबड्यांचे संगोपन करून कुक्कुटपालन हा शेतीला फायदेशीर जोडधंदा असल्याचा प्रचार केला. चाळीस वर्षांपूर्वी नारायणगाव येथे अंडी उबवणी केंद्र सुरू केले आणि संकरित पिलांची निर्मिती केली.

       सबनीस यांनी ग्रामीण भागातील शेतकरी आणि युवक यांना कुक्कुटपालनाची सखोल माहिती देऊन कुक्कुटपालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी कोंबडीपालनाबाबत सोप्या भाषेत माहिती देणारे ‘परसातली लक्ष्मी’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला शासनाने आर.डी. गोएंका पुरस्कार दिला. त्यांनी कोंबडीपालनाबरोबर आधुुनिक पद्धतीने शेेळीपालन, रोग व उपचार, खाद्य आणि चारा याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून देशातील हजारो शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले. त्यांनी शेळ्यांच्या लेंड्यांपासून स्वयंपाकाचा गॅस तयार केला. गावरान शेळीपेक्षा संकरित सानेन शेळी अधिक आर्थिक उत्पन्न मिळवून देत असल्याचेे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. अमेरिका, इस्राएल या देशांतून निवडक सानेन जातीचे बोकड आयात करून गावरान शेळी आणि सानेन बोकडापासून संकर पद्धतीने करडांची पैदास केली. असे संकरित करडे वजनदार असत. त्यांची चांगली वाढ होऊन ती एका वर्षात माजावर येऊन फळत असत. संकरित शेळी दिवसाला चार ते पाच लीटर दूध देते व १४ महिन्यांत दुसरे करडू देते हे पाहिल्यावर शेतकरी संकरित सानेन शेळ्यांची पैदास करून दूध उत्पन्नात वाढ करू लागले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ते शेेळीपालन करू लागले. सुमारे २५००० शेतकर्‍यांनी संकरित सानेन शेळ्या जोपासल्या आणि दूध उत्पन्नात वाढ केली.

       सबनीस यांनी नारायणगाव येथे ग्रामीण कृषी संस्थेची स्थापना केली. त्यासाठी किर्लोस्कर उद्योगसमूहाचे चंद्रकांत शंतनुराव किर्लोस्कर यांनी आर्थिक मदत केली होती. सरल कृषी संस्थेमध्ये कार्यरत असताना त्यांनी संकरित सानेन शेळीपालनाबरोबर हरित शेती, सुबाभूळ लागवड, तुती, बांबू, नाला बंडिंग आणि शेळ्यांच्या लेंडीपासून स्वयंपाकाचा गॅस इ. प्रकल्प राबवले. त्यांनी खेड्यापाड्यांत जाऊन गोबरगॅस सयंत्र तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, इस्राएल, जर्मनी, चीन, जपान अशा सोळा देशांचा अभ्यासदौरा केला. त्यांना शेळीपालन ‘गरिबाची गाय’ या पुस्तकासाठी आर.ए. गोयंका पुरस्कार मिळाला. ते शेळी-मेंढी आयोगाचे सभासद होते.

       - मुकुंद देशपांडे

सबनीस, श्रीकांत रामकृष्ण