शेणॉय, वासुदेव नरसिंह
मान्यवर साहित्यिक, लोक-नायक, शास्त्रज्ञ, राजकारणी यांच्या रेखाचित्रांमुळे भारतभर प्रसिद्धी मिळालेले व पेन आणि शाईने उत्कृष्ट रेखाचित्रे काढणारे चित्रकार वासुदेव नरसिंह शेणॉय ऊर्फ व्ही.एन. ओके यांचा जन्म मंगळूर आणि उडुपीच्यामध्ये असणार्या मुल्की गावात झाला. या मुल्की गावाचे दुसरे नाव ‘ओलालंके’ म्हणजे ‘आतली लंका’ असे आहे. रावणाने सीतेला पळवून नेताना त्याच्या विमानात लंकेपर्यंत जाता येईल एवढे इंधन नव्हते; म्हणून तो मुल्कीला थांबला आणि नंतर तो पुढे गेला अशी आख्यायिका या गावाला असल्यामुळे या गावाचे नाव पडले ओलालंके. शेणॉय यांनी या गावाच्या नावातील पहिले अक्षर व शेवटचे अक्षर घेऊन लघुरूप ‘ओके’ केले व ‘व्ही.एन. ओके’ या नावाने त्यांना सारे जग ओळखायला लागले.
या गावात आठवीपर्यंत शाळा असल्याने गावातल्या देवळात कौल घेऊन ओके मुंबईस आले. सुरुवातीला मामाच्या उपाहारगृहात काम करून गल्ल्यावर बसता-बसता चित्र काढण्याची त्यांना सवय जडली. पुढे ही सवय चित्रकार नारायण ई. पुरम यांच्या गिरगावातील चित्रकला वर्गाला (ड्रॉइंग क्लास) जाण्यासाठी पूरक ठरली. सकाळी सात वाजता उठून चित्रकला वर्गास जाणे व तेथे दहा वाजेपर्यंत चित्राभ्यास करणे आणि नंतर उपाहारगृहात कामासाठी येणे असा ओके यांचा दिनक्रम होता. एक वर्षभर तेथे चित्रांचा सराव केल्यानंतर दुसर्याच वर्षी त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व १९४३ साली ते पदविका धारक झाले.
त्यापूर्वी ओके यांनी सत्याग्रहात भाग घेतला म्हणून महाविद्यालयामधून त्यांना काढून टाकले होते व त्यांना सहा आठवड्यांची शिक्षासुद्धा झालेली होती. तुरुंगात असताना तेथील स्वातंत्र्य-सैनिकांची व्यक्तिचित्रे साकारण्याचे काम ते करीत. जी.डी. आर्ट झाल्यानंतर दादरच्या ग्रीन आर्ट स्टुडीओत त्यांनी नोकरी मिळवली. या स्टुडीओत एम. बशीर या छायाचित्रकाराने काढलेल्या छायाचित्रांवरून प्रसिद्धिपत्र (शो कार्ड) बनवण्याचे काम ओके करीत. पुढे ओके यांनी गिरगावातल्या एका छापखान्यात नोकरी पत्करली. तेथे व्ही.आर.सावंत होते. त्यांच्यासाठी समाजवादी नेते युसूफ मेहेरअली यांच्या १८५७ ते १९४६ या काळातील स्वातंत्र्य-लढ्यावरील पुस्तकाची चित्रे साकारण्याचे काम ओके यांनी केले. यातील सुमारे १५० चित्रे ओकेंनी व उर्वरित चित्रे दासगुप्ता व मनोहर जोशी यांनी चितारली होती.
रेषांच्या माध्यमातून व्यक्तिचित्रे साकारण्याचे जे तंत्र ओके यांनी विकसित केले त्यात रेखांकन (ड्रॉइंग) आणि इलस्ट्रेशन यांचा उत्कृष्ट मिलाफ होता. व्यक्तिचित्रणातील अभिजातता आणि मुद्रणाला योग्य अशी छायाचित्राची वैशिष्ट्ये रेखांकनात (लाइन ड्रॉइंग) परावर्तित करणारे तंत्र यांचा समतोल ओके यांच्या इतका क्वचितच कोणाला साधला असेल.
मुंबईच्या चेतना उपाहारगृहात कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या हस्ते या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देशात वेगवेगळ्या ठिकाणी हे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. इतिहास व साहित्यविषयक पुस्तके वाचण्याची सवयच ओकेंना जडली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ओके यांनी राहत्या जागीच स्वत:चा स्टूडिओ सुरू केला. सानेगुरुजींचे ‘साधना’, समाजवादी चळवळीचे मुखपत्र असलेले ‘जनता’, राष्ट्र सेवा दलाची दिनदर्शिका यांसाठी ओकेंनी कित्येक वर्षे रेखांकने केली. समाजवादी पक्षाच्या चळवळीचे कोणतेही अधिवेशन व मेळावा ओके यांच्या चित्र-सजावटीशिवाय पूर्ण होत नसे. पुढे ओके यांनी साकारलेली साहित्यिकांची, शास्त्रज्ञांची, पुढार्यांची व्यक्तिचित्रे पुण्याच्या चित्रशाळा प्रेसने प्रसिद्ध केली. त्यांनी पाठ्यपुस्तकासाठीसुद्धा चित्रकाम केलेले आहे. ओकेंना वयाची सत्तर वर्षे झाल्याच्या निमित्ताने १९८८ मध्ये, ‘व्ही.एन. ओके सत्कार समिती’ स्थापन झाली. त्या वेळी ओके यांनी काळ्या शाईत केलेल्या, भारताला घडविणार्या व नवा भारत निर्माण करणार्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील थोर व महान विभूतींच्या ६६ व्यक्तिचित्रांचा संग्रह्य चित्रसंच प्रकाशित करण्यात आला.
ओके फक्त चित्रकारच नव्हते, तर डोळ्यांना व कानांना जे जे सुंदर वाटेल, त्याचे ते चहाते होते. त्यांना डोंगरदर्यांतून भटकायला आवडत असे. त्यामुळे १९५६ नंतर ओके हिमालयात किमान १५-१६ वेळा जाऊन आले असावेत. नागालॅण्डपासून हिमाचल प्रदेशापर्यंत हिमालयाचा सर्व भाग त्यांनी पालथा घातला होता. या प्रवासात त्यांनी असंख्य रेखाटने (स्केचेस) केली व छायाचित्रे काढली होती. १९४२ साली ‘चले जाव’ चळवळीत व पुढे १९७५ साली आणीबाणीविरुद्ध लढलेले ते स्वातंत्र्यसैनिक होते. भूमिगत बुलेटिनचे संपादन करणार्यांपैकी ते एक होते.
आणीबाणीत ‘राजकीय कैद्याचा झालेला छळ’ यावर ओकेंनी प्रत्ययकारी इलस्ट्रेशन्स साकारली. या चित्रांनी भारतातच नव्हे, तर अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, सोशलिस्ट इंटरनॅशनल, मानवी हक्क आयोग यांसारख्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष वेधून घेतले होते. सामाजिक परिवर्तनाबद्दल संवेदनशील असलेल्या ओके यांचे स्मृतिभ्रंशाने निधन झाले.
- प्रा. सुभाष पवार