Skip to main content
x

सिन्हा, रमेशचंद्र रामलाल

             रमेशचंद्र रामलाल सिन्हा यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात वसलेल्या पथ्रोट या गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण परतवाडा येथील नगरपालिका प्राथमिक शाळेत झाले. ते १९५३मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी नागपुरातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन १९५७मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. सिन्हा यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयात निदेशक म्हणून १९५७मध्ये आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली. मात्र त्याच वर्षी नोकरी सोडून नवी दिल्लीतील भा.कृ.अ.सं. येथे एम.एस्सी. (कृषी)च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन १९५९मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमरावती येथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात अधिव्याख्याता म्हणून ते रुजू झाले. सिन्हा यांची १९६०मध्ये अकोल्यातील कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९७५मध्ये नागपुरातील कृषी महाविद्यालय येथे कृषि-विस्तार प्राध्यापक व नंतर १९८५मध्ये कृषि-विस्तारशिक्षण संचालक पदावर पदोन्नती झाली व १९९२मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी कृषीविषयाशी निगडित वैयक्तिक व्यवस्थापन, एलएल.बी., वृत्तविद्या या विषयातही पदविका व पदवी आणि पीएच.डी.सुद्धा प्राप्त केली.

             नागपुरातील कृषी महाविद्यालय येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असताना त्यांनी कृषि-विस्तारशिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांचे संघटन करून महाराष्ट्र सोसायटी विस्तार शिक्षण ही संस्था १९८१ साली प्रस्थापित करून संस्थेची  सचिवपदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. ही संस्था आजही कार्यरत असून संस्थेच्यावतीने संशोधन मासिकही नियमितपणे प्रकाशित केले जाते. त्यांनी १९९६मध्ये आंतरराष्ट्रीय विस्तारशिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे सचिव म्हणून ते सध्या कार्य पाहतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या संस्थेचे कार्य उत्तमरीत्या सुरू असून सुरुवातीला असलेली २३ सभासद संख्या १६८वर पोहोचली. या संस्थेचे जगातील २९ निरनिराळ्या देशांतील सभासदांनी प्रतिनिधित्व केले आहे. या संस्थेचा आंतरराष्ट्रीय परिसंवाद २००७मध्ये गोवा येथे आयोजित करण्यात आला होता, त्यात निरनिराळ्या देशांतील ३०० सभासदांनी हजेरी लावली. डॉ. सिन्हा यांनी किराड समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य किराड समाजाची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्य पाहतात. त्यांच्या धर्मपत्नी या उत्कृष्ट शल्यचिकित्सक होत्या.

- डॉ. शरद यादव कुलकर्णी

सिन्हा, रमेशचंद्र रामलाल