Skip to main content
x

शिंदे, वसंत कृष्णाजी

     मूकपटाच्या काळापासून भारतीय चित्रपटसृष्टीत जवळजवळ ७५ वर्षांच्या दीर्घ अभिनय प्रवासात एक निखळ व सहज विनोदी अभिनेता म्हणून रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते म्हणजे वसंत शिंदे. जवळपास १९ मूकपट, १८५ चित्रपट, १०५ नाटके आणि ५७ लोकनाट्ये यातून त्यांनी अभिनय केला. अभिनेते वसंत शिंदे यांचा जन्म नाशिकजवळच्या भंडारदरा या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई होते. त्यांना एकूण पाच भावंडे होती. नाशिकला त्यांच्या वडिलांचे घड्याळाचे दुकान होते. वसंत शिंदेंच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांचे वडील गेले. त्याबरोबरच घड्याळाचे दुकानही गेले. त्यामुळे कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडले.

     वसंत शिंदे यांचे शिक्षण इ. चौथीपर्यंत झाले होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच हिंदुस्थान फिल्म कंपनीत नोकरी सुरू केली. याच कंपनीत दादासाहेब फाळकेही होते. दादासाहेब १९२५ साली ‘चतुर्थीचा चंद्र’ हा मूकपट तयार करत होते. वसंत शिंदेंची एकूण शरीरयष्टी आणि विनोदी स्वभाव लक्षात घेऊन त्यांनी या मूकपटात गणपतीच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. यानंतर ‘संत जनाबाई’, ‘गोकर्ण महाबळेश्‍वर’, ‘वाली सुग्रीव’, ‘भक्त प्रल्हाद’, ‘बोलकी तपेली’ अशा जवळपास १९ मूकपटांत त्यांनी काम केले. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके हेच या सर्व मूकपटांचे दिग्दर्शक होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीत चित्रपटनिर्मितीतल्या सुतारखाते, छायाचित्रण, संकलन, वस्तुभांडार, छपाई, पेंटिंग, कपडेपट, रंगभूषा, अशा सर्वच खात्यात त्यांनी काम केले. चित्रपटनिर्मितीच्या जवळपास सर्व तंत्रात ते पारंगत होत गेले आणि पुढील काळात त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिकांच्या रंगभूषा, वेषभूषा करताना त्यांना याचा फायदा झाला.

     फाळके यांच्या ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’त पाच वर्षे काम केल्यानंतर कंटाळलेल्या वसंत शिंदे यांनी राजीनामा दिला आणि १९२९ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ते पुण्याच्या ‘अरुणोदय’ या नाटक कंपनीत दाखल झाले. तेथे प्रथम त्यांना ‘गिरणीवाला’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली.

     वयाच्या विसाव्या वर्षी जळगावच्या शांताबाई जगताप यांच्याशी त्यांनी विवाह केला.

     ‘राजाराम संगीत मंडळी’ या नाटक कंपनीत काम करत असताना त्यांना नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर भेटले. त्या वेळी ‘भावबंधन’ या नाटकाच्या तालमी सुरू होत्या. वसंत शिंदे या नाटकात ‘मोरेश्‍वर’ची भूमिका करायचे. त्या काळात ते फक्त नाटकात कामे करायचे. मात्र याच नाटकापासून चिंतामणराव कोल्हटकरांकडून त्यांना अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले. कोल्हटकरांनीही वसंत शिंदे यांच्यावर अभिनयाचे संस्कार करून त्यांना मानसपुत्र मानले. पुढे ‘प्रेमसंन्यास’मध्ये गोकुळ, ‘भावबंधन’मधला कामण्णा, ‘पुण्यप्रभाव’मधला सुदाम, ‘राजसंन्यास’मधला जिवाजी, ‘सौभद्र’मधला वक्रतुंड आणि ‘बेबंदशाही’मधला खाशाबा या गाजलेल्या साऱ्या भूमिका चिंतामणरावांनीच करवून घेतल्या आणि पुढे भालजी पेंढारकर यांच्याकडे जाण्यासाठी वसंत शिंदे यांना सुचवले. वसंत शिंदे यांनी पेंढारकरांच्या ‘सासुरवास’ चित्रपटात सुभान्याची भूमिका साकारली आणि वसंत शिंदेंसाठी मराठी चित्रपटाचे दरवाजे खुले झाले. १९४६ सालापासून १९९६ पर्यंत त्यांनी जवळपास ४० दिग्दर्शकांकडे काम केले. दादासाहेब फाळकेंपासून ते संजय सूरकरपर्यंत. ‘पेडगावचे शहाणे’, ‘गुळाचा गणपती’, ‘धाकटी जाऊ’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मानिनी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘सतीचं वाण’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘पटलं तर व्हय म्हणा’, ‘भालू’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या. ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटातील घरगड्याच्या भूमिकेसाठी त्यांना रसरंग पुरस्कृत ‘दादासाहेब फाळके गौरवचिन्ह’ मिळाले. त्यांच्या पुढच्या वाटचालीत नाटक आणि चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना ‘दिनकर कामण्णा सुवर्णपदक’, ‘शाहू छत्रपती गौरव पुरस्कार’, ‘शांताबाई हुबळीकर पुरस्कार’, ‘बालगंधर्व पुरस्कार’, ‘चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार’ असे अनेक सन्मान लाभले. ‘लावणी भुलली अभंगाला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘गाव बिलंदर बाई कलंदर’, ‘भावबंध’ या नाटकांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या. वसंत शिंदे यांनी अनेक लोकनाट्यांतही कामे केली, तसेच दूरदर्शन मालिकांमधून व आकाशवाणी श्रुतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. मोजक्या हिंदी चित्रपटांत अभिनय करून हिंदी विनोदी अभिनेत्यांनाही आपली वेगळी दखल घेण्यास भाग पाडले.

      साधी राहणी, स्वच्छ विचारसरणी व सर्वांमध्ये मिळून-मिसळून राहण्याच्या वृत्ती यामुळे चित्रपटाच्या नाटकी, चंगळवादी क्षेत्रात राहूनही ते कधी ‘चित्रपटातला माणूस’ वाटले नाहीत. आपला विनोदी, हरहुन्नरी स्वभाव आणि सुसंस्कृत माणुसकी त्यांना सतत जागी ठेवली.

      १९९९ साली वसंत शिंदे यांचे ‘विनोदवृक्ष’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे.

- स्नेहा अवसरीकर

संदर्भ
'विनोदवृक्ष', शब्दांकन - पोतदार मधू, मंजुळ प्रकाशन, पुणे; १९९९.
शिंदे, वसंत कृष्णाजी