Skip to main content
x

थोपटे, अनंत नारायण

नंत नारायण थोपटे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हातनोशी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण भोर येथील आर. आर. विद्यालयात झाले, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा विद्यालय, पुणे येथे झाले. पुणे येथील वाडिया व सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून जी.डी.सी. आणि ए ही बी.ए.ची पदवी प्राप्त केली.

थोपटे यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षीच सहकार क्षेत्राशी संबंध आला. सहायक तालुका सहकारी अधिकारी या पदावर शासकीय सेवेत रुजू होऊन त्यांनी आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. शासकीय सेवेत असताना महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केले. त्यामुळे ग्रामीण, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील सर्व क्षेत्रातील सहकारी संस्थांशी त्यांचा संबंध आला. सहकारी संस्था अधिकाधिक लोकाभिमुख होऊन जनतेचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न या सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्हावे, याची जाणीव त्याचवेळी त्यांना झाली. 1958 ते 1971 या कालखंडात त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. ते पदवीधर तर झाले होतेच पण त्यानंतर सहकार क्षेत्राशी संबंधित असलेली जी.डी.सी. अँड ए. ही पदविका संपादन केली. तसेच ब्लॉक लेव्हल को-ऑप. ऑफिसर ट्रेड ही खात्याअंतर्गत परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. सहकार अधिकारी या पदाबरोबरच विविध संस्थांमध्ये परसेवेवर प्रमुख पदावर काम केले. वेल्हे तालुक्याचे गट विकास अधिकारी म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला.

मूळ पिंड कार्यकर्त्याचा असल्याने शासकीय नोकरीमध्ये थोपटे यांचे मन रमेना. ग्रामीण भागातील वास्तव बदलायचे असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास शासकीय सेवेत मर्यादा होत्या. म्हणून 1972 साली शासकीय सेवेचा राजीनामा देण्याचे धाडस थोपटे यांनी केले आणि अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढविली आणि निवडून आले. त्यानंतर खर्‍या अर्थाने त्यांच्या सहकार, राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीस सुरुवात झाली. सुमारे 36 वर्षे त्यांनी भोर-वेल्हे या दोन तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच 14 वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत आपल्या अंगी असलेल्या अभ्यासू आणि अचूक निर्णयक्षमतेचा ठसा उमटविला. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले. म्हणूनच एक अभ्यासू, कार्यालयीन कामकाजाबरोबरच प्रशासकीय कामाची तंतोतंत माहिती असलेले मंत्री अशी प्रतिमा सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये निर्माण झाली.

थोपटे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँकेचे राज्य स्तरावरील संचालक म्हणून व जिल्हा स्तरावरील अध्यक्ष म्हणून 1980 ते 1982 च्या दरम्यान काम केले. भू-विकास बँक या नावाने ही बँक आजही प्रचलित आहे. या कालखंडात थोपटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कर्जवाटप करून योग्यवेळी शेतकर्‍यांची आर्थिक गरज भागविली. त्यामुळे शेतीमध्ये नगदी पिके घेऊन आणि शेतीपूरक व्यवसाय करून गरीब अशा शेतकर्‍यांची परिस्थिती सुधारली.

थोपटे यांनी दुग्धविकास राज्यमंत्री आणि मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यानंतर कल्पकता आणि दूरदृष्टीच्या बळावर त्यांनी दूध उत्पादनास मोठ्या प्रमाणावर चालना दिली. त्यांनी त्यावेळी दूध महापूर योजना कार्यान्वित केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ स्थापन करण्यात त्यांचा वाटा होता. महानंद डेअरीचा प्रारंभ त्याच काळात झाला. या संस्थेचे पहिले अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही त्यांनी 1981-1982 च्या दरम्यान काम पाहिले. सहकारी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव या संस्थेचे संचालक म्हणून काम करताना त्यांना उपयोगी पडला. दूध संघाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले. त्यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून ते काम करीत होते. या संघामार्फत त्यांनी परदेश दौरा करून तेथील दूध उत्पादन आणि पणन यांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर या दौर्‍यात त्यावेळचे दूध संघाचे अध्यक्ष अशोक मोहोळ हे होते.

थोपटे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून तीन वेळा म्हणजे 15 वर्षे काम पाहिले. पुणे जिल्हा भूविकास बँकेचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली. त्यावेळीही त्यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला.

थोपटे यांनी दत्त दिगंबर सहकारी वाहतूक कामगार संस्था 1975 मध्ये स्थापन केली. भोर व वेल्हे तालुक्यात वाहन चालक आणि वाहक यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. दुसर्‍याच्या ट्रकवर काम करणार्‍या सर्व वाहन चालक व वाहक यांना एकत्र करून या संस्थेचे सभासद केले. या सभासदांनी या संस्थेचा आधार घेऊन बँकांकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून दूध वाहतुकीसाठी टँकर घेतले आणि संस्थेमार्फत दुधाची वाहतूक टँकरद्वारा करण्यास सुरुवात केली. त्यांनी वाहतुकीच्या उत्पन्नातून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली.

थोपटे यांनी 1988 सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर राजगड सहकारी साखर कारखाना मर्या. अनंतनगर, निगडे, ता. भोर, जि. पुणेची नोंदणी केली. त्यांना 1981 ते 1988 या प्रदीर्घ कालावधीपर्यंत कारखान्याच्या नोंदणीसाठी पाठपुरावा केल्यावर यश मिळाले. त्यावेळी भोर-वेल्हे तालुक्यासारख्या डोंगरी भागात साखर कारखाना उभा करून चालविणे धाडसाचे होते. पूर्व भागातील बोटावर मोजण्याइतकी गावे सोडली तर कोठेही ऊस उत्पादन नव्हते. परंतु दूरदृष्टीच्या आधारे आणि आमदार असताना त्यांनी गावोगावी कार्यान्वित केलेली शासकीय बंदरे आणि त्यायोगे ओलिताखाली आलेले क्षेत्र याचा लाभ त्यांना झाला. कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले. त्यामुळे तरुण वर्गास रोजगार उपलब्ध झाला. तालुक्यातील विशेषत: डोंगरी भागातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.

थोपटे 1981 च्या दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी कन्झ्युमर फेडरेशन मुंबई या संस्थेवर संचालक म्हणून निवडून आले. तेथेही त्यांनी संचालक म्हणून चांगल्याप्रकारे काम केले. थोपटे यांची 1999-2000 या वर्षात महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सदर अध्यक्षपद मंत्री दर्जाचे आहे. त्यांनी या अध्यक्षपदाच्या काळात सहकार कायद्यात काही सुधारणा सूचविल्या. त्यामुळे सहकारी संस्थांचे काम गतिमान होण्यात मदत झाली.

- धनंजय जाधव

 

थोरात, भाऊसाहेब संतुजी

प्रवर्तक

12 जानेवारी 1924

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याला शेती, पशुसंवर्धन, मत्स्यविकास, पर्यावरण, साखर कारखानदारी व राजकारण या सर्व क्षेत्रांत सहकाराच्या माध्यमातून अग्रणी नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाऊसाहेब संतुजी थोरात होत. भाऊसाहेब संतुजी थोरात यांचा जन्म संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात एका मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते. त्यांचे शालेय शिक्षण संगमनेर, बेलापूर व नाशिक या ठिकाणी पार पडले. महात्मा गांधींच्या ‘करेंगे या मरेंगे’ आणि ‘चले जाव’ या चळवळीने भारून जावून त्या काळात जी एक धीरोदात्त आणि प्रामाणिक स्वातंत्र्यसैनिकांची फळी निर्माण झाली, त्यांपैकी भाऊसाहेब थोरात एक होत. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि 15 महिन्यांचा तुरुंगवास भोगला. मात्र तुरुंगातून बाहेर आलेल्या थोरात यांच्या चळवळीच्या माध्यमातून शोषित आणि पीडितांच्या सामाजिक उत्थापनाचे व्रत घेतले. भाऊसाहेब थोरात यांना समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला झोकून देण्याची शिकवण विद्यार्थीदशेतच मिळाली. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान दिले.

घरी शेतीव्यवसाय सांभाळत असतानाच त्यांनी जोर्वे सोसायटीचे नेतृत्वपद स्वीकारले आणि सहकारी चळवळीत पहिले पाऊल टाकले.

थोरात यांनी संगमनेर व अकोले तालुक्यातील बीडी कामगारांच्या संघटनेची स्थापना 1944 मध्ये करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर त्यांनी 1953 मध्ये विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची उभारणी केली. संगमनेर तालुक्यात अस्तित्वात असलेला खरेदी-विक्री संघ आर्थिक घसरणीमुळे बंद पडला होता. म्हणून या परिसरातील संघाची गरज लक्षात घेऊन भाऊसाहेब थोरात व त्यांच्या सहकार्‍यांनी कोपरगाव येथील गोदावरी प्रवरा सहकारी खरदी-विक्री संघाची शाखा संगमनेर येथे काढण्याचा निर्णय घेतला. या संघामार्फत भाऊसाहेबांनी सहकारी चळवळीतील कार्यर्त्यांचा मेळावा आयोजित केला. मेळाव्याचा दिवस शेती माल विक्री दिन म्हणून साजरा केला.

भाऊसाहेबांनी 1956 मध्ये तालुका पर्यवेक्षक संघटनेचे अध्यक्ष झाल्यावर संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र खरेदी-विक्री संघाची स्थापना करण्याचे ठरवले. पुढे 1958 मध्ये ‘नियोजित संगमनेर तालुका सहकारी शेतकरी संघ मर्या.’ची नोंदणी सहकार खात्याकडे केली आणि 2 डिसेंबर 1959 मध्ये सदर संघाची नोंदणी झाली. या संघाचे प्रथम अध्यक्ष होण्याचा मान भाऊसाहेब यांना मिळाला.

जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून भाऊसाहेब थोरात यांनी 1968 मध्ये संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील बहुमानाची अनेक पदके आणि पारितोषिके या कारखान्यास मिळाली. संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना देशात सर्वाधिक ऊसभाव मिळवून दिला आणि कार्यक्षम कर्तृत्वाचा आदर्श घालून दिला. सहकार क्षेत्रात सर्वप्रथम आय ए सो: 9002 हे आंतरराष्ट्रीय बहुमानाचे उत्कृष्ट व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याला मिळाले.

संगमनेर अ‍ॅग्रिकल्चर प्रोड्युस अ‍ॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी (सॅम्प्रो) ही संगमनेरमधून पाणीपुरवठा योजनांसाठी लागणारे पाईप्स, शेती अवजारे, वाहनांचे टायर्स, बांधकामासाठी स्टील, लोखंड, सिमेंट इ. साहित्य वाजवी दरात उपलब्ध करून देते. त्यामुळे ही कंपनी सर्वांच्या विश्वासास पात्र ठरली.

पाणी हा शेतीचा केंद्रबिंदू आहे. शेतीला शाश्वत पाणी मिळविण्यासाठी निळवंडे प्रकल्पाशिवाय पर्याय नाही हे ओळखून त्या प्रकल्पाला गती देण्यासाठी भाऊसाहेब थोरात यांनी विशेष प्रयत्न केले.

महाराष्ट्रातील कारखानदारीचा विकास व्हावयाचा असेल तर बॉम्बे हाय गॅस कारखानदारीसाठी मिळालाच पाहिजे या मागणीसाठी भाऊसाहेबांनी पुढाकार घेऊन सिन्नरच्या सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सूर्यनाना गडाख यांच्या सहकार्याने नाशिक येथे महाराष्ट्र राज्य उर्जा परिषद आयोजित केली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तसेच, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड एकाच दिवशी म्हणजे 7 जून 1965 रोजी झाली. जिल्हा बँक सेवा सहकारी संस्थेमार्फत भाऊसाहेबांनी शेतकर्‍यांना वीजपंप बसविण्यासाठी त्वरीत कर्ज उपलब्ध करून देण्याचे काम केले. त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये बँकेची 37 वी शाखा पाथर्डी तालुक्यातील तीसगाव या ठिकाणी सुरू केली. चळवळ आणि आंदोलन हा भाऊसाहेबांच्या जीवनाचा स्थायीभाव असल्यामुळे ‘शेतीसाठी मोफत वीज मिळालीच पाहिजे’ या मागणीसाठी अहमदनगरच्या सहकार बँकेच्या सभागृहात भाऊसाहेबांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा भरवला होता.

भूमिहीन, शेतमजूर, अल्पभूधारक आणि समाजातील इतर दुर्बल घटक यांचे जीवनमान व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी दुग्ध व्यवसायाला पर्याय नाही हे थोरात यांनी जाणले होते. व त्यासाठीच त्यांनी 12नोव्हेंबर1977 रोजी संगमनेर तालुका दूध उत्पादन आणि प्रक्रिया संघाची सहकारी तत्त्वावर स्थापना केली. खासगी व्यापारी आणि दलाल यांच्याकडून होणारी दूध उत्पादकांची लुबाडणूक थांबवून ‘दूध उत्पादनाला योग्य भाव आणि ग्राहकाला उत्तम गुणवत्तेचे दूध’ या अमूलप्रणित संकल्पनेतून थोरात यांनी संगमनेर दूध संघ उभा केला. सुरुवातीला केवळ 1500 लीटर प्रतिदिन असलेले दूध संकलन 3 लाख लीटर प्रतिदिन इतके झाले. नगर जिल्ह्यातल्या परंपरागत साखर व्यवसायावर मात करून रोज चलन मिळवून देणारा दुग्ध व्यवसाय प्रस्थापित करण्यात थोरात यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. नगर जिल्ह्यातल्या वार्षिक 800 कोटी रुपयांच्या दुग्धव्यवसायात संगमनेर दूध संघाचा वाटा 180 कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातही  एकूण दूध संकलनापैकी 36 टक्के वाटा संगमनेर दूध संघाचा आहे. यावरून संगमनेर तालुक्यात दुग्धव्यवसाय रुजविण्यात त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे दिसून येते.

दुग्धव्यवसायाची भरभराट व्हावयाची असेल तर उत्तम जातीच्या जनावरांची पैदास, वाजवी दरात चांगल्या प्रतीच्या पशुखाद्याचा पुरवठा, सकस वैरणीचे उत्पादन, तत्पर पशुवैद्यकीय व कृत्रिम रेतन सेवा, दुग्धसंकलन व प्रक्रिया पद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दुग्धउत्पादकाला अडचणींच्या काळात आर्थिक मदत तसेच दुधाला योग्य मोबदला देण्याबरोबरच वितरक व ग्राहक यांचे आर्थिक संबंध जपणे या सर्व गोष्टी अतिशय आवश्यक आहेत, याची थोरात यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांनी यापैकी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत संगमनेर दूध संघ प्रगतिपथावर नेला.

अल्पकाळात दुग्धोत्पादनात भरीव वाढ करायची असेल तर संकर घडविण्याशिवाय उत्तम पर्याय नाही या मणिभाई देसाई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, थोरात यांनी संगमनेर दूध संघाच्या कार्यक्षेत्रात संकरित गो-पैदास केंद्रे सुरू केली. या पैदास केंद्रातून निर्माण झालेल्या जवळजवळ एक लाख संकरित गाईंमुळे संगमनेर दूध संघ भरभराटीला आला. दुग्धव्यवसाय व्यापारी तत्त्वावर चालायचा असल्यास उत्पादन खर्चात कपात होणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन थोरात यांनी दुग्धोत्पादक शेतकर्‍यांसाठी मुक्तसंचार गोठा पद्धती, राजहंस प्रतिबंधात्मक पशू आरोग्यसेवा योजना, आणि पशुरोग निदान प्रयोगशाळा हे प्रकल्प राबविले. एखाद्या दूध संघाने स्वतःची अत्याधुनिक रोगनिदान प्रयोगशाळा उभारणे हा इतर दूध संघांसाठी चांगला पायंडा ठरला. दुग्धव्यवसायात अधिक व्यावसायिकता आणून आर्थिक लाभ मिळविण्याच्या द़ृष्टीने दुग्धप्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती यांचे महत्त्व जाणून थोरात यांनी संगमनेर दूध संघात सुगंधी दूध, दही, ताक, लोणी, तूप, पनीर, श्रीखंड, गुलाबजामुन या दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनास चालना दिली. महाराष्ट्रासमवेतच गुजरात आणि कर्नाटक राज्यांतही संगमनेर दूध संघाची उत्पादने सर्वमान्य झाली.

‘स्वच्छ दूधनिर्मिती’ ही काळाची गरज आहे याचे योग्य भान ठेवून थोरात यांनी केंद्रशासन प्रकल्पांतर्गत सुमारे 70 दूधशीतकरण टाक्या मिळवून 93 प्राथमिक दूध संघांचे दूध थंड करून विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. दूध संघाच्या कार्यप्रणालीत संगणकाचा वापर ही संकल्पना भाऊसाहेबांनी प्रथम कार्यान्वित केली. स्वच्छ दूधनिर्मिती बरोबरच दुग्ध प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, वितरण व विक्री व्यवस्था यात आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करण्याच्या थोरात यांच्या दूरदृष्टीमुळेच संगमनेर दूध संघाला आयएसओ नामांकन आणि वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला.

दुग्धव्यवसायाला प्रगतिपथावर नेत असतानाच थोरात यांनी पर्यावरण संरक्षणालाही तितकेच महत्त्व दिले. त्यांच्याच प्रेरणेने जुलै 2006 पासून संगमनेर दूध संघ दरवर्षी ‘दंडकारण्य’ अभियानात सामील होऊन तालुक्यात वृक्ष आणि वैरण लागवडीत सहभागी होऊ लागला.

एकंदरीतच, शेतकर्‍यांच्या दारात दुग्धव्यवसायाची गंगोत्री आणण्याचे भगीरथ प्रयत्न करणार्‍या भाऊसाहेब थोरात यांच्या ‘राजहंसी’ विचारसरणीतूनच वाटचाल करणारा संगमनेरचा राजहंस दूधउत्पादक व प्रक्रिया संघ’ महाराष्ट्रातील सर्व तालुका दूध संघात अव्वल क्रमांकावर तर पोहोचलाच, पण राज्यातील इतर संघांसमोर ‘दुग्धव्यवसायातील आदर्श’ ही स्वतःची प्रतिमा निर्माण करू शकला.

भाऊसाहेबांनी संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ (1978) आणि मच्छीमार परिषद (1982) अशी विविध क्षेत्रात सहकारी संस्थांची उभारणी केली. सहकार क्षेत्रातील या धडाडीच्या कामामुळेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद (1984) आणि ‘अखिल भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ’ या संस्थेचे संचालकपद त्यांच्याकडे चालत आले.

- डॉ. रामनाथ सडेकर

थोपटे, अनंत नारायण