उपासनी, शरद पांडुरंग
शरद पांडुरंग उपासनी यांचा जन्म नंदुरबार येथे झाला. बडोदा येथील सयाजी विद्यापीठातून त्यांनी बी.कॉम. पदवी प्राप्त केली, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम.कॉम. पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठातूनच एलएल.बी. ही पदवी त्यांनी १९६१ मध्ये मिळवली.
१९६२मध्ये उपासनी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. १९६८मध्ये त्यांनी हवाई विद्यापीठ, अमेरिकेतून एम.बी.ए.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची संधी मिळाली. काही काळ ते गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. तसेच काही काळ केंद्र सरकारात वित्त मंत्र्यांचे (यशवंतराव चव्हाण) ते विशेष साहाय्यक होते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (वॉशिंग्टन) येथे १९७४ ते १९७८ या कालावधीत त्यांची नेमणूक झाली. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरही उपासनी यांनी काम केले. त्यांच्या कार्यकाळात महामंडळाच्या ताब्यातील प्रत्येक कापड गिरणी नफ्यात आली.
उपासनी यांनी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव म्हणूनही काम पाहिले. या काळात म्हणजे १९८२ मध्ये देशात पहिल्यांदाच आशियाई खेळ आयोजित केले गेले. या खेळांच्या प्रसारणासाठी त्यांनी संपूर्ण देशात चाळीस प्रक्षेपकांची उभारणी केली. त्यामुळे देशाच्या चौर्याण्णव टक्के भागात दूरदर्शनच्या माध्यमातून या खेळांचे प्रसारण पोहोचले. या काळात दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम कृष्णधवल स्वरूपात दिसत असत. या कार्यक्रमांच्या रंगीत प्रसारणाला उपासनी यांनीच सुरुवात केली. वार्तांकनासाठी कार्यक्रमस्थळी जाऊन चित्रण करता येईल, संकलन करता येईल अशा बाह्य प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांच्या (ओ.बी. व्हॅनच्या) वापराला त्यांनी चालना दिली.
महावित्तच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांनी सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) उपाध्यक्ष पदावर त्यांनी १९८४ ते १९८७ या काळात काम केले. या काळात त्यांनी महामंडळाच्या कारभारातही काही लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या. महामंडळाच्या कार्यालयांचे त्यांनी संगणकीकरण केले. त्यामुळे संगणकीकृत तिकीट केंद्रांची सुरुवात झाली. अशा काही सुधारणांमुळे परिवहन महामंडळ नफ्यात आले.
राज्याचे उद्योग सचिव पद भूषविल्यानंतर केंद्र सरकारात ‘कंपनी लॉ बोर्डा’चे अध्यक्ष व त्यानंतर ‘ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल कॉस्टस् अॅन्ड प्राईसेस’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदावरून १९८८ मध्ये उपासनी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही ते कंपनी कायदाविषयक सेवा देतात. त्यांनी वाणिज्य, बँकिंग, कायदा आणि व्यवस्थापनाची पार्श्वभूमी आणि व्यवस्थेमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘महाराष्ट्र बोर्ड ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग ऑफ स्टेट एन्टरप्रायझेस’च्या अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. याअंतर्गत सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापन व पुनर्रचना यासंबंधी अभ्यासपूर्ण शिफारशी त्यांनी शासनास केल्या होत्या. विश्व व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर), मुंबईच्या उपाध्यक्षपदी तसेच ग्राहक मार्गदर्शक सोसायटीचे अध्यक्ष, ‘ब्रिटिश गॅस कंपनी’चे सल्लागार या पदांवरही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) या कंपनीत संचालक पदावर त्यांची २००१ मध्ये नेमणूक झाली. या पदावर त्यांनी चार वर्षे काम केले.