Skip to main content
x

वानखेडे, वसंत

      रंग न वापरता चित्राचे माध्यम म्हणून कापडाचा अभिनव प्रयोग करणारे चित्रकार वसंत वानखेडे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे झाला. वस्त्रपटलांचा वापर करून अनलंकृत, केवळ अशा आकार अवकाशाच्या खंडांना एकत्र जोडून धरणे, आणि त्यातून प्राप्त होणारी सुसंगत रचना करणे हा त्यांच्या चित्रांचा विशेष म्हणावा लागेल. त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून १९५९ मध्ये पेंटिंगची पदविका मिळवली.

चित्रकलेच्या, तसेच लघुचित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रातही सारख्याच सहजतेने वावरणार्‍या या चित्रकाराने नवनवीन आणि वेगळे प्रयोग करून पाहिले. बालपणी घरात कलेस पोषक वातावरण नव्हते. चरितार्थासाठी चित्रकलेचे क्षेत्र निवडण्यास घरातील ज्येष्ठांचा विरोध असूनही वानखेडे चित्रकलेकडे वळले. दिवाळी अंकांतून प्रकाशित होणार्‍या चित्रकार गांगलांच्या चित्रांनी त्यांना प्रभावित केले. पुढे मुंबईत कलाशिक्षण घेताना त्यांना एम.आर.आचरेकर, एस.एम.पंडित, दीनानाथ दलाल या दिग्गजांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. कालांतराने त्यांना प्रसिद्ध चिंतनशील चित्रकार प्रभाकर बरवे यांचा सहवास लाभला. कलाविषयक चिंतन करण्यासाठी बरवे यांनी स्थापलेल्या ‘अस्तित्व’ या ग्रूपने त्यांना चित्रकला क्षेत्रातील स्वत:च्या अस्तित्वाची कल्पना दिली. 

प्रख्यात चित्रकार शंकर पळशीकरांना ते गुरुस्थानी मानत. सुरुवातीच्या काळात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वानखेडे यांनी चित्रांत फक्त काळ्या रंगाचा वापर करून अनेक प्रयोग केले. विद्यार्थिदशेत चित्रांत रंगयोजनेतील त्यांच्या मर्यादा लक्षात घेत पळशीकरांनीच त्यांना योग्य मार्ग दाखवला. हा कालखंड त्यांचे पुढील कलाजीवन समृद्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. त्यानंतर त्यांची स्वतंत्र शैली विकसित झाली. चित्राचे माध्यम म्हणून ते  कापडाचा प्रयोग १९९० पासून करू लागले. त्यांची सारी चित्रे समकालीन चित्रकारांच्या पद्धती व लोकाभिरुचीपेक्षा अत्यंत वेगळी ठरली.

विशिष्ट रंगाचे कापड आणि पोताचा प्रभावी वापर ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. कापडाच्या असमान कडा आणि त्याला पडलेल्या घड्या, त्या प्रतिमेतील रंगांच्या संथ प्रवाहाला खंडीत करून एक नवीनच स्पर्शसंवेद्य दृश्यानुभव साकारण्याचा प्रयत्न करतात. उत्तर आधुनिक चित्रकलेत परंपरेने स्थिर झालेल्या मापदंडांना एक आगळे परिमाण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चित्रकलेची माध्यमे आणि साधने या दोहोंतही प्रायोगिकतेच्या दृष्टीने त्यांनी घडवून आणलेल्या बदलाने सामाजिक कलाभिरुचीला एक वेगळी संवेदनशीलता मिळाली.

‘कलाविष्कारासाठी सर्वार्थाने विकसित झालेली सौंदर्यदृष्टी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्जनाचे दृष्टान्त देत असते’, असे मानणाऱ्या वानखेडे यांच्या कलात्मक, तसेच लौकिक चरित्राची नोंद कला क्षेत्रातील जाणकारांनी घेतली. ज्ञानेश्‍वर नाडकर्णी, जेसल ठक्कर, मेहल्ली गोभई या जाणत्या कलासमीक्षकांनी त्यांच्या प्रयोगशीलवृत्तीबद्दल वेगळ्या धाटणीच्या चित्रांविषयी योग्य ती दखल घेतली.

चित्रकलेसोबतच लघुपटक्षेत्रातही त्यांचा लौकिक आहे. त्यांना १९८४ मध्ये ‘सिल्व्हर लोटस’ या अ‍ॅनिमेशन लघुचित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून १९८५ मध्ये केंब्रिज येथे भरलेल्या ‘फिल्म फेस्टिव्हल’मध्येही ते सहभागी झाले होते. त्यांना १९८६ मध्ये अ‍ॅनिमेशन लघुचित्रपट दिग्दर्शनासाठी ‘सिल्व्हर लोटस’ सन्मान पुनश्‍च प्राप्त झाला. केंद्र सरकारच्या फिल्म्स डिव्हिजन मधील कार्टून फिल्म विभागात ते नोकरीला होते.

‘द अनग्रेटफुल मॅन’, ‘वुमन - अ ट्रिब्यूट’, ‘सिद्धार्थ’, ‘गोपाळ देऊसकर’ हे त्यांनी बनविलेले माहितीपट आहेत. त्यांच्या ‘वारली पेंटिंग्ज’ अनुबोधपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. देशात, तसेच परदेशात भरविण्यात आलेल्या अनेक प्रतिष्ठित कलाप्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांत १९९३ मधील ‘अ क्रिटिकल डिफरन्स’ हे युनायटेड किंगडममधील सहा प्रमुख शहरांमध्ये भरवले गेलेले कलाप्रदर्शन, मुंबईतील १९९६ मध्ये भरलेले ‘अर्बन सिग्नल्स शिफ्टिंगइमेजेस’ प्रदर्शन, त्याचप्रमाणे भोपाळ येथील सहाव्या ‘भारत भवन बिनाले ऑफ कन्टेम्पररी इंडियन आर्ट’प्रदर्शन यामध्ये त्यांचा सहभाग होता. मुंबईतील एनजीएमए (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) १९९७ मध्ये ‘फिफ्टी इयर्स ऑफ आर्ट इन मुंबई’ हे प्रदर्शन भरवले होते, त्यातही वानखेडे यांचा समावेश होता. आजवर त्यांच्या चित्रांची प्रदर्शने जहांगीर आर्ट गॅलरी : (१९७२, १९७३), ताज आर्ट गॅलरी : (१९६५, १९६७, १९७७), पंडोल आर्ट गॅलरी : (१९६९, १९८६, १९९०, १९९३) येथे भरली असून १९९९ मध्ये त्यांचा ‘रेट्रोस्पेक्टिव्ह शो’ बिर्ला अकॅडमी ऑफ आर्ट अ‍ॅण्ड कल्चर येथे झाला.

देशात व विदेशांत अनेक संग्रहालयांमध्ये व खाजगी संग्रहकांकडे त्यांची चित्रे आहेत.

आपल्या आगळ्या, लक्षवेधी चित्रशैलीने समकालीन कलेवर प्रभाव टाकणाऱ्या या प्रयोगशील वृत्तीच्या चित्रकाराने प्रयोगांमधील सातत्य कसे टिकून राहील यावर आपले अवधान केंद्रित केले. त्यांची चित्रे जशी आगळी वाटतात, तसेच त्यांचे व्यक्तिमत्त्वही वेगळे ठरते ते या अर्थाने!

- पंकज भांबुरकर

 

वानखेडे, वसंत