वाटवे, केशव नारायण
केशव नारायण वाटवे यांचा जन्म अजरा येथे झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाल्यानंतर पुढचे सर्व शिक्षण पुणे येथे झाले. फर्गसन महाविद्यालयातून एम.ए. केल्यानंतर काही काळ शिक्षकाची नोकरी केली व पुढे सर परशुरामभाऊ महाविद्या-लयात संस्कृतचे आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. निवृत्तीनंतरही ते बेळगाव येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, व्यासंगी लेखक आणि संस्कृतचे प्रसारक अशा तीन पैलूंनी प्रा.के.ना.वाटवे यांचे जीवन समृद्ध होते. संस्कृत वाङ्मय, त्यातही नाटके हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. प्रतिपाद्य विषयाचा सांगोपांग अभ्यास करून विद्यार्थ्यांना त्यातील सौंदर्यस्थळे उकलून दाखविण्यात त्यांचा हातखंडा होता. संस्कृत व्याकरण, वाक्यरचना व वाङ्मय यांच्या अध्ययनासाठी तयार केलेल्या ‘संस्कृत सुबोधिनी’ (भाग १ ते ३) ह्यांंतून त्यांच्यातील हाडाचा शिक्षक दिसून येतो. ‘भागवतातील कथा’ (भाग १ ते ६), ‘दशावतारांच्या कथा’, ‘पंचतंत्रातील कथा’ (भाग १ ते ३), संस्कृत कविकथा यांतही गोष्टींच्या माध्यमातून संस्कृत साहित्यविश्वाची ओळख करून देणारा शिक्षक प्रतीत होतो.
प्रा.के.ना.वाटवे यांचे लेखन संस्कृत साहित्यशास्त्र या विषयाशी संबंधित आहे. ‘मराठी पंडित कवी’ (१९५३) हे त्यांचे पुस्तकही समीक्षेच्याच अंगाने जाणारे आहे. ‘रसविमर्श’ (१९६१), ‘संस्कृत नाट्यसौंदर्य’ (१९६२) आणि ‘संस्कृत काव्याचे पंचप्राण’ (१९४७) ह्या त्यांच्या पुस्तकांचे स्वागत विद्वानां, संशोधक, हौशी व जिज्ञासू वाचक आणि विद्यार्थी अशा सर्वांकडून सन्मानपूर्वक झाले.
‘रसविमर्शा’मध्ये भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा परामर्श घेऊन ऐतिहासिक व तौलनिक दृष्टिकोनांतून रसविषयक चर्चा केली आहे. रसनिष्पत्तीची प्रक्रिया आणि रसास्वाद यांचे मानसशास्त्रदृष्ट्या परीक्षण करून रसांच्या गौणप्रधान भावाचीही चर्चा केली आहे. भक्ती हा रस मानावा की नाही, याचीही चर्चा यात केली आहे. या पुस्तकाचे आणखी एक महत्त्वाचे योगदान म्हणजे मराठीचे स्वतंत्र साहित्यशास्त्र निर्मिण्याचा हा पायाभूत प्रयत्न आहे.
संस्कृत नाट्यसौंदर्य या ग्रंथातून संस्कृत नाट्यशास्त्र आणि नाट्यवाङ्मय यांची विषयाच्या सर्व आयामांनिशी परिपूर्ण माहिती दिली आहे. संस्कृतातल्या नऊ प्रमुख नाट्यकृतींच्या नाट्यकथांचे मूळ, त्यांच्या संविधानक रचनेची वैशिष्ट्ये आणि नाट्यगृह या अंगांनी चर्चा करून संस्कृत नाटकांच्या उत्कर्षाच्या आणि र्हासाच्या कालखंडांचीही समीक्षा केली आहे.
रघुवंश, कुमारसंभव, किरातार्जुनीय, शिशुपालवध आणि नैषधीय चरित ही संस्कृतमधील प्रसिद्ध पाच महाकाव्ये. ह्या महाकवींची आणि महाकाव्यांची काव्यशास्त्राला धरून रसवाही ओळख ‘संस्कृत काव्याचे पंचप्राण’ या ग्रंथात करून दिली आहे आणि त्याचबरोबर ‘महाकाव्य’ या विषयाचीही एकूणच शास्त्रीय माहिती दिली आहे.
या सर्व पुस्तकांमधून प्रा.वाटवे यांच्या व्यासंगाबरोबरच त्यांच्यातील संशोधकवृत्ती आणि काव्यरसिकता यांचेही दर्शन घडते.
याखेरीज या प्रत्येक महाकाव्याचा स्वतंत्रपणे परिचय करून देणारी, आणि कादंबरी, मेघदूत यांचाही रसाळ भाषेत परिचय करून देणारी पुस्तके त्यांनी लिहिली.
‘व्यवहार संस्कृत’ (१९६४) हे त्यांचे छोटेसे पुस्तक संस्कृत साहित्यावर आधारित पाठ आणि सोपे वेचे या स्वरूपाचे आहे, पण त्यातूनच संस्कृतचे बोलीतले लोकाभिमुख, प्रवाही व जिवंत असे भाषारूप दिसून येते.
संस्कृतातील ही रसगंगा मराठीत आणून त्यांनी मराठी वाचकांना संस्कृतची गोडी लावली. भारतीय ऐक्य हे संस्कृतनेच साधणार आहे, यावर त्यांचा विश्वास होता. या विश्वासाच्या बळावरच त्यांच्यातील संस्कृतच्या प्रसारकाचा पिंड घडत गेला. पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल व्याख्यानमालांतून संस्कृत भाषा, वाङ्मय आणि त्यातील सौंदर्यस्थळे यावर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली. मराठीवर त्यांचे निर्विवाद प्रभुत्व होते. पण संस्कृतमध्येही ते अस्खलित बोलत असत.
प्रा.वाटवे जसे सौंदर्यग्राही समीक्षक होते, तसेच प्रगल्भ विचारवंतही होते. पुराणांतल्या अद्भुतांमागेही काही विचारणीय अंश असतो आणि त्यातल्या अवतार कथा ह्या सामाजिक व राजकीय क्रांती घडवून आणणार्या महापुरुषांच्या कथा असतात, असे ते मानतात (भागवतातील कथा, प्रस्तावना). सामाजिक बाबतीत समता व औदार्य यांवर त्यांचा भर होता. नवीन गुणनिष्ठ समाजव्यवस्था व्हावयास हवी, दैववाद हा व्यवहारतः कमी उपयोगी असून प्रयत्नवादच खरा उपयोगी असल्याचे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राच्या उपसंहारात म्हटले आहे.