Skip to main content
x

वझे, रामकृष्ण नरहर

रामकृष्ण नरहर वझे यांचा जन्म सावंतवाडी संस्थानातील ओझरे या गावी झाला. रामकृष्ण दहा महिन्यांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे त्यांच्या मातु:श्री लक्ष्मीबाई यांनीच मोलमजुरी करून त्यांना सांभाळले. रामकृष्णांचे वय ४-६ वर्षांचे असताना कागल येथे त्या चरितार्थासाठी आल्या. कागल संस्थानातील श्रीमंत अण्णासाहेब देशपांडे यांच्याकडे त्या स्वयंपाक-पाण्याचे काम करीत.
रामकृष्ण वझे यांंचे प्राथमिक शिक्षण जेमतेम मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. त्यांचा गायनाकडील ओढा पाहून लक्ष्मीबाईंनी त्यांचे गायन-शिक्षण दरबार गवई बळवंतराव पोहरे यांच्याकडे सुरू केले. दोन वर्षे त्यांच्याकडे शिकल्यानंतर मालवणात विठोबा अण्णा हडप यांच्याकडे त्यांनी वर्षभर शिक्षण घेतले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या काळच्या रिवाजाप्रमाणे आईने त्यांचे लग्न लावून दिले. आईच्या एकटीच्या मिळकतीवर आपल्या संसाराचे ओझे सांभाळले जाणार नाही, या विचाराने ते व्यथित झाले. वाटेल ते करून संगीतविद्या मिळवायची व प्रपंचाचा भार स्वत:वर घेऊन आईला कष्टातून सोडवायचे या निर्धाराने रामकृष्णांंनी निर्धन अवस्थेतच अवघ्या बाराव्या वर्षी घर सोडले.
रामकृष्ण वझे कागलहून चालतच पुण्याला पोहोचले व तेथून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईला त्यांना प्रख्यात बीनवादक बंदे अलीखाँ यांचे बीनवादन, तसेच शिष्या चुन्नाबाई यांचे गाणे ऐकायला मिळाले. मुंबईहून ते इंदूरला नानासाहेब पानसे यांच्याकडे गेले. नानासाहेबांनी त्यांना ‘गाणे शिकायचे असेल तर ग्वाल्हेरला जा,’ असे सांगितले. त्यानंतर उज्जैनला ते नाना अष्टेवाले यांच्याकडे राहिले. इथे रामकृष्ण वझे यांना तानरसखाँ या गवयाचे गाणेही ऐकायला मिळाले. पुढे अष्टेवाल्यांबरोबरच ते बनारसला विष्णुपंत छत्रे यांच्या सर्कशीत गेले. सर्कशीचे खेळ नसत तेव्हा तिथे नामवंत गायकांचे जलसे होत. याच मुक्कामात निसार हुसेनखाँ यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्यांना गुरू मानून त्यांच्याबरोबर ते ग्वाल्हेरला पोहोचले.
अतिशय हालअपेष्टा सोसून, माधुकरी मागून खाँसाहेबांचा विक्षिप्त स्वभाव व लहर सांभाळून मोठ्या कष्टाने व चिकाटीने वझे यांनी गानविद्या मिळवली. सुरुवातीच्या चार वर्षांत खाँसाहेबांनी त्यांना जेमतेम आठ चिजा शिकवल्या. त्यांचा आवाजही त्या वेळी फुटला होता. त्यामुळे त्यांच्या वाटेला उपेक्षा व हेटाळणीच येत असे. पुढे सरदार दादासाहेब भुस्कुटे यांच्या आग्रहावरून निसार हुसेन खाँसाहेबांकडून वझे यांना भरपूर गानविद्या मिळाली. जवळजवळ नऊ वर्षे त्यांना निसार हुसेन खाँसाहेबांची तालीम मिळाली.

रामकृष्णबुवा वझे हे भरतीदार गवई होते. ग्वाल्हेरमध्ये असताना त्यांनी अनेक गवयांकडून विद्या घेतली. बुवांनी जवळजवळ सतरा गुरूंकडून विद्या मिळविली असे सांगितले जाते. इनायत हुसेन खाँ, सादक अली खाँ, मुहम्मद अली खाँ, अली हुसेन बीनकार, सतारिये पन्नालाल गुसांई इत्यादी. त्यांनी अनेकांना तंबोर्‍यावर साथ केली आणि अनेक गवयांकडून हरतर्‍हेचे रंग त्यांनी आपल्या ग्वाल्हेर गायकीत सामावून घेतले. याचाच परिणाम असा झाला, की बुवांची गायकी प्रचलित ग्वाल्हेर घराण्यापेक्षा वेगळी झाली व ती खास ‘वझेबुवांची गायकी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांना १९०० मध्ये नेपाळ दरबारात राजदरबारी म्हणून सन्मानित करण्यात आले. नेपाळच्या दौर्‍यावर असतानाच स्वामी विवेकानंदांचा पंधरा दिवसांचा सहवास त्यांना लाभला. या सहवासात संगीतादी सर्व विषयांत दोघांनी एकमेकांच्या विचारांचे आदान-प्रदान केले.
बुवा हे एक सारग्राही गायक होते. विविध घराण्यांची गायकी आत्मसात करून स्वत:च्या स्वतंत्र शैलीतून त्यांचे एकसंध सादरीकरण हे बुवांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. वझेबुवांचा आवाज मोठा व रुंद होता. गायकी जोरकस व आक्रमक होती. वजनदार गमक मुखबंदीच्या, जबड्याच्या हुंकारयुक्त तानांनी भरलेली. त्यांची स्पष्ट व जोरदार तान गर्जनाच वाटे. मध्य व द्रुत लयीतील चिजा ते बहारीने गात. प्रचलित रागाबरोबरच अप्रचलित रागही ते बहारीने गात. बरेचसे अप्रचलित राग त्यांनी प्रकाशात आणले. कल्पनाशक्ती व बुद्धीप्रधानता यांचा अजोड मिलाफ त्यांच्या गायनात होता.
 मराठी संगीत रंगभूमीवरील वझेबुवांचे योगदान महत्त्वाचे आहे. जवळजवळ नऊ ते दहा नाटकांना त्यांनी संगीत दिले. ‘हाच मुलाचा बाप’ (१९१८), ‘संन्याशाचा संसार’ (१९१९), ‘शहा शिवाजी’ (१९२१), ‘सत्तेचे गुलाम’ (१९२२), ‘तुरुंगाच्या दारात’ (१९२३), ‘कृष्णार्जुन युद्ध’ (१९२५), ‘संगीत श्री’ (१९२६), ‘शिक्का कट्यार आणि रणदुंदुभी’ (१९३७) आणि ‘सोन्याचा कळस’ (१९३२). वझेबुवांनी नाट्यसंगीता-करिता भारदस्त रागदारी संगीताची योजना केली. मर्दानी व तेजस्वी गायकी परंपरा त्यांनी रंगभूमीला बहाल केली. अनेक प्रचलित, तसेच अप्रचलित रागदारीतील खानदानी चिजा वझेबुवांनी नाट्यसंगीताद्वारे रंगभूमीवर आणल्या. त्या योगे मराठी नाट्यसंगीतात अनवट राग आणि विविध ताल आणले. ‘सखी मुखचंद्र’, ‘देवता कामुकता’, ‘वितरी प्रखर’, ‘आपदा राज्यपदा’, ‘दिव्य स्वातंत्र्य रवी’, ‘सुकतातची जगी या’ इत्यादी नाट्यपदे त्यांच्या रंगभूमीवरील सांगीतिक योगदानाची साक्ष देतात.
वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी रामकृष्णबुवा वझे यांनी ‘संगीत कला प्रकाश’ या नावाने दोन भागांत दुर्मिळ राग व बंदिशी प्रकाशित केल्या. तसेच, यात आत्मचरित्रात्मक लेखनही केले. आत्मचरित्रात्मक लेखनातून बुवांनी घेतलेल्या अपार कष्टांची कल्पना तर येतेच, शिवाय त्या काळच्या संगीतविश्वावरदेखील प्रकाश पडतो. याशिवाय नोटेशनसहित नव्वद रागांच्या बंदिशी आहेत. विविध वृत्तपत्रे व मासिकांमधूनही त्यांनी लेख लिहिले. त्यांनी ‘श्रीराम करुणा लहरी’ हे आध्यात्मिक पुस्तकही प्रकाशित केले.
कोलंबिया कंपनीने वझेबुवांच्या रागदारी गायनाच्या नऊ ध्वनिमुद्रिका काढल्या. खंबावती (सखी मुखचंद्र), मियां मल्हार (बोल रे पपियरा), भैरव बहार (डार डार पात), तिलक कामोद (तीरथ को सब करे), खट (विद्याधर) इत्यादी ध्वनिमुद्रिकांतील त्यांचे गायन अत्यंत प्रभावी असून वझेबुवांच्या गायनाची त्यातून कल्पना येते.
वझेबुवांनी अनेकांना मुक्तकंठाने विद्यादान केले. त्यांच्या अनेक उल्लेखनीय शिष्यांत त्यांचे सुपुत्र पं.शिवरामबुवा वझे, पं.हरिभाऊ घांग्रेकर, केशवराव भोसले, पं.गजाननबुवा जोशी, कागलकरबुवा, गुरुराव देशपांडे, पं.भास्करबुवा जोशी, भालचंद्र पेंढारकर यांचा समावेश होतो. मा. दीनानाथ हेही त्यांचे गंडाबंध शागीर्द होते. याशिवाय अनेकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. नंतरच्या पिढीतील कुमार गंधर्व, राम मराठे इ. गायकांवर त्यांच्या गायकीचा प्रभाव दिसतो.
रामकृष्णबुवा हे व्हायोलिन आणि सतार ही वाद्येही उत्तम वाजवीत. ते निर्व्यसनी होते. गाण्यावर तसेच खाण्यावर त्यांचे प्रेम होते, ‘जो गवैया सो खवैया’ असे ते म्हणत. त्यांना मधुमेहाचा विकार होता. त्यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या जन्मगावी वजरे येथे ५ मे २००४ साली त्यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. तेथे त्यांच्या पुण्यतिथिनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन होते.

लीनता वझे, माधव इमारते

वझे, रामकृष्ण नरहर