Skip to main content
x

वर्तक, वामन दत्तात्रेय

      डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक यांचा जन्म पुण्याजवळच्या भोर संस्थानात झाला आणि शिक्षण पुण्यात झाले. फर्गसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना, प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी लागली. पुणे परिसर, गोव्यापर्यंतची सह्याद्री पर्वतराजी, येथे ते झाडे बघत-अभ्यासत फिरले. फर्गसन महाविद्यालयामध्ये दहा वर्षे शिकवल्यावर त्यांनी डॉ. आघारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकत्याच सुरू केलेल्या विज्ञानवर्धिनीत संशोधक म्हणून प्रवेश केला. डॉ. आघारकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सायपेरसी या वनस्पतिसमूहावर पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. डॉ. आघारकर आणि त्यानंतरचे संचालक डॉ. देवडीकर या दोघांचा वर्तक यांच्या पुढील कारकिर्दीवर फार चांगला परिणाम झाला. काही काळानंतर वर्तक वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख झाले आणि पुढे त्याच संस्थेचे संचालक म्हणून निवृत्त झाले.

     जिथे वनस्पती नैसर्गिकरीत्या उगवतात, त्या स्थळावर जाऊन त्यांचे निरीक्षण करणे, त्यांचे शास्त्रशुद्ध वर्णन करणे आणि नाव ओळखणे, या विषयांमध्ये वर्तक यांचा हातखंडा होता. गोळा केलेल्या वनस्पतींचे कागदावर चिकटवलेले/ शिवलेले सुमारे १५,००० नमुने, सुटे १२,००० नमुने आणि बाटल्यांतून साठवलेले १००० नमुने ही त्यांनी गोळा केलेल्या वनस्पतींची समृद्धी त्यांच्या अथक परिश्रमांची परिणती आहे. या वनस्पती नमुन्यांपैकी बऱ्याच वनस्पतींची शास्त्रीय वर्णने, त्यांचे शंभरावर शोधनिबंध, त्यांनी मार्गदर्शन केलेले सोळा पीएच.डी. प्रबंध आणि एक पुस्तक यांत मिळते. गोव्यातील वनस्पतींवर १९६६ साली लिहिलेले पुस्तक  ‘गोमांतकातील वनश्री’  संदर्भग्रंथ म्हणून महत्त्वाचे ठरले आहे. भेरली माड (कारयोटा युरेन्स-फिशटेल पाल्म) या झाडाबद्दल त्यांना विशेष आत्मीयता होती. संपूर्ण सह्याद्री भ्रमणानंतर हे आज शोभेचे ठरलेले झाड, मूळचे रत्नागिरीच्या डोंगरांतले असावे, असे त्यांचे मत होते.

     वर्तकांचे संशोधन पथदर्शी ठरण्याचे कारण हे की, वनस्पती ओळखून नोंद केल्यावर ते त्या वनस्पतींचा औषधी व इतर उपयोग, पारंपरिक उपयुक्तता आणि वनवासींची त्या औषधी वापरण्याची पद्धत या गोष्टींचीही नोंद करत. ज्या ठिकाणी त्या वनस्पती उगवतात, ती ठिकाणे रक्षण्याची निकडही ते सांगत. वनवासी लोकांनी वनौषधी संवर्धनासाठी बाणलेल्या पद्धती यांकडे वर्तक यांच्या अभ्यासामुळे जगाचे लक्ष वेधले आणि देवराई (देवाच्या नावाने राखून ठेवलेली वने) ही वनस्पतींच्या संवर्धनाची नैसर्गिक पद्धत असते, या त्यांच्या विचाराला जगन्मान्यता मिळाली. पुण्याजवळील पानशेत येथील देवरायांपासून सुरुवात करत त्यांनी सह्याद्रीतील अनेक देवरायांचा अभ्यास केला, त्यांतील औषधी आणि एरवीही उपयुक्त वनस्पतींचा अभ्यास केला आणि तेथील वनवासींच्या सवयींचे नाते जोडून एथ्नोबॉटनी या विषयांतील जे महत्त्वाचे योगदान दिले, ते पथदर्शी मानले जाते.  

     वर्तकांना जे.डब्ल्यू.हर्षबेर्गेर सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सन्मानार्थ दोन वनस्पतींना त्यांचे नाव देण्यात आलेे आहे. पर्मोटेमा वर्तकी हाले हे लायकेन आणि इझाडिराक्ट्रा इंडिका ए. एस. वर्तकी हा कडुलिंबाचा प्रकार. भारताचा वनस्पती सर्वेक्षण विभाग, राज्याचा वनविभाग यांच्या सल्लागार समित्यांवर त्यांना मानाचे स्थान होते. फर्गसन महाविद्यालयाचे समृद्ध वनस्पती उद्यान ही त्यांच्याच क्रियाशीलतेची साक्ष आहे.

     आपल्या संशोधनावर आधारित, पण सर्वसाधारण वाचकास समजेल, असे अनेक लेख त्यांनी मराठीत लिहिले आहेत. त्यांची आकाशवाणीवरील भाषणेही सोप्या भाषेत असल्याने त्यांना चांगला श्रोतृवर्ग लाभे. पुण्याच्या वरिष्ठ नागरिकांना विद्यापीठाच्या वनस्पती उद्यानांतील झाडांची माहिती देत फिरण्याची पद्धत त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू ठेवली होती.

डॉ. शरद चाफेकर

वर्तक, वामन दत्तात्रेय