यावलकर, केशव श्रावण
केशव श्रावण यावलकर यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील वरुड या गावी एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांनी अतिशय काबाडकष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना प्राथमिक शिक्षण दिले. शेती ही जीवननिष्ठा झाली पाहिजे, असा संस्कार त्यांनी आपल्या मुलांवर केला. विश्राम आणि केशव या दोन्ही मुलांनी हाच विचार आयुष्यभर बाळगून कार्य केले. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी विश्राम यांच्यावर पडली. परिस्थितीमुळे त्यांनी स्वत:च्या शिक्षणास मॅट्रिकनंतर पूर्णविराम दिला, परंतु केशव यांचे शिक्षण पूर्ण केले.
केशव यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण वरुड मोर्शी व अमरावती येथे झाले. ते पहिल्या वर्गात मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी कृषी महाविद्यालय नागपूर येथे प्रवेश घेतला. १९४७मध्ये ते बी.एस्सी. (कृषी) ही पदवी पहिल्या वर्गात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पदव्युत्तर अभ्यासासाठी ते आय.ए.आर.आय. दिल्ली येथे दाखल झाले. तेथेही एम.एस्सी. (कृषी) पदवी पहिल्या वर्गात द्वितीय क्रमांकानी १९४९मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर केशव उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाले. १९५३मध्ये त्यांनी मिनेसोटा विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली व भारतात परत आले.
विश्राम यावलकर पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी केशवरावांचा विवाह विद्याविभूषित परंतु आंतरशाखीय मुलीशी लावून दिला. त्या पूर्वाश्रमीच्या कुमुदिनी भरवीरकर, विज्ञानशाखेच्या पदवीधर.
केशवरावांनी १९५४मध्ये आय.ए.आर.आय. दिल्ली येथे साहाय्यक कृषिशास्त्रज्ञ म्हणून नोकरी पत्करली. पुढे कृषिशास्त्रज्ञ, वरिष्ठ कृषिशास्त्रज्ञ व प्राध्यापक पदापर्यंत त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने बढती मिळत गेली. दिल्लीत वास्तव्यास असताना केशवरावांनी पत्नीला उच्च शिक्षणाकरता अमेरिकेस पाठवले. तेथे त्यांनी एम.एस. ही पदवी ऑक्युपेशनल थेरॅपी या विषयात न्यूयॉर्क विद्यापीठातून प्राप्त केली व त्या परत आल्या.
दिल्लीत आय.ए.आर.आय. या संस्थेत कार्यरत असताना केशवरावांचे वरुडला येणे-जाणे स्वाभाविक होते. विश्रामदादांचे घरच्या शेतात प्रायोगिक स्वरूपात सुरू असलेले संशोधन केशवरावांना प्रभावित करत होते. त्यांच्या मनात एक विचार येऊ लागला की, माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या गावातील शेतकऱ्यांना कसा होईल! या विचाराने ते अस्वस्थ होते. मनाच्या या अवस्थेतच ते एकदा सासर्यांबरोबर किर्लोस्करवाडीस गेले असता किर्लोस्कर उद्योग पाहून प्रभावित झाले. केशवरावांनीही शेतीसंबंधी कीटकनाशकांचा कारखाना सुरू करण्याचा विचार पक्का केला आणि १९६२मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थेतील वर्ग एक पदावरील नोकरीचा राजीनामा दिला.
केशवरावांनी १९६२ला नागपूर येथे यावलकर पेस्टीसाइड अँड केमिकल्स लि. या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. या कारखान्याच्या तांत्रिक कामाची जबाबदारी त्यांच्या पत्नी कुमुदिनी यांनी केमिस्ट म्हणून स्वत:कडे घेतली. नंतर १९७५मध्ये हीच संस्था यावलकर पेस्टिसाइड अँड केमिकल्स लि. म्हणून पुढे आली. या संस्थेचे केशवराव अध्यक्ष व कार्यकारी संचालक म्हणून काम पाहू लागले.
केशवरावांचे विद्यार्जन व संशोधन कार्याकडे सतत बारीक लक्ष राहिले. त्यांनी १९९२पर्यंत २९ एम.एस्सी. (कृषी) व २० पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांची शेती विषयावर ८ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. ते भारत सरकारचे, आय.डी.सी.आय. बँकेचे, आय.एफ.सी.आय.चे प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या संस्थांवर संचालक म्हणून होते. उदा. बँक ऑफ महाराष्ट्र, वसंत सहकारी साखर कारखाना इ., शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाच्या सिनेटवर, कार्यकारी सभेवर, अभ्यास मंडळावर काम करताना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नागपूर विद्यापीठ, महाराष्ट्र कृषी विद्यापीठास व डॉ.पं.दे.कृ.वि.स झाला आहे.