Skip to main content
x

आगाशे, अच्युत भास्कर

          च्युत भास्कर आगाशे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातूनच पूर्ण केले. विज्ञान शाखेमधील रसायनशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते शेती व्यवसायात उतरले. ‘आदर्श शेती’ करून दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेतीवर वैज्ञानिक प्रयोग केले. घरातील सर्वांनीच फक्त शेती व्यवसाय न करता एका भावाने मुख्य शेती करायची व अन्य भावांनी तेथेच राहून शेतीपूरक व्यवसाय करायचे; म्हणजे घर विभागत नाही, शेतीवाटपाचे वाद निर्माण होत नाहीत, यामुळे घरातील सर्व जण एकमेकांशी गुंफून राहतात व एका व्यवसायात तोटा आल्यास संपूर्ण घराला फटका न बसता अन्य व्यवसाय सावरण्यास मदत होते. हा व्यवहारी विचार लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न आगाशे यांनी केला आणि बर्‍याच अंशी त्यात यश मिळवले. दुग्ध व्यवसाय, फूलशेती, रेशीम उद्योग, मधमाशापालन, फळबाग तंत्रज्ञान, वनशेती, भुसार (ठोक) विक्री, गांडूळखत व बायोगॅस निर्मिती हे व्यवसाय शेतीशी कसे संलग्न आहेत व त्यामुळे आर्थिक उन्नती साधता येते हे त्यांनी सातत्याने प्रयोग करून सिद्ध केले. शेतकर्‍यांमध्ये एकजूट असावी यासाठी गावोगावी मंडळे स्थापन केली. प्रगत तंत्रज्ञान थेट शेतावर उपलब्ध होण्यासाठी त्यांनी ‘शेतकरी विज्ञान मंडळ’ स्थापन केले. दशक्रोशीतील दुग्ध व्यावसायिक एकत्र असावेत, या हेतूने श्रीरामपूर येथे ‘महाराष्ट्र पशुसंवर्धक संघटना’ स्थापन केली. कोरडवाहू क्षेत्रामध्ये ‘बोर’ या फळझाडाची नवीन तंत्रज्ञानाने लागवड केली. गावठी बोराचे झाडावर कलम करून उमराण कलमे तयार केली. या पद्धतीने लागवड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ‘महाराष्ट्र बोर उत्पादक संघा’ची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण व्हावी, या हेतूने त्यांनी श्रीरामपूर येथे ‘श्रीराम व्यायाम मंडळाची’ स्थापना केली. जवळच्या गावांमधून दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. श्रीरामपूरमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ स्थापन केला.

         आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्यांमधील शेतकरी नवीन प्रयोग करून यश संपादन करतात, याची माहिती होण्यासाठी आगाशे दरवर्षी ‘शेतीसहल’ आयोजित करत. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकर्‍यांनी केलेले नवीन यशस्वी प्रयोग बघण्यासाठी आगाशे बाहेरच्या शेतकऱ्यांनादेखील आवर्जून आमंत्रित करत. दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी १९८० पासून आगाशे दरवर्षी श्रीरामपूर येथे चर्चासत्रे, मार्गदर्शक व्याख्याने, पशुचिकित्सा शिबिरे आयोजित करत.

            दुग्ध व्यावसायिकांसाठी ‘श्‍वेतक्रांती’ हे द्वैमासिकही आगाशे यांनी सुरू केले. ते राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प-अहमदनगर,  शेळीमेंढी विकास संशोधन संस्था - फलटण या संस्थांशी संबंधित होते. त्यांना लायन्स क्लब श्रीरामपूरतर्फे मानपत्र, पंचायत समिती श्रीरामपूरतर्फे गुणगौरव प्रमाणपत्र (१९८७), पशुपालन व दुग्धविकास या क्षेत्रामधील विशेष योगदानासाठी वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार (१९९२), पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र शासनाचा वैयक्तिक योगदान पुरस्कार (१९९३), ‘बळीराजा’तर्फे शेतीमधील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानपत्र (१९९८) हे पुरस्कार मिळाले आहेत.

- मिलिंद कृष्णाजी देवल

आगाशे, अच्युत भास्कर