Skip to main content
x

अमेम्बल, दिनकर

डी. अमेल

दिनकर अमेम्बल यांचा जन्म दक्षिण कर्नाटक येथील चित्रापूर सारस्वत कुटुंबात झाला. अमेम्बल कुटुंब हे संगीत व कलाप्रेमी कुटुंब म्हणून ओळखले जाई. अमेम्बल यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगलोरच्या गणपती विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर ते कुटुंबासोबत मुंबईत आले. जात्याच गोड आवाज असलेल्या अमेम्बलांनी रीतसर संगीत शिक्षण घेतले नव्हते. ते स्वशिक्षित गायक होते. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला असतानाच संगीताच्या जबरदस्त वेडापायी शिक्षण सोडून ते मुंबईला आले व १९२७ साली त्यांनी इंडियन स्टेट्स ब्रॉडकास्टिंग कंपनीमध्ये गायक आणि वादक म्हणून, सुरुवातीला नैमित्तिक कलाकार म्हणून व नंतर पगारी कलावंत म्हणून नोकरी पत्करली. पुढे १९३६ साली इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचे ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव सर्वमान्य झाले. अमेम्बलांना या ऑल इंडिया रेडिओमध्ये समाविष्ट करून भारतीय संगीताचे कार्यक्रम अधिकारी म्हणून नेमण्यात आले. १९६७ साली ते आकाशवाणीवरून निवृत्त झाले.

विद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अमेम्बल गायक म्हणून लोकप्रिय होते. अतिशय गोड आणि लवचिक आवाजाची त्यांना देणगी होती. भक्तिगीते गाण्याकडे त्यांचा अधिक कल होता. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे त्यांचे आदर्श होते व त्यांच्या शैलीचा अमेम्बलांवर प्रभाव होता. गायनाबरोबरच हार्मोनिअम या वाद्यावरही त्यांचे प्रभुत्व होते. ए.सुंदर राव या त्यांच्या थोरल्या बंधूंच्या हार्मोनिअम वादनाने प्रभावित होऊन त्यांनी हार्मोनिअम वाजवायला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर हार्मोनिअमवर आकाशवाणीने बंदी घातली, तेव्हा अमेम्बलांनी बासरी व व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. पुढे बासरी वादनावरच आपले पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यात त्यांनी आश्चर्यकारक प्राविण्य मिळविले.

आकाशवाणी मुंबई केंद्रावरील कार्य हे अमेम्बलांचे खरे योगदान होते. त्यांनी १९३५ साली ‘व्हीयूबी इंडियन ऑर्केस्ट्रा’ या वाद्यवृंदाची सुरुवात केली. ‘डी. अमेल’ हे टोपणनाव घेऊन भारतीय रागदारी संगीतातील मध्यवर्ती कल्पना (थीम्स) घेऊन त्यांनी अनेक रचना करून त्या प्रसारित केल्या. या रचनांचे दिग्दर्शक आणि मार्गदर्शकही तेच असायचे. पुढे या वाद्यवृंदाचे ‘बम्बई (मुंबई) आकाशवाणी वाद्यवृंद’ म्हणून नामकरण करण्यात आले.

या वाद्यवृंदात अमेम्बलांचा बासरीवादक म्हणून सहभाग असे व संचालन देखील तेच करीत. तंतुवाद्य, सुषिरवाद्य, तसेच घनवाद्यांचे वेगवेगळे प्रकार या वाद्यवृंदात असत, शिवाय क्लॅरिओनेट व दाक्षिणात्य संगीतातील गोटुवाद्यमचा ही  यांत समावेश असे. श्रीधर पार्सेकर, मंगेशराव कामू, इब्राहिम, अल्लारखा यांसारख्या दिग्गज वादकांचाही या वाद्यवृंदात सहभाग असायचा.

भारतीय राग संगीतातील अनेक प्रचलित व अप्रचलित राग, अकरा रागांची एक मालिका, कानडा, मल्हार, तोडी, सारंग यांसारख्या रागांचे काही अप्रचलित प्रकार, हिंडोल—बहारसारखे जोड-राग, यांबरोबरच ठुमरी, नाट्यसंगीत, गझल, नगमा असे विविध संगीत प्रकार या वाद्यवृंदाद्वारे त्यांनी प्रसारित केले. एच.एम.व्हीने पिलू व नायकी कानडा या दोन वाद्यवृंद रचनांच्या ध्वनिमुद्रिकाही काढल्या होत्या. नायकी-कानडाची ही रचना पुढे ‘वनिता मंडळा’चे बोधसंगीत म्हणूनही रूढ झाली.

‘सप्ताह गीत’ हा कार्यक्रमही त्या काळी लोकप्रिय झाला होता. दिनकर अमेम्बलांना संगीताच्या जाणकारी- बरोबरच साहित्याची व काव्याचीही चांगली जाण होती. बा.सी. मर्ढेकर, कृ.द. दीक्षित यांसारखी मंडळी त्या वेळी त्यांच्याबरोबर काम करीत. मराठीतील नामवंत कवींच्या गीतांना अमेम्बलांनी चाली लावल्या. दर आठवड्याला एक गीत सादर होत असे. कुसुमाग्रज, कवी मायदेव, अनिल, पु.शि. रेगे, संजीवनी मराठे यांच्या गीतांना त्यांनी अतिशय सुंदर चाली दिल्या होत्या. छोटा गंधर्व, मोहनतारा अजिंक्य, सरस्वती राणे, पुरुषोत्तम सोळांकुरकर, सुरेश हळदणकर यांसारख्या गायक-गायिकांनी या रचना गायल्या होत्या.‘ नवलाख तळपती दीप विजेचे जेथ’, ‘स्वप्नातून आलीस तुडवीत हिमलहरी’, ‘झोक्यांना घेऊ या बाई, झोक्यांना देऊ या’ अशा अनेक काव्यदृष्ट्या सुंदर रचनांना अमेम्बलांनी संगीत दिले होते. ‘भावगीत म्हणजे कवितेचे संगीतमय इंटरप्रिटेशन’, असे ते मानीत.

याशिवाय ‘बदकांचे गुपित’, ‘कर्ण’ या कवी मर्ढेकरांच्या संगीतिकांनाही अमेम्बलांनी संगीत दिले होते. अनेक ‘सिग्नेचर ट्यून्स’ त्यांनी तयार केल्या, यात वॉल्टर कॉफमन या त्या वेळच्या पाश्चात्त्य संगीत विभाग प्रमुखाचाही सहभाग होता. या दोघांनी मिळूनही अनेक सांगीतिक रचना सादर केल्या.

आकाशवाणीवर हार्मोनिअम वादनावर बंदी असल्यामुळे अमेम्बल बासरीकडे वळले. ते पितळेची बासरी उभी वाजवीत. सर्वसाधारणपणे उत्तर हिंदुस्थानी रागदारी संगीतात आडव्या बासरीचाच वापर करतात; पण त्यांनी या उभ्या बासरीतून रागदारी संगीत सादरीकरणातील अनेक घटक युक्तीने वापरून रागसंगीत फुलवले. प्रसिद्ध बासरीवादक पं. पन्नालाल घोषांबरोबर अमेम्बलांची मुंबई केंद्रात जुगलबंदीही झाली होती.

‘अमेली तोडी’ व ‘अमलेश्वरी’ या दोन रागांची निर्मितीही अमेम्बल यांनी केली. बी.आर. देवधर त्यांच्या अमेली तोडीने एवढे प्रभावित झाले होते, की त्यांनी या रागात विलंबित आणि द्रुतमध्ये बंदिशीही बांधल्या.

जवळजवळ ३४ वर्षे त्यांनी आकाशवाणीवर काम केले. शेवटची काही वर्षे ते प्रशासकीय विभागात होते. अतिशय मृदू स्वभावाच्या व मितभाषी डी. अमेलांना १९९० साली कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार लाभला. सूफी संत आणि गुजराती व उर्दू रंगभूमीवरील कलाकार अश्रफ खान हे त्यांचे श्रद्धास्थान होते. आपली शेवटची वर्षे त्यांनी ध्यान-धारणा, वाचन यांतही व्यतीत केली. कालांतराने त्यांच्या कानामध्येही दोष निर्माण झाला होता, पुढे वाढून ते कानांनी अधू झाले. या सर्जनशील कलावंताचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी मुंबई येथे निधन झाले.

भारतीय रागदारी संगीताचे सुलभ व श्रवणीय रूप प्रसारित करून जनसामान्य श्रोत्यांची अभिरुची वाढवण्यात आकाशवाणीचा जेवढा सहभाग आहे तेवढाच, नव्हे त्यातूनही अधिक वाटा दिनकर अमेम्बल ऊर्फ डी. अमेल यांचा आहे.

— माधव इमारते

अमेम्बल, दिनकर