Skip to main content
x

आमटे, मुरलीधर देवीदास

   मुरलीधर देवीदास आमटे तथा बाबा आमटे यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट या गावी झाला. त्यांचे वडील शासकीय अधिकारी होते. मूळचे जमीनदार घराणे असल्यामुळे बाबा आमटे यांचे लहानपण श्रीमंतीत गेले. त्यांना १ भाऊ व ४ बहिणी होत्या. वडिलांच्या कडक शिस्तीत आणि आईच्या सुसंस्कारात बाबांच्या जीवनाची जडणघडण झाली. प्रवाहाविरुद्ध जाण्याची मानसिक शक्ती बाबांना लहानपणीच मिळाली. श्रीमंत असणार्‍या बाबांना गरीब लोकांचे दुःख व दारिद्य्र यांची जाणीव होती. बाबा आमटे यांचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. १९३४ मध्ये ते बी.ए. झाले आणि १९३६ साली त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. प्रारंभी त्यांनी दुर्ग, मध्य प्रदेश येथे वकिली सुरू केली. नंतर १९४० मध्ये ते वरोरा येथे आले आणि तेथे वकिली सुरू केली. बाबांनी गरीब व दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. त्यांच्या मनावर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मतांचा फार प्रभाव होता. त्यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. १८ डिसेंबर १९४६ रोजी इंदू घुले यांच्याशी बाबांचा विवाह झाला. इंदू घुले या विवाहानंतर साधनाताई आमटे या नावाने परिचित झाल्या. बाबांच्या कार्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यानंतर बाबांनी नगरपालिकेचे उपाध्यक्षपद स्वीकारले आणि गरीब कामगारांच्या सेवेसाठी आपले जीवन वाहून घेतले. तुलशीराम हे एक कुष्ठरोगी गटारामध्ये पडलेल्या अवस्थेत बाबांना आढळले. ते पाहून त्यांचे मन सुन्न झाले. त्यांनी कुष्ठरोग्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी झटून कार्य केले. येथूनच बाबांच्या जीवनाला शेती व्यवसायाची जोड मिळाली. वरोरा येथील जंगल परिसरातील ५० एकर जमीन मिळवून ती शेतीयोग्य करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी कुष्ठरोग्यांना स्वावलंबी करून त्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचे महत्कार्य केले.

    बाबा आमटे यांनी साधनाताई व डॉ. प्रकाश व डॉ. विकास आणि ६ कुष्ठरोगी बांधवांना सोबत घेऊन विहिरी खणल्या व योग्य मशागत करून कोरडवाहू जमिनीवर आनंदवनफुलवले. त्यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालयाची स्थापना केली व जैविक कीड नियंत्रण आणि जैविक खत प्रयोगशाळासुद्धा सुरू केली. त्यांनी निरनिराळे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी हरितगृहाची निर्मितीदेखील केली आणि भाजीपाल्याचे उत्पन्न वाढवले. तसेच तुषार सिंचनाद्वारे शेतीमध्ये पाण्याचा कमी वापर करून बारमाही शेती उत्पन्नाची सोय केली.

    आज आनंदवन येथे २५० एकर शेती असून, शेतीमध्ये नवनवे प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यात येत आहे. बाबांच्या मार्गाने जाऊन डॉ. प्रकाश आणि डॉ. विकास आपल्या परिवारासह कुष्ठरोग्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत आहेत व त्यांच्या जीवनामध्ये खराखुरा आनंद निर्माण करत आहेत.

    आमटे यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार (१९७१), नागपूर विद्यापीठाची डि.लिट. पदवी (१९८०), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांची कृषिरत्न मानद पदवी (१९८१), पद्मविभूषण पुरस्कार (१९८३), अपंग कल्याण पुरस्कार (१९८३), शांतिनिकेतन पश्चिम बंगाल यांचा विश्‍वभारती पुरस्कार (१९८८), गांधी शांतता पुरस्कार (१९९९), महाराष्ट्रभूषण पुरस्कार (२००५) अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

    बाबा आमटे यांनी १९४९ मध्ये महारोगी सेवा समिती स्थापन केली. कुष्ठरोग बरा झाल्यानंतर या लोकांचे जीवन कसे सुधारता येईल, याचा प्रयत्न केला व आनंदवनस्थापन करून या लोकांना स्वतःचे घर मिळवून दिले. बाबांनी या लोकांना शेतीतील कामे करण्यासाठी उद्युक्त करून रोजगार मिळवून दिला व त्यांचे जीवन स्वावलंबी व्हावे, यासाठी प्रयत्न केले. त्यांनी आदिवासी व कुष्ठरोगी यांच्यासाठी आनंदनिकेतन कृषी महाविद्यालय१९६५ मध्ये स्थापन केले. हे कृषी महाविद्यालय पूर्वी फक्त दोन वर्षांचाच अभ्यासक्रम चालवत असे. नंतर ते स्वयंपूर्ण कृषी महाविद्यालय झाले आहे. या कृषी महाविद्यालयामुळे त्या भागातील शेतकर्‍यांच्या पाल्यांना कृषी पदवी घेण्याची सोय उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना शेतीविषयक मार्गदर्शनही उपलब्ध झाले. तसेच, २००२ मध्ये आनंदवन बायो टेक्नॉलॉजी सेंटरची स्थापना करण्यात आली. 

- मनोहर लऊळ

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].