Skip to main content
x

आपटे, वामन शिवराम

     वामन शिवराम आपटे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील असोलीपाल  (बांदा-पेटा) येथे झाला. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. वडील, आई व ज्येष्ठ बंधू यांच्या मृत्यूनंतर गरिबीची परिस्थिती आली, त्या वेळी त्यांनी माधुकरी मागून आपले शिक्षण चालू ठेवले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना राजाराम हायस्कूलचे हेडमास्तर महादेव मोरेश्वर कुंटे यांनी मदत केली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना पहिली ‘जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप’ (१८७३) मिळाली. प्रो. कीलहॉर्न यांनी त्यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये घेतले. बी.ए.ला गणित विषय घेऊन आपटे पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले (१८७७). त्यांनी आवश्यक म्हणून असलेल्या संस्कृत विषयात ‘भाऊ दाजी पारितोषिक’ मिळवले (१८७९). ‘भगवानदास शिष्यवृत्ती’ मिळवून त्यांनी एम.ए. पदवी संपादन केली. सरकारी नोकरीच्या मोहात न पडता १८८० साली पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून दाखल झाले. त्यांनी बुद्धिमान आणि शिस्तप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला.

१८८१ साली ‘केसरी’ व ‘मराठा’ ही नियतकालिके सुरू झाली, तेव्हा शाळेतील काम सांभाळून त्यांनी या नियतकालिकांच्या कामांस मदत केली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव नामजोशी, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि स्वतः आपटे हे पाच जण ही शैक्षणिक व वृत्तपत्रीय कामे मिळून-मिसळून करीत असत. पुढे त्यांची सुपरिंटेंडंट पदावर नेमणूक झाली.

१८८५ मध्ये त्याच संस्थेचे ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ काढण्यात आले, तेव्हा त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांची निवड झाली. हे कार्य करत असताना त्यांनी आपले लक्ष देशभक्तीवर केंद्रित केले होते. आधुनिक मराठी आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे जनक असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते पारंगत झाले होते. १८८० साली त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी स्वतःला राष्ट्रीय शिक्षणाला वाहून घेण्याचे ठरविले.

९ सप्टेंबर १८८९ साली त्यांनी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मुंबई प्रांतिक शैक्षणिक सुधारणा समितीपुढे मोलाच्या सूचना ठेवल्या. १८५४ मध्ये त्यांनी धार्मिक तटस्थता तत्त्व पाळण्यासाठी अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बायबल अध्यापन करण्यास विरोध केला. शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. माध्यमिक शाळेला शालान्त परीक्षेपर्यंतचे शिक्षण कोणत्याही पद्धतीने देता यावे अशी त्यांची इच्छा होती. शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यावर त्यांचा भर होता. विशेषतः, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षण हे अनुभव व निरीक्षणांवर आधारलेले असावे, असे त्यांना वाटत होते. मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत, अशी त्यांची इच्छा होती. शाळेला अनुदाने देतानासुद्धा शैक्षणिक दर्जाचा विचार केला जावा, असे त्यांचे मत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पायाभरणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता.

त्यांनी आपल्या ४४ वर्षांच्या अल्प आयुष्यात ग्रंथसंपदेत मोलाची भर घातली. त्यांनी ‘स्टूडण्ट्स गाइड’ (१८८१), ‘स्टूडण्ट्स हॅण्डबुक ऑफ प्रोग्रेसिव्ह एक्झरसायझेस’, भाग १,२, ‘संस्कृत कॉम्पोझिशन’ (१८८१), ‘द स्टूडण्ट्स इंग्लिश - संस्कृत डिक्शनरी’ (१८८४), ‘द प्रॅक्टिकल संस्कृत - इंग्लिश डिक्शनरी’ (१८९०), ‘कुसुममाला’ (१८९१) ही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत.

डॉ. गौरी माहुलीकर

आपटे, वामन शिवराम