Skip to main content
x

बाळकृष्ण

     नामवंत शिक्षणतज्ज्ञ, थोर इतिहासकार आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांचा जन्म डॉ. पंजाबमधील मुलतान या गावी झाला. पटवेगिरी व शिंपीकाम करीत त्यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. प्रथमपासून ते अतिशय बुद्धिमान, कष्टाळू आणि होतकरू विद्यार्थी म्हणून नावाजले जात होते. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे देशी विदेशी खेळ, वक्तृत्वकला इत्यादींमध्येही त्यांनी आपले प्रावीण्य सिद्ध केले होते.

      पंजाब विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ते पहिले आले होते. लाहोर येथील डी.ए.व्ही महाविद्यालयामधून ते इतिहास, अर्थशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन १९०७ मध्ये बी. ए. झाले. यांचा विवाह महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच झाला होता. १९०९ मध्ये ते एम.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

     ‘हिंदू समाजातील जातीसंस्था आणि अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, वेद सर्वांना खुले असले पाहिजेत आणि हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी आक्रमक होणे आवश्यक आहे’ ही विचारप्रणाली मूलाधार असणाऱ्या आर्य समाजाचे ते विद्यार्थी दशेपासून प्रचारक होते. त्यांना पाश्‍चात्य शिक्षणपद्धतीपेक्षा हिंदूंची गुरुकुल व्यवस्था अधिक मान्य असल्यामुळे  एम.ए. झाल्यावर त्यांनी मुन्शीराम उर्फ स्वामी श्रद्धानंद यांच्या कांगडी येथील गुरुकुलामध्ये १९०९ पासून बारा वर्षे अध्यापनाचे काम केले. याच काळात आर्य समाजाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून त्यांनी कराची, क्वेटा, श्रीनगर, अजमेर, पाटणा, कोलकाता, जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी असंख्य व्याख्याने दिली.

    ते बहुभाषिक पंडित होते. त्यांची मातृभाषा मुलतानी होती. हिंदी व इंग्रजी या दोन भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. याखेरीज उर्दू, फारशी भाषाही त्यांना अवगत होत्या. संस्कृतचे ते जाणकार होते. त्याचबरोबर फ्रेंच भाषासुद्धा  त्यांनी आत्मसात केली होती. ऐतिहासिक साधनांचे वाचन करण्याइतपत त्यांना मराठीही समजत होते.

     आर्य समाजाच्या वार्षिकोत्सवाच्या कार्यात मग्न असतानाच १९१९ मध्ये त्यांच्या पत्नीचे विषमज्वर रोगाने निधन झाले. त्यानंतर थोड्याच दिवसात पुढील शिक्षण प्राप्त करणे आणि युरोपमधील काही देशांची शैक्षणिक, सामाजिक - आर्थिक पाहणी करणे, हे दोन हेतू मनात ठेवून ते इंग्लंडकडे रवाना झाले. तेथेच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्समध्ये ‘भारत आणि इंग्लंडमधील व्यापारी संबंध’ या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. पदवी संपादन केली. लंडनमधील आपल्या अडीच वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी केवळ वैयक्तिक व शैक्षणिक प्रगतीवर समाधान न मानता आर्य समाजाचा क्रियाशील कार्यकर्ता या नात्याने लंडन, ऑक्सफर्ड, केम्ब्रीज, लिव्हरपूल, मँचेस्टर, एडिंबरो, ब्लॅकबर्न इत्यादी ठिकाणी धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक विषयांवर  व्याख्याने दिली. तेथील विद्यापीठांना भेटी दिल्या. युरोपमधील नामवंत पब्लिक स्कूलचे निरीक्षण केले. तेथील शिक्षणतज्ज्ञांशी सुसंवाद साधला.

      राजाराम महाविद्यालय चालविणे आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर संस्थानाला अतिशय ओढाताणीचे होऊन बसले होते. म्हणून ते महाविद्यालय शाहू छत्रपतींनी संयुक्त प्रांतातील (उत्तर प्रदेश) आर्य प्रतिनिधी सभेकडे देण्याचे ठरविले. त्यामुळेच राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. बाळकृष्ण कोल्हापूर दरबाराकडे १९२२ च्या मे मध्ये रुजू झाले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते त्या पदावर कार्यरत राहिले.

     डॉ. बाळकृष्णांच्या कारकिर्दीत राजाराम महाविद्यालयाची सर्वांगीण अशी खूपच प्रगती झाली.ते प्राचार्य पदावर रुजू झाले तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या केवळ १७० इतकीच होती. हीच संख्या १९४० मध्ये ९२० एवढी झाली. बी.ए. ऑनर्सचे वर्ग सुरू झाले. १९२७ मध्ये विज्ञान विभागाचा आरंभ झाला. १९३०-३१ मध्ये बी.एस्सी., एम्. एस्सी., एम्. ए. हे वर्ग  उघडण्यात आले. खेळ, अभ्यास, सांस्कृतिक कला इत्यादींबाबत विद्यार्थ्यांना सदैव प्रोत्साहन देणे आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे यामुळे डॉ. बाळकृष्ण हे विद्यार्थिप्रिय प्राचार्य म्हणून नामवंत ठरले होते.

     याखेरीज डॉ. बाळकृष्ण हे करवीर संस्थानातील माध्यमिक शिक्षणाचेही अधीक्षक होतेे. माध्यमिक शाळांचा अभ्यासक्रम निश्‍चित करणे, पाठ्यपुस्तक नेमणे, विद्यार्थ्यांना खेळ इत्यादीबाबत प्रोत्साहन देणे इत्यादी कार्ये हाती घेण्याच्या हेतूने त्यांनी ‘सेकंडरी टीचर्स असोसिएशन’ नावाची संस्था सुरू केली.

     महाराष्ट्रातील आजचे आघाडीचे विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाकडे पाहिले जाते. कुशल प्रशासन आणि व्यापक प्रयोगशीलता असा नावलौकिक असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचे आद्य संकल्पक म्हणून डॉ. बाळकृष्ण यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. १९३१ मध्ये प्रथम त्यांनी त्या विद्यापीठाची संकल्पना समाजापुढे सादर केली. इतकेच नव्हे तर त्याच हेतूने त्यांनी कोल्हापुरात विधी महाविद्यालय आणि शिक्षक महाविद्यालय ही नवीन महाविद्यालये सुरू करण्यात जातीने लक्ष पुरविले. याखेरीज आर्य समाजामार्फत ‘शाहू दयानंद मोफत विद्यालय’ ही माध्यमिक शाळा कोल्हापुरात सुरू करून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग खुला केला.

     १९२५ पर्यंत डॉ. बाळकृष्ण अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन आणि ग्रंथलेखन यामध्ये गुंतून पडले होते. परंतु त्यानंतर त्यांचे लक्ष मराठ्यांच्या इतिहासाकडे आणि विशेष म्हणजे शिवचरित्राकडे अधिक वेधले गेले. त्यामधून सतत १५ वर्षे शिवचरित्र साधनांचा देश आणि परदेशात धांडोळा घेत त्यांची टिपणे काढणे, आणि त्यामधून संशोधनावर आधारित असे निष्कर्ष काढून प्रत्यक्ष शिवचरित्राचे इंग्रजीमध्ये लेखन करणे, यामध्ये घालवली. आपल्या दमाग्रस्त प्रकृतीची चिंता न करता, ‘शिवाजी द ग्रेट’  हा १६०० पृष्ठांचा चार खंडांचा बृहदग्रंथ पूर्ण केला.

     ते उत्तम वक्ते होते. विनोद आणि आक्रमकता या दोन वैशिष्ट्याने मंडीत असे त्यांचे वक्तृत्व प्रतिस्पर्ध्याला सहज नामोहरम करीत असे. म्हणूनच स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे पार्लमेंट ऑफ रिलिजन्स या नावाने ज्या सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व १८९३ मध्ये केले होते त्याच दुसऱ्या स़र्वधर्म परिषदेत डॉ. बाळकृष्णांनी १९३३ मध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते.

     पाश्‍चात्त्य समाजाने पौर्वात्य संस्कृती आत्मसात करण्याच्या हेतूने आपली शैक्षणिक वाटचाल केली तर त्यामध्ये सर्व मानव जातीचे कल्याण होईल असा विचार ते सातत्याने आपल्या वाणी आणि लेखणीद्वारा देश आणि परदेशात मांडत होते.  

     ते लंडनच्या रॉयल इकॉनॉमिक्स सोसायटी, रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी आणि रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीचे सन्माननीय सभासद होते. याखेरीज मुंबई विद्यापीठाच्या विविध समित्या - सभा यांचेही ते  क्रियाशील सभासद होते.

     इतका सर्व व्याप सांभाळून ते हिंदी आणि इंग्रजी भाषेत दर्जेदार ग्रंथांची निर्मिती करीत होते. वेद, द वर्ड ऑफ गॉड, हिंदू फिलॉसॉफर्स ऑन इव्होल्यूशन कमर्शिअल रिलेशन बिट्विन इंडिया अ‍ॅण्ड इंग्लंड, द इंडस्ट्रियल डिक्लाइन इन इंडिया, इकॉनॉमिक्स (हिंदी), कमर्शिअल सर्व्हे ऑफ कोल्हापूर, द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, शिवाजी अल्बम, डिमांड्स ऑफ डेमॉक्रसी आणि भारतवर्षाचा संक्षिप्त इतिहास अशी काही पुस्तके डॉ.बाळकृष्ण यांच्या नावावर जमा आहेत. ‘प्रत्यक्ष कार्य हीच ईश्‍वरोपासना’ हे सूत्र समोर ठेवणारा आणि आपल्या कार्यात सतत मग्न असणारा हा नामवंत शिक्षणतज्ज्ञ, शिवचरित्र लेखनाचे जीवित कार्य  पूर्ण होताच एका आठवड्याच्या आत म्हणजे  कोल्हापूर मुक्कामी निधन पावला.

- डॉ. रमेश जाधव

संदर्भ
१.      शताब्दी महोत्सव, १८८० - १९८०, स्मरणिका, राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर.
२.      डॉ. बाळकृष्ण, ‘माझी जीवनगाथा’,  किर्लोस्कर, जून, जुलै व ऑगस्ट १९३५.
३.      श्री.वाळिंबे  मो.रा., ‘डॉ. बाळकृष्ण : चरित्र, कार्य व आठवणी’,  आर्य बुक डेपो, कोल्हापूर, १९४२.
बाळकृष्ण