Skip to main content
x

ब्रॅण्डीस, डिट्रिच क्रिस्टीयन

         ब्रॅण्डीस यांचा जन्म जर्मनीतील बॉन या शहरात झाला. त्यांचे वडील क्रिस्टीयन ब्रॅण्डीस हे बॉन विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ब्रॅण्डीस यांचे शिक्षण बॉन, कोपनहेगन, गाँटीजेन या ठिकाणी झाले. त्यांनी पीएच.डी. संपादन केली. त्यानंतर त्यांनी बॉन विद्यापीठात वनस्पती शास्त्राचे व्याख्याता म्हणून काम केले.

       १८५६ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी सर ब्रॅण्डीस यांची निवड ब्रह्मदेशाच्या पेगू वनाच्या नियंत्रक पदी केली व वर्षभरातच त्यांच्या उत्तम कामामुळे त्यांच्याकडे संपूर्ण ब्रह्मदेशाच्या वनविभागाचा कार्यभार सोपविण्यात आला.

       वनाच्या उत्पन्नाला अन्याय्य पद्धतीने लुबाडणाऱ्या ठेकेदारांना कडवा विरोध करीत सर ब्रॅण्डीस यांनी ब्रह्मदेशाच्या वनविकासाची योजना मांडली व अंमलात आणली. लिनियर व्हॅल्युएशन सर्वेक्षणाची कल्पना सर्वप्रथम सर ब्रॅण्डीस यांनी मांडली. या सर्व्हेच्या साहाय्याने मिळविलेल्या नोंदीवरून एकूण क्षेत्रातील उभ्या झाडांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज घेणे व त्यावरून दरवर्षी नियमित उत्पन्न मिळविणे शक्य होऊ लागले.

        ब्रह्मदेशातील त्यांच्या कामगिरीवर खूष होऊन १८६२ मध्ये सर ब्रॅण्डीस यांना भारत सरकारच्या वनविषयक सल्लागारपदी निमंत्रित केले गेले. १८६४ मध्ये हिंदुस्थानचे पहिले ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट’ होण्याचा त्यांना मान मिळाला. शास्त्रोक्त पद्धतीने वनांचे व्यवस्थापन आणि वनखात्याची संरचना तयार करण्याचे श्रेय सर ब्रॅण्डीस व त्यांचे सहकारी स्लीच आणि शिबनट्रुप या तिघांकडे जाते. १८७८ मध्ये सरकारने त्यांना ‘कम्पॅनियन ऑफ इंडियन एम्परर’ हा सन्मानदर्शक किताब देऊन गौरविले.

         १८६४ मध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट या पदाची धुरा सांभाळतानाच क्ले हॉर्न या सहकाऱ्याच्या मदतीने त्यांनी वनसंरक्षणाच्या दृष्टीने १८६५ मध्ये पहिला फॉरेस्ट अ‍ॅक्ट (वनविषयक कायदा) अस्तित्वात आणला. १८७० पर्यंत सर ब्रॅण्डीस यांनी वनखात्याचा पाया रचला.

         सर ब्रॅण्डीस हे केवळ उत्तम प्रशासक नव्हे तर ते उच्च प्रतीचे शास्त्रज्ञही होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य संशोधनपर अहवाल व शोध निबंध लिहिले. १८७२ ते १८७४ या काळात त्यांनी ‘दी फॉरेस्ट फ्लोरा ऑफ नॉर्थवेस्ट अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया’ हे पुस्तक लिहिले. १८७५ मध्ये त्यांची ‘फेलो ऑफ रॉयल सोसायटी’ म्हणून निवड झाली. १८८३ पर्यंत जवळजवळ १९ वर्षे त्यांनी भारतीय वनखात्यात ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट इंडिया’ या पदाची जबाबदारी सांभाळली. या कालावधीत केलेल्या कामाची पावती म्हणून १८७७ मध्ये सर ब्रॅण्डीस यांना ‘नाईट कमांडरशीप’ या सन्मानाने गौरविण्यात आले.

           १८८३ मध्ये निवृत्त झाल्यावर ते कुपर्स हॉल या जगप्रसिद्ध वनविषयक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत राहिले. १८८८ ते १८९६ या काळात त्यांनी हे काम केले. गेल्या १२५ वर्षांत भारतात वनसंबंधितांचा जो विकास झाला व आज जे काही वन अस्तित्वात आहे त्याचे श्रेय सर ब्रॅण्डीस यांच्या प्रयत्नांना जाते. खऱ्या अर्थाने वन खात्याचे ‘भीष्माचार्य’ हे संबोधन त्यांना लागू होते. बॉन येथे त्यांचे निधन झाले.

- आशा बापट

ब्रॅण्डीस, डिट्रिच क्रिस्टीयन