Skip to main content
x

भोगे, नारायण राजाराम

        नारायण राजाराम भोगे यांचा जन्म मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबात भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील  निलज या गावी झाला. त्यांच्या वडिलांजवळ स्वतःची शेती नव्हती. ते पवनीला इतरांच्या पानमळ्यांत मोलमजुरी करत असत. त्यांच्या बालपणीच वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या ११व्या वर्षापासून पानमळ्यात काम करण्याला सुरुवात केली व आई, दोन धाकटे बंधू व एक बहीण असे कुटुंब पोसले. त्यांचे शिक्षण चौथ्या वर्गापर्यंतच झाले. ते १९६३पासून दुसऱ्याची शेती ठेकेदारी पद्धतीने करत असत. त्यांनी भात, ज्वारी, द्राक्षे पिकवली. भोगे यांना १९६८ साली काबील कास्तकार म्हणून शासनाकडून आमगाव येथे ६.५ एकर जमीन देण्यात आली. त्यांनी कोरडवाहू शेतीचा प्रयोग यशस्वीरीत्या करून आणखी ७.५ एकर जमीन खरेदी केली. त्यांनी आपल्या शेतीमध्ये कोरडवाहू फळबागा व बांधावर वनशेती केली. त्यांनी अर्धा एकरमध्ये लिंबू व साडेतीन एकरांमध्ये केसर, दशेरी व लंगडा आंब्याच्या जातीची लागवड करून अडीच एकरांत प्रतिष्ठान या चिंचेच्या जातीची लागवड केली, तसेच बनारसी बोर दीड एकरांवर लावले. कुंपणाच्या शेजारी व बांधावर वनशेतीमध्ये सागवान, निलगिरी व बांबू ही झाडेही लावली. त्यानंतर भोगे यांनी हरभरा, करडई, सोयाबीन अशासारखी पिके घेऊन उत्तमप्रकारे शेती केली.

        भोगे यांना १९९२मध्ये महाराष्ट्र शासनाने शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन गौरवले. तसेच त्यांचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे पुसद येथे सत्कार करण्यात आला. त्यांना १९८३ साली अजय किनखेडे यांच्याहस्ते वनराई पुरस्कार देण्यात आला. त्यांना १३ डिसेंबर १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी शेतावर वेगवेगळ्या प्रकारची कवठ, कागदी लिंबू, बनारसी आवळा, सीताफळ, जांभूळ, फणस, नारळ, मोसंबी, डाळींब, करवंद यांसारखी फळझाडे लावली आहेत, तसे वनशेतीची पिकेही घेेतली आहेत.

        भोगे यांनी शेतीत केलेली लागवड पाहण्यासाठी संत तुकडोजी महाराज यांनी भेट दिलेली होती. भंडारा जिल्ह्याचे कलेक्टर दलाल व दैठणकर, नागपूरचे आयुक्त सप्रे व गोडबोले आदींनीही त्यांच्या शेतीला भेटी देऊन त्यांची प्रशंसा केली आहे.

- डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

भोगे, नारायण राजाराम