Skip to main content
x

भोळे, केशव वामन

चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत या क्षेत्रांबरोबर संगीतसमीक्षेच्या क्षेत्रातही मौलिक योगदान करणाऱ्या केशवराव भोळे यांच्या युगप्रवर्तक संगीतविचाराचा प्रभाव पुढच्या तीन पिढ्यांवर पडला. त्यांचे वडील वामनराव अनंत भोळे हे ब्रिटीश आमदानीत वऱ्हाड प्रांतात सार्वजनिक बांधकाम विभाग खात्यात ओव्हरसियर म्हणून भरती होऊन कर्तबगारीने सहअभियंता पदापर्यंत पोचले व मूळचे पुण्याचे भोळे कुटुंबीय वर्‍हाडात स्थायिक झाले. वडिलांचा पक्षाघाताने अकाली मृत्यू झाल्यावर एका महिन्यानंतर केशवराव भोळ्यांचा जन्म अमरावती येथे झाला. आई गंगाबाई यांनी मोठ्या खंबीरपणे त्यांना व अन्य भावंडांना मोठे केले. वडिलांना सतारवादनाची आवड होती, तर आई स्त्रीगीते, पदे, व ठुमरी हौसेने गात असे. अमरावतीस भोळ्याच्या घरी रहिमत खाँ, विष्णूपंत छत्रे यांच्या गायनाच्या बैठकी होत. स्वदेश हितचिंतक नाटकमंडळीचे जनूभाऊ निमकर हे वामनरावांचे व्याही असल्याने केशवराव भोसल्यांसारख्या नाट्यकलाकारांचे वास्तव्य त्यांच्या घरी असे. त्यामुळे लहान वयातच अनेक कलाकारांचा सहवास भोळ्यांना लाभला. ध्वनिमुद्रिका हे माध्यम त्या काळी नवीनच उदयास आले होते. त्यांच्या वाड्यातील सबनीस बंधूंच्या दुकानात गोहरजान, जोहराबाई, मौजुद्दिन अशा कलावंतांच्या नवीन ध्वनिमुद्रिका ते ऐकत, त्या अनुकरणातून त्यांचे गायन सुरू झाले.

केशवराव भोळ्यांचे इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण अमरावतीस झाले, मग दोन वर्षे नागपुरास मॉरिस महाविद्यालयात शिकले. डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी १९१५ साली मुंबईस ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते दाखल झाले. चार वर्षे पूर्ण केल्यावर मलेरिया झाल्याने हे वैद्यकीय शिक्षण अपूर्ण राहिले. मात्र या शिक्षणातून मिळालेली चिकीत्सक दृष्टी त्यांना पुढेही उपयोगी ठरली. त्या काळात ऐन बहरात असणारे बालगंधर्व, केशवराव भोसले याची संगीत नाटके त्यांनी मुंबईत पाहिली, भास्करबुवा, वझेबुवा, मंजीखाँ इ. गवैयांच्या मैफिली ऐकल्या. ते स्वत:ही ख्याल, नाट्यगीते गायनाच्या मैफिली करू लागले. बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कंपनी या तत्कालीन नभोवाणीवर त्यांचे गायनाचे कार्यक्रम होऊ लागले. १९२८ पासून भोळ्यांनी अनंत कणेकर, अनिल, इ. कवींच्या कवितांना काव्यरसानुकूल चाली देऊन भावगीत हा नवागत संगीतप्रकार मैफिलींत गाण्यास आरंभ केला. याच सुमारास गिरिजाबाई केळेकर व केसर बांदोडकर या भगिनींचा परिचय झाला व त्यांची धाकटी बहीण दुर्गा हिला ते भावगीत, ठुमरी-दादरे शिकवू लागले. याच दुर्गाशी त्यांनी विवाह केला व त्या पुढे ज्योत्स्ना भोळे या नावाने सुपरिचित झाल्या.

१९३० साली स. अ. शुक्ल यांच्या साध्वी मीराबाई या संगीतनाटकात भोळ्यांनी काही चाली दिल्या, त्यापैकी हिराबाई बडोदेकरांनी गायलेली ‘ब्रिजलाला गडे’, ‘असार पसारा’ ही पदे लोकप्रिय ठरली. तसेच ना.सी.फडके यांच्या युगांतर नाटकासही त्यांचे संगीत होते, त्यातील ‘जनमानस मंदिरात’ या हिराबाईंनी गायलेल्या पदाची ध्वनिमुद्रिकाही गाजली. १९३२ साली रेडिओ स्टार्स या नाट्यसंस्थेच्या बेबी, स्वस्तिक बँक, खरा ब्राह्मण या नाटकांस त्यांचे संगीत होते. भोळ्यांची नाटकांतील संगीताबद्दलची निराळी दृष्टी ओळखून आधुनिकतावादी नाटयकलाकारांच्या नाट्यमन्वंतर संस्थेने ‘आंधळ्यांची शाळा’ (१९३३) या नाटकाचे संगीत देण्यास त्यांना निमंत्रित केले. यात मराठी नाटकांत प्रत्यक्ष नाट्यप्रवेशानुरूप वाद्यवृंदाद्वारे पार्श्वसंगीताचा वापर प्रथमच त्यांनी केला. या नाटकातील ‘एकलेपणाची आग’, ‘आला खुषीत समींदर’, ‘तू माझी अन् तुझाच मी’ या पदांना नव्या शैलीच्या भावगीतात्मक चाली देऊन मराठी नाट्यसंगीतात एक नवा प्रयोग त्यांनी केला. या अर्थाने त्यांनी मराठी नाटकाच्या संगीतात खर्‍या अर्थाने मन्वंतर घडवले. हे संगीत उ. अल्लादिया खाँसाहेबांनीही वाखाणले होते.

या प्रयोगशील संगीतामुळे पुण्याला ‘प्रभात फिल्म कंपनीत’ भोळ्यांना संगीतदिग्दर्शक म्हणून पाचारण करण्यात आले. भोळ्यांना चित्रपटांस संगीत देण्याचा आधीही अनुभव होताच. ‘संत सखू’ (१९३२, श्रीकृष्ण फिल्म कंपनी) हा केशवरावांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट होय. ‘नूर-ए-इमान’ (१९३२) या हिंदी चित्रपटास त्यांचे संगीत होते. नंतर ‘कृष्णावतार’ (१९३३) या चित्रपटाचे संगीत देताना वसुदेवाचे काम करणार्‍या नटास त्यांनी उसना आवाज दिला आणि हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले पार्श्वगायन होय. पण त्याकाळी श्रेयनामावलीत अशा बाबींचा निर्देश होत नसल्याने, दुर्दैवाने याचे श्रेय केशवरावांना दिले गेले नाही.

‘प्रभात’मधील १९३४ ते १९४४ ही दहा वर्षे भोळ्यांच्या कारकीर्दीतील सुवर्णकाळ होता. ‘अमृतमंथन’ (१९३४, हिंदीतही), ‘रजपूत रमणी’ (हिंदी, १९३५), ‘संत तुकाराम’ (मराठी, १९३६), ‘कुंकू’ / ‘दुनिया ना माने’ (१९३७), ‘माझा मुलगा’ / ‘मेरा लडका’ (१९३७), ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०, हिंदीतही), ‘संत सखू’ (१९४१, हिंदीतही), ‘दहा वाजता’ / ‘दस बजे’ (१९४२), ‘रामशास्त्री’ (१९४४, हिंदीतही) या प्रभात चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. केशवरावांचा चौफेर व्यासंग, सौंदर्यदृष्टी, चोखंदळ, स्पष्टवक्ता स्वभाव यामुळे व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शांताराम आठवले हे सारेच त्यांचा सल्ला घेत असत. त्यामुळे ‘प्रभात’च्या यशात केशवरावांचा वाटा मोठा होता.

‘आधी बीज एकले’ (संत तुकाराम), ‘मन सुद्दं तुजं’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य’ (कुंकू), ‘सोनियाचा दिवस’, ‘एक तत्त्व नाम’ (संत ज्ञानेश्वर), ‘दोन घडीचा डाव’ (रामशास्त्री) ही त्यांनी संगीत दिलेली गीते आजही लोकप्रिय व चिरतरूण आहेत. ‘अमृतमंथन’ मधील ‘रात आई है नया रंग जमाने के लिए’ या ढंगदार गझलने भारतभर त्यांचे नाव झाले. निराळे पार्श्वसंगीत न योजता पार्श्वध्वनींचा प्रभावी वापर करण्याचा ‘कुंकू’तील प्रयोग भारतात प्रथमच घडला, तर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर या संतपटांना त्यांच्या प्रासादिक संगीताने अधिकच भावगर्भता मिळाली. ‘प्रभात’ सोडल्यानंतर अलंकार या नाटकास (मो. ग. रांगणेकर, १९४४), तसेच ‘तारामती’ (हिंदी, १९४५), ‘कुबेर’ (१९४७, श्रीधर पार्सेकरांसह), ‘भाग्यरेखा’ (१९४८), ‘पारिजातक’ (१९५१) या चित्रपटांना त्यांचे संगीत होते. ‘अण्णासाहेब कर्वे’, ‘मराठा किसान’ या अनुबोधपटांना त्यांचे पार्श्वसंगीत होते. केशवरावांनी या नव्या माध्यमाच्या आवश्यकता आणि त्याची बलस्थाने ओळखून चित्रपटसंगीतास नाट्यसंगीताच्या प्रभावातून बाहेर काढून ते अव्वल दर्जाचे संगीतकार बनले. एवढेच नव्हे तर ‘माझे संगीत’ या पुस्तकात आपले संगीत देण्यामागची विचारप्रक्रिया आणि प्रयोग यांचेही प्रांजल वर्णन करून चित्रसंगीताची आगळी परिभाषा तयार केली.

मराठी भावसंगीताच्या आरंभीच्या काळातील एक महत्त्वाचे भावगीतगायक व रचनाकार म्हणूनही भोळ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी स्वरबद्ध केलेली आणि ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली अनेक गीते ही भावगीताच्या उदयकालात या प्रकारास स्वत:चा चेहरामोहरा देणारी म्हणून वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. काही ठळक उदाहरणे अशी - ‘थकले रे डोळे’, ‘नदी किनारी गं’ (अनिल), ‘तुजसाठी राया रे लाख बोल साहिले’, ‘झाली पहाट’ (राजा बढे), ‘शिरी घागर पाझरते’ (कवि मंजूमाधव), ‘नाचती ओठावरी’ (रांगणेकर). ‘पुढल्या पिढीतीलही ग. दि. माडगुळकर’ (तुजसाठी रे घननीळा), ‘इंदिरा संत’ (अजून नाही जागी राधा), ‘आज पहाटे उमले स्वप्न कांचनाचे’, ‘तू असतीस तर झाले असते’ (पाडगावकर) या कवींच्या भावकविता भोळ्यांनी आकाशवाणीसाठी स्वरबद्ध केल्या. त्यांनी १९३० च्या दशकात संगीतबद्ध केलेल्या ‘आला खुषीत समिंदर’, ‘दर्यावरी डोले’, ‘नको वळून बघू माघारी’ या ‘दर्यागीतांनी’, तसेच ‘दारी फुलला मोगरा’, ‘उंच डोंगराच्या आड’ या ‘माहेरगीतांनी’ही मराठी भावसंगीतात एक नवा प्रवाह आणला होता.

भोळे हे स्वत: उत्तम गायक असल्याने एच.एम.व्ही. आणि ओडियन या कंपन्यांनी त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका १९३०-३२ सुमारास प्रसिद्ध केल्या. ख्याल, ठुमरी, गझल, भावगीत, नाट्यगीत, भजन अशा संगीतप्रकारांच्या त्यांच्या गायनात भावदर्शी गायनोच्चार, स्वरोच्चारांतील माधुर्य व दाणेदारपणा, लयीला खेळवत गीत पेश करण्याची मोहक शैली दिसते. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे गायन त्यांनी भूप रागात एखाद्या बंदिशीप्रमाणे केले, जे नंतर त्यांना यथायोग्य वाटले नाही. नंतरच्या काळात प्रगल्भ संगीत विचारानुसार भोळ्यांना आपले तरूणपणातील गायन हे फारसे इष्ट वाटले नाही व त्यांनी आपल्या ध्वनिमुद्रिकांचा उल्लेखही क्वचितच केला, मात्र आज त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकताना त्यातील मोठी गुणवत्ता जाणवते. कुंकू (सुखशयनी शय्येवरती), संत ज्ञानेश्वर (आम्ही चकोर हरी चंद्रमा), दहा वाजता (चल थरकत मुरकत डौलात) या चित्रपटांतही त्यांनी फार प्रभावी असे पार्श्वगायन केले होते.

संगीतविषयक अनेक उत्तम ग्रंथ, ध्वनिमुद्रिका यांचा संग्रह भोळ्यांनी केला होता, तसेच अनेक दिग्गज कलाकारांच्या सहवासात त्यांनी विद्या जोपासली. वझेबुवा, अब्दुल वहिद खाँ, मंजी खाँ अशा गवयांकडून तसेच सारंगिये कादरक्ष यांच्याकडून खानदानी बंदिशी, बाई सुंदराबाईंकडून ठुमरी-दादरे, लावण्या यांचे भांडार जमा केले आणि पुढे ते अनेकांना मुक्तकंठाने शिकवलेही. गीतातील शब्दांचे भावप्रसारी उच्चारण करण्याचे त्यांचे खास तंत्र होते, तसेच गळ्याची निगा कशी राखावी याचा वैद्यकीय बाजूनेही त्यांनी विचार केला होता. आपले गीत गायनाचे विकसित तंत्र त्यांनी अनेकांना शिकवले. ‘प्रभात’मध्ये शांता आपटे, शांता हुबळीकर, शाहू मोडक, परशराम, गजाननराव वाटवे, विनोदिनी देसाई, इ.ना त्यांनी शिकवले. वसंत देसाई यांनाही त्यांच्या संगीतदृष्टीचा लाभ झाला. भावगीताच्या संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ पत्नी ज्योत्स्ना भोळे व कन्या वंदना खांडेकर यांच्याखेरीज मालती पांडे, भानुमती कंस (कुमार गंधर्वांच्या प्रथम पत्नी), कथक नृत्यकलाकार रोहिणी भाटे, विमल वाकडे, उषा अत्रे-वाघ, सुमन कल्याणपुर यांनाही झाला. १९५३ ते १९६० या काळात ते कार्यक्रम निर्माते म्हणून ‘आकाशवाणी’च्या सेवेत होते.

मराठीतील संगीतविषयक लेखनाचे एक अध्वर्यू म्हणूनही भोळ्यांचे कर्तुत्त्व मोलाचे आहे. मो. ग. रांगणेकरांच्या आग्रहामुळे १९३० पासून वसुंधरा मासिकासाठी ‘एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी समीक्षात्मक लेख लिहिले. मौज, सत्यकथा, नवभारत, अभिरुची अशा नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे. ‘आजचे प्रसिद्ध गायक’ (१९३३), ‘आवाजाची दुनिया’ (शुद्धसारंग या नावाने, १९४८), ‘संगीताचे मानकरी’ (१९४९), ‘अस्ताई’ (१९६२, महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक), ‘वसंतकाकांची पत्रे’ (१९६४), ‘माझे संगीत’ (१९६४), ‘अंतरा’ (१९६७), ‘जे आठवते ते’ (१९७४, आत्मचरित्र) हे आठ ग्रंथ म्हणजे भोळ्यांनी मराठी संगीत-सारस्वतास दिलेले भरीव देणगी आहे. त्यांचे साक्षेपी लेख कलाकारांच्या कलेतील गुण-दोषांसह त्यांची थोरवी मांडतात. ‘वसंतकाकांची पत्रे’ हे संगीताचा व्यासंग, रियाज कसा करावा याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारे पुस्तक मराठीतील या प्रकारचे पहिलेच म्हणता येईल. केशवराव भोळे हे मराठीतील विश्‍लेषक संगीत समीक्षेचे जनक होते. त्यांच्या लेखनातील सौंदर्यास्वादाबरोबरच वस्तुनिष्ठ चिकित्साही आहे. त्यांचे लेखन हे खर्‍या अर्थाने समीक्षा म्हणता येते. समकालीन कलाकारांच्या नव्याने प्रसिद्ध होणार्‍या ध्वनिमुद्रिकांवरचे त्यांचे लेख म्हणजे चिकित्सक संगीतसमीक्षेचा आदर्श वस्तूपाठच होत. या आठ ग्रंथांखेरीज, संगीताबरोबरच क्रिकेट विषयावरही स्फुट लेख, पुस्तकांसाठी प्रस्तावना, पुस्तक परीक्षणेही त्यांनी लिहिली.

‘संगीत सुधारक’ भोळ्यांचा ८१व्या वर्षी पुणे येथे मृत्यू झाला. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘केशवस्मरणी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांच्या नावाने युवा पिढीतील प्रतिभावान संगीतकारास स्वरानंद प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार दिला जातो.

- चैतन्य कुंटे

भोळे, केशव वामन